Saturday, July 29, 2017

कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळीचे
एकात्मिक व्यवस्थापन  
नांदेड, दि. 29 :- जिल्हयात नगदी पिक म्हणून कापूस पिक हे मोठया प्रमाणात घेतले जाते. या हंगामात देखील मोठया प्रमाणात कापूस पिकांची लागवड केलेली आहे. यातच कापूस पिकावर येणाऱ्या किडी विषयी व भविष्यातील धोका लक्षात घेऊन आता पासूनच शेंदरी बोंड अळीचे नियोजन करणे महत्वाचे आहे, असे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक एम. टी. गोंडेस्वार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
            शेंदरी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापनात सर्व प्रथम किडीची ओळख, कोष आवस्था लालसर तपकिरी रंगाची तर पतंग करडया रंगाचे असतात. पुर्ण वाढ झालेली अळी ही लांबट असून तिचे पूर्ण शरीर हे गुलाबी दिसते. शेंदरी बोंड अळीची आर्थिक नुकसान स्तर पातळी ओळखण्यासाठी प्रत्येक आठवडयात पिकाची पाहणी करावी. पाहणीसाठी 3 कामगंध सापळे प्रती एकर उभारावेत. प्रत्येकी 20 फुले किंवा 20 बोंडे पैकी रॅन्डम पध्दतीने पाहणी करावे. पाहणी करताना प्रत्येकी कामगंध सापळयामध्ये सलग 3 दिवस 8 पुरुष पतंग आढळल्यास किंवा 2 डोमकळया किंवा 2 बोंडे प्रत्येकी 20 फुलापैकी किंवा 20 बोंडा पैकी रॅन्डम पध्दतीनी पाहणी करताना शेंदरी बोंड आळीने प्रभावग्रस्त आढळल्यास आर्थिक नुकसानस्तर पातळी ओलांडली आहे, असे समजावे. 90 दिवसापर्यंत क्विनॉलफॉस 25 ईसी / प्रोफेनोफॉस 50 ईसी / थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी / लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी / सायपरमेथ्रीन 10 ईसी या रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. तसेच सेंद्रीय बोंड आळीचे पुरुष पतंग जास्तीतजास्त अडकविण्यासाठी प्रती एकर 8 कामगंध सापळे लावावेत. भविष्यात उदभवणाऱ्या समस्यांचे योग्य वेळीच उपाय करुन बंदोबस्त करावा.

00000
जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे 9 सप्टेंबरला आयोजन
लोकन्यायालयाच्या माध्यमातून प्रकरणे मिटविण्याची संधी
नांदेड दि. 29 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडतर्फे शनिवार 9 सप्टेंबर 2017 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकन्यायालयतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, चेक बाऊंसची प्रकरणे (138 एन.आय.अॅक्ट), बॅंक रिकव्हरी, दिवाणी प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, मनपा, न.पा. प्रकरणे, विद्युत आणि पाणीपट्टी प्रकरणे तसेच विविध बॅंकांची, टेलीफोन कंपन्यांची प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, मनपा अधिकारी, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विमा कंपन्याचे अधिकारी, बॅंक अधिकारी व संबंधीत सर्व पक्षकार यांनी या राष्ट्रीय लोकन्यायालयात आपली जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढून आपला पैसा, वेळ वाचवून राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर पी. कुलकर्णी यांनी केले आहे.
            मागील राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये मिळालेले यश पाहता यावेळी देखील बऱ्याच मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी व्यक्त केला असून पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात व दाखलपुर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड या कार्यालयाकडे एक अर्ज देवून आपले प्रकरण लोकन्यायालतीमध्ये ठेवण्याची विनंती करावी. यासाठी आपणास कुठलीही शुल्क आकारण्यात येणार नाही. आपले आपसातील वाद मिटविण्याची या लोकन्यायालयाच्या रुपाने  संधी चालून आली आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे.

00000

Thursday, July 27, 2017

कर्करोग सप्ताह निमित्त
तपासणी शिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 27 :- जागतिक मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग सप्ताह निमित्त श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात कान, नाक, घसा व मौखिक कर्करोग मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात गरजू रुग्णांनी तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.      
राष्ट्रीय तंबाखू  नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग दिन व सप्ताह 27 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 पर्यंत जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात येणार आहे. रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना कर्करोगाविषयी तज्ज्ञांमार्फत आज मार्गदर्शन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी तंबाखु सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक होते. समाजात तंबाखु दुष्परिणामाची जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
000000


एसटीच्या सहाय्यक (कनिष्ठ) पदासाठी
परभणी केंद्रातील परीक्षार्थींची रविवारी फेर लेखी परीक्षा
नांदेड, दि. 27 :- राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सहाय्यक (कनिष्ठ) या पदासाठी परभणी व नागपूर शहरातील काही परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याने या केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परभणी परीक्षा केंद्रातील 2 हजार 44 परीक्षार्थीपैकी 1 हजार 94 परीक्षार्थींची फेर लेखी परीक्षा रविवार 30 जुलै 2017 रोजी ग्रामीण पॉलिटेक्नीकल विद्यालय, विष्णुपुरी, नांदेड येथे घेण्यात येणार आहे. संबंधीत उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन  विभाग नियंत्रक, राज्य परिवहन, नांदेड यांनी केले आहे.    
परिवहन महामंडळातील सहाय्यक (कनिष्ठ) या पदासाठी राज्यात विविध ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार नांदेड विभागात सहाय्यक (क) या पदासाठी रविवार 9 जुलै रोजी घेण्यात आलेली परीक्षा सुरळीतपणे पार पडली असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

000000
नांदेड जिल्हा परिषदेची
5 ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा
नांदेड दि. 27 :- जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शनिवार 5 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे विषय सुचीनुसार आयोजित केली आहे, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) यांनी कळविले आहे.
0000000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड दि. 27 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पुल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा गुरुवार 27 जुलै 2017 च्या 6 वाजेपासून ते शनिवार 26 ऑगस्ट 2017 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
0000000


Wednesday, July 26, 2017

शेतकरी पीक कर्ज माफीचे
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात
नांदेड दि. 26 :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या पीक कर्ज माफी योजनेतंर्गत राज्य शासनाच्या आपले सरकार https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर त्याचबरोबर https://www.csmssy.in या पोर्टलवर अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, कर्ज खाते उतारा, बँक पासबुक व आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. या कागदपत्रासह जिल्ह्यातील कोणत्याही "आपले सरकार सेवा केंद्रामधुन" अर्ज भरता येईल, अशी माहिती उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी दिली आहे.    
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथुन सुरु करण्यात आली आहे. या पीक कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना सर्व बँक शाखांमध्ये, ग्रामपंचायत कार्यालयात व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या गटसचिव यांचेकडे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज माफीचे अर्ज ऑनलाईन भरत असताना किंवा कर्ज वाटपासंबंधाने काही अडचण असल्यास दर सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत तहसिल कार्यालय येथे तालुकास्तरीय समन्वय समितीकडे संपर्क करावा, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले. पीक कर्ज माफी व ऑनलाईन अर्ज भरणे संबंधी उपनिबंधक पी. ए. साठे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी वि. का. सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पी. एम. मोरे, सचिव एन. सी. कोटुरवार, संस्थेचे लाभधारक शेतकरी, महा ई सेवा केंद्राचे संचालक श्री. आसोरे उपस्थित होते.

0000000

वृत्त क्रमांक नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान ;  ३६ हजार ६८७ मतदारांपैकी ...