Sunday, October 30, 2022

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्ह्यात एकता दौडचे आयोजन शाळा, महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्ह्यात एकता दौडचे आयोजन

शाळा, महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवार 31 ऑक्टोबर रोजी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 पासून पुढे जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, सेवाभावी संस्था यांनी राष्ट्रीय एकतेसाठी यात पुढाकार घेवून  उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

संपूर्ण जिल्ह्यातून एकात्मतेचा हा संदेश पोहचविण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थानी आपली तयारी पूर्ण केली आहे. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिनांक 28 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयाद्वारे सूचना निर्गमित केल्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातर्गंत 25 ते 31 ऑक्टोबर 2022 हा कालावधी एकतेचा उत्सव साजरा केला जात येत आहे. या अंतर्गत सोमवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा, जुना मोंढा या दरम्यान दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे.  सहभागी होवू इच्छिणाऱ्या नागरिकांनी, युवकांनी  सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपस्थित राहावे, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून यात सचित्र माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवराचे हस्ते केले जाणार असून  या समारंभाचा व प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

0000

 

सोमवारी दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ

नांदेड (जिमाका) दि. 30 :- भ्रष्टाचार मुक्त भारत –विकसित भारत  ही संकल्पना घेऊन जिल्ह्यात सोमवार 31 ऑक्टोंबर ते  रविवार 6 नोव्हेंबर 2022 या  कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फतया कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने दिल्या आहेत. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत परिपत्रकान्वये विविध विभागांना निर्देशित करण्यात आले आहे. 

0000

 

Saturday, October 29, 2022

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी रॅलीचे आयोजन

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त

सोमवारी रॅलीचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 29:- नेहरु युवा केंद्राच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, महीला मंडळ, युवा मंडळ, क्रीडा मंडळातील सदस्यांनी या  रॅलीत सहभाग घ्यावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.

 

नेहरु युवा केंद्र नांदेड व जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेना, भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशभक्तीचा सन्मान व त्यांच्या विचाराच्या मूल्यांची जपणुक करण्यासाठी तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातर्गंत 25 ते 31 ऑक्टोबर 2022 हा कालावधी एकतेचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सोमवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, जुना मोंढा या दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7.30 वाजता उपस्थित राहावे, असे  नेहरु युवा केंद्राच्यावतीने कळविले आहे.

00000

जिल्ह्यातील 2263 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा 4 लाख 19 हजार 183 पशुधनाचे लसीकरण

 

  जिल्ह्यातील 2263 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 19 हजार 183 पशुधनाचे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 179 बाधित गावात 2 हजार 263 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर 101 पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर 1050 गावांवर लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 19 हजार 183 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

000000

Tuesday, October 25, 2022

 जिल्ह्यातील 1982 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 19 हजार 183 पशुधनाचे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 166 बाधित गावात सद्यस्थितीत 1 हजार 982 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर 74 पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर 822 गावांवर विशेष लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 19 हजार 183 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

000000

Sunday, October 23, 2022

 गोरगरिबांची दिवाळी गोड करता आली याचे समाधान

- खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

·       शिधा पोहचविण्यासाठी प्रशासन अहोरात्र घेत आहे परिश्रम - आमदार बालाजी कल्याणकर

·       जिल्ह्यातील 5 लाख 97 हजार कुटुंबांना “आनंदाचा शिधा”

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्यातील गोरगरिबांच्या घरीही दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने “आनंदाचा शिधा” ही विशेष योजना राज्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत पोहचविण्यात यश मिळविले आहे. स्वस्त धान्य दुकानातून जे लोक धान्य घेतात त्यांना अवघ्या शंभर रुपयात 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ व 1 लिटर पामतेल असे किट शासनाने उपलब्ध करून दिले. अत्यंत कमी कालावधीत हे किट जनतेपर्यंत यशस्वीपणे पोहचविले जात आहे. जिल्ह्यातील या “आनंदाचा शिधा” वाटपाचा प्रातिनिधीक शुभारंभ करतांना आत्मिक समाधान व आनंद आहे. गोरगरीबांच्या घरातही महाराष्ट्र सरकारने दिवाळीची दिलेली ही गोड भेट असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. 

नांदेड येथील आनंदनगर परिसरातील रास्त भाव दुकान क्र. 89 येथे यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार किरण अंबेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना सारख्या आव्हानात्मक काळातही केंद्र सरकारने गोरगरीबांच्या घरी धान्य पोहचेल याची काळजी घेतली. सर्व खासदारांचा निधी हा लोककल्याणासाठी आणि विशेषत: जनतेच्या आरोग्याच्या सुविधेवरच प्राधान्याने खर्च करण्यात आल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. 

आपल्या जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. या विस्तारात वाड्या-पाड्यांपर्यंत ही आनंदाची शिधा वेळेत पोहचविण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आमच्या सर्व बांधवांच्या घरी ही गोड दिवाळी भेट पोहचविली जात आहे. वाहतुकीच्या अडचणीमुळे जर कुठे अडथळा झाला तर प्रशासनाने त्यावर तात्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

आनंदाचा शिधा हा अत्यंत महत्वाकांक्षी व लोककल्याणाच्या दृष्टिने आवश्यक असा निर्णय शासनाने घेतला. ऑनलाईन नोंदणीसाठी यात असलेला अडसर लक्षात घेता शासनाने तो दूर केला असून आनंदाचा शिधाचे वाटप आता युद्धपातळीवर पूर्ण होईल यात शंका नाही. अनेक तालुक्यांसाठी सद्यस्थितीत चारही वस्तु प्राप्त असून काही तालुक्यांसाठी एखादी राहिलेली वस्तू तीही तात्काळ पोहचविली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

साखर, रवा, चणाडाळ, पामतेल या वस्तु असलेले आनंदाचा शिधाचे किट खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात द्रोपदाबाई शिवाजी पिंगलवाड, संतोष चांदू साबळे, जयश्री गंगाधर मोकनपिल्ले, पारुबाई गायकवाड, चंद्रकलाबाई सोनसळे यांना देण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे 2 हजार रेशन दुकानांद्वारे 5 लाख 97 हजार 812 शिधापत्रिकाधारकांना ही आनंदाची शिधा वाटप केली जात आहे.

000000









Saturday, October 22, 2022

 शेतकऱ्यांपर्यंत बदलत्या पीक पद्धतीचे नियोजन पोहचणे आवश्यक

 -  जिल्हाधिकारी अभिजित राऊत 

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- पोकरा योजनेअंतर्गत शेती आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विहिरी मिळाल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून केळी, हळद, फळे, भाजीपाला पिकांचे नियोजन करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी पुढे येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि अधिकाऱ्यांनी बाजारपेठे संदर्भातही शेतकऱ्यांत जागृती करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

 

कृषि विभागाच्या विविध योजनांचा त्यांनी नुकताच आढावा घेतला. या आढावा बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके, श्रीमती माधुरी सोनवणे प्रकल्प उपसंचालक, आत्मा, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, सर्व तालुका कृषि अधिकारी, निवडक शेतकरी गटाचे प्रतिनिधी व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

अलिकडल्या काळात सेंद्रीय व नैसर्गिक शेती करणाऱ्या अनेक शेतकरी आपल्या शेतात उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करून बाजारपेठेशी जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शेतकऱ्यांना बाजारपेठ व त्यांचा व्यवसाय अधिक सुकर व्हावा, ज्या व्यक्तींना असे नैसर्गिक उत्पादन हवे आहे त्या ग्राहकांशी थेट जोडल्या जाता  यावे यादृष्टिने विद्यापीठ स्तरावर (इनक्यूबेशन सेंटर) एक स्वतंत्र केंद्र असून तेही मदतीला तत्पर आहेत. यांच्याशी समन्वय साधणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

 

यावेळी जिल्ह्यातील निवडक सेंद्रीय / नैसर्गिक शेती करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आपल्या उत्पादनांची माहिती जिल्हाधिकारी राऊत यांना दिली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रात्यक्षिकात नांदेड तालुक्यातील मौजे पिंपरी महिपाल या गावातील आशाबाई बाबुराव चंदेल, सयाबाई शिवाजीराव सूर्यवंशी यांना  हरभरा प्रकल्प बियाणे किट प्रतिनिधीक स्वरूपात वाटप केले. मौ. खडकुत येथील शहाजी बळीराम कंकाळ व प्रभु जैयवंता कंकाळ यांना करडई मिनिकिट वाटप करण्यात आले.  

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कृषि यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय शाश्वत शेती योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा), मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) आदी योजनेबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना 100 टक्के अनुदानाच्या ज्या योजना असतील त्यात प्राधान्याने सहभागी करून घ्यावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी राऊत यांनी यावेळी दिल्या.

00000



राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...