Tuesday, September 19, 2017

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी
मॉक मुलाखतीचे आयोजन
नांदेड दि. 19 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक या पदाच्या मुख्य परिक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या मॉक मुलाखतीचे आयोजन शनिवार 23 व रविवार 24 सप्टेंबर रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे केले आहे. मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोफाइलची प्रत सेतू समिती अभ्यासिका किंवा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड याठिकाणी 22 सप्टेंबरपर्यंत जमा करुन आपली नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेतंर्गत या मॉक मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा. पुणे येथील प्रा. मनोहर भोळे यांचे मुलाखत विषयीचे मार्गदर्शन सत्र होणार आहे.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. यादिवशी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत व रविवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून मॉक मुलाखती घेतल्या जातील. मुलाखत मंडळामध्ये प्रा. मनोहर भोळे, पोलिस उपअधिक्षक अशोक बनकर, उपअधिक्षक भूमि अभिलेख बळवंत मस्के, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, पोलिस उपनिरिक्षक बालाजी चंदेल, अप्पर कोषागार अधिकारी विशाल हिवरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांचा समावेश आहे.

000000
शेतकऱ्यांना कपाशीवरील शेंदरी बोंडअळी
 नियंत्रणाच्या मार्गदर्शनासाठी तालुकास्तरावर मेळावे  
नांदेड दि. 19 :- कपाशीवर शेंदरी बोंड अळीमुळे होणारे नुकसान कमी करण्याच्या हेतुने प्रकल्प संचालक (आत्मा) कृषि विभाग नांदेड व Monsanto कंपनीच्या सहकार्याने जिल्हामध्ये व्यापक प्रमाणात शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मोहिम स्वरुपात कार्यक्रम घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. यासाठी तालुकानिहाय शेतकरी मेळाव्यात जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहान नांदेडचे प्रकल्प संचालक (आत्मा) एम. टी. गोडेंस्वार यांनी केले आहे.
मागील दोन वर्षापासून शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कपाशीचे मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे प्रमुख कारण हे बीटी कपाशीच्या वाणाची लागवड करताना रेफ्युजी पीकाची लागवड न करणे हे होय. कापुस बीटी बियाण्यासोबत 120 ग्रॅमचे नॉन बीटी वाणाचे बियाणे उपलब्ध करुन दिले जाते. याची लागवड बीटी वाणांच्या चारही बाजुनी करणे आवश्यक असते.  
यासाठी पुढीलप्रमाणे तालुकानिहाय शेतकरी मेळावे घेण्याचे नियोजन आहे. नायगाव (23, 25,27,29 सप्टेंबर व 2 ऑक्टोंबर 2017), धर्माबाद (24, 26, 28, 29 सप्टेंबर व 1 ऑक्टोंबर), बिलोली (23, 25,27,29 सप्टेंबर व 2 ऑक्टोंबर), देगलूर (24, 26, 28, 29 सप्टेंबर व 1 ऑक्टोंबर), मुखेड ( 24, 26, 28, 29 सप्टेंबर व 1 ऑक्टोंबर), नांदेड (3, 5, 7, 9, 11 ऑक्टोंबर) , मुदखेड ( 2, 4, 6, 8, 10 ऑक्टोंबर) , अर्धापूर ( 3, 5, 7, 9, 10 ऑक्टोंबर) , कंधार ( 4, 6, 8, 11, 13 ऑक्टोंबर) , लोहा ( 3, 5, 7, 9, 11 ऑक्टोंबर) , किनवट (11, 13, 15, 17, 18 ऑक्टोंबर) ,  हदगाव (7, 9, 11, 13, 15 ऑक्टोंबर) , माहूर (11, 13, 15, 17, 18 ऑक्टोंबर), हिमायतनगर (7, 9, 11, 13, 15 ऑक्टोंबर),  भोकर (11, 13, 15, 17 व 18 ऑक्टोंबर) , उमरी (9, 11, 13, 15, 16 ऑक्टोंबर 2017) तालुकानिहाय दिनांकानुसार शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000
खत विक्रेत्यांना ई-पॉस मशीनद्वारे
खत विक्री बंधनकारक
नांदेड दि. 19 :- बहुतांश ठिकाणी जुन्याच पध्दतीने खतांची विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हयात 1 ऑक्टोंबर 2017 पासून डी.बी.टी. योजनेनुसार खत वाटप होणार आहे. तरी कृषि सेवा केंद्र चालकांनी ई-पॉस मशिनद्वारेच खताची विक्री करण्यात यावी. जर चुकीच्या पध्दतीने विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित खत विक्रेत्याचा परवान्यावर कारवाई करण्यात येईल. सर्व खतकंपनी प्रतिनिधी, घाऊक विक्रेते यांनी आपले मार्फत वितरीत होणारे खते हे ई-पॉस मशीनद्वारेच विक्री होतील याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
खत वाटपामध्ये पारदर्शकता यावी, अनुदानीत खत लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचावे यासाठी शासनाकडून खत वितरणात थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) पध्दत सुरु केली आहे. डी.बी.टी.द्वारे रासायनिक खत विक्री प्रणालीबाबत मार्च 2017 पासून वेळोवेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ई-पॉस मशिन हाताळणी बाबतचे सविस्तर प्रशिक्षण खत विक्रेते यांना देण्यात आले होते. तालुका व जिल्हास्तरावर डी.बी.टी. Workig Group ची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हयात नोंदणीकृत खत विक्रेत्यासाठी 504 ई-पॉस मशिनचा पुरवठा झाला असून त्याचे वाटप मागील तीन महिन्यापूर्वीच करण्यात आले आहे. तसेच अतिरिक्त 650 मशिनची मागणी अध्यक्ष डी.बी.टी. Workig Group तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत नोंदविण्यात आली आहे. संचालक (निवगुनि) कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी डी.बी.टी. द्वारे रासायनिक खत विक्री प्रणालीबाबत व्हीडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली.  1 ऑक्टोंबर 2017 पासून राज्यात Go Live सुरु होणार आहे. त्यामुळे खत कंपनीला मिळणारे खताचे अनुदान हे पीओएस मशिनद्वारे झालेल्या खत विक्रीसच मिळणार आहे.
जिल्हयातील ज्या खत विक्रेत्यांना पीओएस मशिन प्राप्त झालेल्या आहे. त्यांनी मशिनद्वारेच खताची विक्री करावी जर मशिनद्वारे खत विक्री न केल्याचे आढळून आल्यास त्यांचे खत परवाने निलंबित करण्यात येतील. घाऊक खत विक्रेत्यांनी किरकोळ खत विक्रेते हे मशिनद्वारेच खताची विक्री करतात याची  खात्री करावी. खत कंपनी प्रतिनिधींनी आपले कंपनीद्वारे पुरवठा केलेले खते ही मशिनद्वारे विक्री होतात की नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा कंपनीस खताचे अनुदान मिळणार नाही यास संबंधित कंपनीचे प्रतिनिधी जबाबदार राहतील. ई-पॉस मशिन हाताळणी बाबत अडचण उदभवल्यास आर.सी.एफ कंपनीचे अधिकारी श्री. साखरे मो. 9822993624, कोरोमंडल कंपनीचे संजय कुमार मो 7028088015, व्हिजेन्टेक कंपनीचे श्री. अविनाश- मो. 9970210895, तसेच संबंधित तालुक्याचे कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अडचणी दूर करण्यात याव्यात. जिल्हयात खताचे वितरण सुयोग्यरित्या होईल यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000
ग्रामपंचायत मतदानासाठी
7 ऑक्टोंबरला स्थानिक सुट्टी 
नांदेड दि. 19 :- ग्रामपंचायत निवडणुका जेथे नियोजित आहेत तेथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील 171 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, त्या मर्यादीत क्षेत्रापुरती शनिवार 7 ऑक्टोंबर रोजी स्थानिक सुट्टीची अधिसुचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढली आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबर ते डिसेंबर 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 171 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक मतदानाचा दिवस हा कार्यालयीन कामाचा दिवस असल्याने ही स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

00000
किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत मतदानासाठी
23 ऐवजी 26 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर 
नांदेड दि. 19 :- किनवट तालुक्यातील भिमपूर / सिरमेटी, जरुर, मारेगाव (व), पिपरफोडी येथील ग्रामपंचायत क्षेत्रात सार्वत्रिक व रिक्त पदाच्या पोट निवडणुकीसाठी शनिवार 23 सप्टेंबर 2017 रोजीची स्थानिक सुट्टी रद्द करुन त्याऐवजी मंगळवार 26 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे.
या क्षेत्रात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुक आयोगाच्या सुधारीत आदेशान्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी या मर्यादीत क्षेत्रापुरती मंगळवार 26 सप्टेंबर 2017 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

00000

  वृत्त क्रमांक दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा! • चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्...