Friday, October 16, 2026

 वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात 18 ऑक्टोबरला ‘येलो अलर्ट’

 

  • वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता
  • नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

नांदेड(जिमाका), दि. 16: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 18 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

विजा चमकत असताना नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. जवळपास सुरक्षित निवारा उपलब्ध नसल्यास सखल जागी जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. बाल्कनी, छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. विजेचे खांब, तारांचे कुंपण, लोखंडी वस्तू आणि उंच झाडांपासून दूर राहावे. पाण्यात असल्यास तातडीने बाहेर पडावे. घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावीत.

 

विजांच्या कडकडाटात विशेष खबरदारी घ्या

 

विजांचा कडकडाट सुरू असताना दूरध्वनीचा वापर, शॉवरखाली अंघोळ करणे, नळ किंवा पाण्याच्या पाइपलाइनला स्पर्श करणे तसेच विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. धातूंच्या आधारावर उभारलेल्या तंबू किंवा शेडमध्ये आश्रय घेऊ नये. उंच झाडाखाली अथवा धातूच्या उंच मनोऱ्याजवळ थांबणे धोकादायक ठरू शकते. घरात असतानाही उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहणे टाळावे.

हवामानातील संभाव्य बदल लक्षात घेऊन शेतकरी, शेतमजूर, प्रवासी आणि मोकळ्या जागेत काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*****

 वृत्त क्रमांक

बालमृत्यू रोखण्यासाठी दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे- मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे निर्देश

 

  • किनवट, माहूरमधील माता-बाल आरोग्यसेवेचा घेतला आढावा

 

नांदेड(जिमाका), दि. 16  : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. माता-बालमृत्यू रोखण्यासाठी तसेच बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून नियमित क्षेत्रीय निरीक्षण करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली गाभा समितीची आढावा बैठक झाली. या बैठकीत किनवट व माहूर तालुक्यांतील दुर्गम भागातील आरोग्यसेवा, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, माता-बाल आरोग्य, कुपोषण प्रतिबंध आणि विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किनवट व माहूर तालुक्यांतील प्रत्येक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. आजारी विद्यार्थ्यांना तातडीने उपचार, समुपदेशन आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भसेवा उपलब्ध करून द्यावी. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असलेल्या गर्भवती व मातांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांची नियमित तपासणी, औषधोपचार आणि शासकीय योजनांचा लाभ सुनिश्चित करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिल्या.

नवसंजीवनी क्षेत्रातील गर्भवती मातांची अद्ययावत यादी प्रत्येक आरोग्य संस्थेत उपलब्ध ठेवून त्यांना ‘माहेरघर’ योजनेचा वेळेत लाभ द्यावा. शंभर टक्के संस्थात्मक प्रसूती आणि आवश्यक संदर्भसेवा सुनिश्चित करावी. तसेच आरोग्य व महिला-बालविकास विभागाने समन्वयाने मोहीम राबवून तीव्र व मध्यम तीव्र कुपोषित बालकांचा शोध घ्यावा. त्यांची तातडीने तपासणी, उपचार आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भसेवा उपलब्ध करून द्यावी. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देऊन योजनांच्या अंमलबजावणीचे निरीक्षण करावे आणि प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नेवले, महिला व बालकल्याण अधिकारी डॉ. प्रशांत थोरात, आरोग्य सेवा उपसंचालक (कुष्ठरोग) डॉ. बालन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी, किनवट व माहूरचे तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माता-बालमृत्यू प्रतिबंध, बालकांचे आरोग्य संवर्धन आणि दुर्गम भागातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

*****

 वृत्त क्रमांक

चारा पिकांच्या अवशेषांच्या विक्री-वितरणाबाबत सुधारित आदेश

पशुधनासाठी चारा राखून ठेवूनच कुटार विक्रीस परवानगी

 

 

नांदेड (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याने संभाव्य चाराटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. पशुधनासाठी स्थानिक पातळीवर पुरेसा चारा उपलब्ध राहावा आणि चाराटंचाईच्या काळात पशुपालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी चारा पिकांच्या अवशेषांच्या विक्री व वाहतुकीबाबतच्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबत सुधारित आदेश निर्गमित केला आहे.

पूर्वीच्या आदेशात चारा पिकांच्या अवशेषांची विक्री व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता या आदेशात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.

पशुधन नसलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील कुटार प्रथम परिसरातील पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत विचारणा करावी. त्यानंतर उर्वरित कुटार बायोमास ब्रिकेट, पेलेट निर्मिती किंवा इतर उद्योगांना देता येईल.

पशुधन असलेल्या शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या पशुधनासाठी आवश्यक कुटाराची व्यवस्था करून ठेवावी. त्यानंतर उर्वरित कुटार विक्रीसाठी उपलब्ध करून देता येईल. यासाठी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र तालुकास्तरीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.

बायोमास ब्रिकेट व पेलेट निर्मिती उद्योगांसाठीही सुधारित तरतूद करण्यात आली असून, दररोज प्राप्त होणाऱ्या कुटारापैकी किमान 50 टक्के साठा शासनाच्या आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या राखीव साठ्याची माहिती जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, नांदेड तसेच निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे वेळोवेळी सादर करावी.

दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी निर्गमित आदेशातील इतर सर्व तरतुदी कायम ठेवून हा सुधारित आदेश तात्काळ प्रभावाने लागू राहील.

*******

 वृत्त क्रमांक

रब्बी हंगामात कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या

 


  • ऊस, गहू, मका, चिया पिकांची लागवड टाळण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यात परतीचा पाऊस झालेला नसल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, भूजल पातळीत सरासरी 2.5 मीटरने घट झाली आहे. आगामी रब्बी हंगामातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी ऊस, गहू, मका, चिया यांसारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळावी. त्याऐवजी जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा आणि सिंचनासाठी उपलब्ध पाणी यांचा विचार करून पिकांची निवड करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

संभाव्य एल निनोचा प्रभाव, पावसातील अनिश्चितता आणि पाणी उपलब्धतेचा विचार करता शेतकऱ्यांनी केवळ अंदाजांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष पर्जन्यमान व पाण्याची उपलब्धता यांचे मूल्यमापन करावे. मध्यम काळ्या जमिनीत उपलब्ध ओलावा व मर्यादित पाण्यानुसार करडई, हरभरा आणि रब्बी ज्वारी या पिकांना प्राधान्य द्यावे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास पेरणीची घाई करू नये. तसेच कोरडवाहू शेतीसाठी शिफारस केलेल्या वाणांचीच लागवड करावी.

कमी पाण्यात घेता येणाऱ्या करडई पिकासाठी मराठवाड्यात परभणी सुवर्णा (पीबीएनएस-154), परभणी कुसुम (पीबीएनएस-12) आणि विद्यापीठाच्या अधिकृत शिफारशीनुसार पीबीएनएस-86 (पूर्णा) या वाणांचा विचार करावा. खोल काळ्या जमिनीत चांगला अवशिष्ट ओलावा उपलब्ध असल्यास रब्बी ज्वारीची लागवड करावी. यासाठी परभणी सुपर मोती (एसपीव्ही-2407), परभणी मोती (एसपीव्ही-1411) आणि पीकेव्ही क्रांती या वाणांची स्थानिक शिफारशीनुसार निवड करावी.

जमिनीत पुरेसा ओलावा असलेल्या क्षेत्रात हरभरा हे महत्त्वाचे कडधान्य पीक ठरू शकते. विजय, दिग्विजय, आकाश आणि जाकी-9218 या वाणांपैकी स्थानिक परिस्थिती, पीक कालावधी, कोरडवाहू लागवडीची उपयुक्तता आणि विद्यापीठाच्या शिफारशींनुसार योग्य वाण निवडावा. आगामी रब्बी हंगामातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करावा आणि जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा व सिंचनाची स्थिती यानुसार पीक नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

*****

 

 वृत्त क्रमांक

दुष्काळजन्य परिस्थितीत चारा उपलब्धतेसाठी 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे

 

  • सिंचनाची सुविधा असलेल्या पशुपालकांनी गुगल फॉर्मद्वारे अर्ज करावेत

 

नांदेड (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यातील सद्यस्थितीतील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे तसेच संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र पशुपालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

ज्या पशुपालकांकडे वैरण पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे आणि जे वैरण पिकांची लागवड करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe6XnKi3XNZSK0yvbi1o3gQF29jgSRvjwIvwHC2UxmwE6FVJA/viewform?usp=header या गुगल फॉर्मद्वारे आपली माहिती व अर्ज सादर करावा.

 

अर्जासाठी आवश्यक बाबी

 

पशुपालकाकडे वैरण पिकांच्या लागवडीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. वैरण पिकांची लागवड करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. इच्छुक पशुपालकांनी दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करावा.

दुष्काळजन्य परिस्थितीत पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध राहावा, यासाठी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून वैरण पिकांची लागवड करण्याचे नियोजन पशुपालकांनी आतापासूनच करावे. या उपक्रमामुळे संभाव्य चाराटंचाईच्या काळात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन वैरण लागवडीचे नियोजन करावे आणि 100 टक्के अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या वैरण बियाण्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.

******

 वृत्त क्रमांक

विधान परिषद निवडणुकीत मतदान करताना नियमांचे पालन करा

 

·         प्रथम पसंतीच्या उमेदवारासमोर ‘1’ हा अंक लिहिणे अनिवार्य

·         मत नोंदविताना जांभळ्या स्केच पेनचाच वापर करा

 

नांदेड (जिमाका), दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे.

या निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रमानुसार मतदान केले जाणार आहे. मतदानासाठी आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे आवश्यक आहे. मतदारांनी मतदानाची पद्धत समजून घेऊन पुढील सूचनांचे पालन करावे.

मतदानाची पद्धत व महत्त्वाच्या सूचना

1. मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेननेच मत नोंदवावे. अन्य पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन वापरू नये.

2. प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम’ या स्तंभात ‘1’ हा अंक लिहावा. हा अंक केवळ एका उमेदवारासमोरच लिहावा.

3. उमेदवारांची संख्या कितीही असली, तरी केवळ एका उमेदवाराच्या नावासमोरच ‘1’ हा अंक लिहावा.

4. इतर उमेदवारांना पसंती द्यायची असल्यास त्यांच्या नावासमोर अनुक्रमे ‘2’, ‘3’, ‘4’ इत्यादी अंक लिहिता येतील. इतर पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या एकूण संख्येइतके पसंतीक्रम नोंदविता येतात.

5. प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर एकच पसंतीक्रम लिहावा. एकच पसंतीक्रम एकापेक्षा अधिक उमेदवारांसाठी वापरू नये. पसंतीक्रम शब्दांत (एक, दोन, तीन इत्यादी) न लिहिता मान्यताप्राप्त अंकांमध्ये दर्शवावा.

6. पसंतीक्रम दर्शविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपातील भारतीय अंक, रोमन अंक किंवा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता प्राप्त असलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंक वापरता येतात.

7. मतपत्रिकेवर स्वाक्षरी, आद्याक्षरे, स्वतःचे नाव किंवा इतर कोणतेही शब्द लिहू नयेत. अंगठ्याचा ठसाही उमटवू नये.

8. पसंती दर्शविण्यासाठी ‘टिक’ (√) किंवा ‘क्रॉस’ (X) अशी खूण करू नये. अशी खूण असलेली मतपत्रिका अवैध ठरते.

मतपत्रिका वैध ठरण्यासाठी किमान एका उमेदवाराच्या नावासमोर ‘1’ हा अंक लिहून प्रथम पसंती नोंदविणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान करण्यापूर्वी मतदारांनी वरील सूचनांची नोंद घ्यावी व योग्य पद्धतीने मतदान करावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

******

Thursday, October 15, 2026

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य #निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यकतेनुसार नाव नोंदणी किंवा दुरुस्तीच्या अनुषंगाने दि २६ ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. विशेष शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि इतर आवश्यक प्रक्रियांबाबत मार्गदर्शन व मदत करतील . मतदार यादीत नाव समावेशन करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ भरता येतो. मतदार यादीतील नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ७ वापरावा. तसेच निवासस्थानातील बदल, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती, नवीन मतदार ओळखपत्र (EPIC) मिळविणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ८ भरता येतो.

मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती ही वर्षभर सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पात्र नवीन मतदार किंवा प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांना नमुना अर्ज क्रमांक ६ द्वारे नोंदणी करता येईल. नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि तपशील तपासून आवश्यक अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार यादी तपासणे, नमुना अर्ज क्रमांक ६ भरणे किंवा नोंदणी प्रक्रियेसंदर्भात काही अडचण अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी ‘१९५०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कार्यालयीन वेळेत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय मदत केंद्र किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या मदत केंद्राशी संपर्क साधता येईल.

जिल्हानिहाय मतदार हेल्पलाइन आणि मदत केंद्रांचा सविस्तर तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/.../Districtvoterh... या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा आणि २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

#ECI 

गोरठा येथे चारा टंचाईच्या वृत्ताची प्रत्यक्ष पाहणीत पडताळणी

  गोशाळेत पुरेशा प्रमाणात कडबा व सोयाबीन कुटार उपलब्ध वस्तुस्थितीची पडताळणी करण्याचे आवाहन नांदेड(जिमाका), दि. १८ : उमरी तालुक्यातील मौजे गो...