Friday, October 16, 2026

 वृत्त क्रमांक

चारा पिकांच्या अवशेषांच्या विक्री-वितरणाबाबत सुधारित आदेश

पशुधनासाठी चारा राखून ठेवूनच कुटार विक्रीस परवानगी

 

 

नांदेड (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याने संभाव्य चाराटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. पशुधनासाठी स्थानिक पातळीवर पुरेसा चारा उपलब्ध राहावा आणि चाराटंचाईच्या काळात पशुपालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी चारा पिकांच्या अवशेषांच्या विक्री व वाहतुकीबाबतच्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबत सुधारित आदेश निर्गमित केला आहे.

पूर्वीच्या आदेशात चारा पिकांच्या अवशेषांची विक्री व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता या आदेशात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.

पशुधन नसलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील कुटार प्रथम परिसरातील पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत विचारणा करावी. त्यानंतर उर्वरित कुटार बायोमास ब्रिकेट, पेलेट निर्मिती किंवा इतर उद्योगांना देता येईल.

पशुधन असलेल्या शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या पशुधनासाठी आवश्यक कुटाराची व्यवस्था करून ठेवावी. त्यानंतर उर्वरित कुटार विक्रीसाठी उपलब्ध करून देता येईल. यासाठी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र तालुकास्तरीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.

बायोमास ब्रिकेट व पेलेट निर्मिती उद्योगांसाठीही सुधारित तरतूद करण्यात आली असून, दररोज प्राप्त होणाऱ्या कुटारापैकी किमान 50 टक्के साठा शासनाच्या आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या राखीव साठ्याची माहिती जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, नांदेड तसेच निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे वेळोवेळी सादर करावी.

दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी निर्गमित आदेशातील इतर सर्व तरतुदी कायम ठेवून हा सुधारित आदेश तात्काळ प्रभावाने लागू राहील.

*******

 वृत्त क्रमांक

रब्बी हंगामात कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या

 


  • ऊस, गहू, मका, चिया पिकांची लागवड टाळण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यात परतीचा पाऊस झालेला नसल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, भूजल पातळीत सरासरी 2.5 मीटरने घट झाली आहे. आगामी रब्बी हंगामातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी ऊस, गहू, मका, चिया यांसारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळावी. त्याऐवजी जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा आणि सिंचनासाठी उपलब्ध पाणी यांचा विचार करून पिकांची निवड करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

संभाव्य एल निनोचा प्रभाव, पावसातील अनिश्चितता आणि पाणी उपलब्धतेचा विचार करता शेतकऱ्यांनी केवळ अंदाजांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष पर्जन्यमान व पाण्याची उपलब्धता यांचे मूल्यमापन करावे. मध्यम काळ्या जमिनीत उपलब्ध ओलावा व मर्यादित पाण्यानुसार करडई, हरभरा आणि रब्बी ज्वारी या पिकांना प्राधान्य द्यावे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास पेरणीची घाई करू नये. तसेच कोरडवाहू शेतीसाठी शिफारस केलेल्या वाणांचीच लागवड करावी.

कमी पाण्यात घेता येणाऱ्या करडई पिकासाठी मराठवाड्यात परभणी सुवर्णा (पीबीएनएस-154), परभणी कुसुम (पीबीएनएस-12) आणि विद्यापीठाच्या अधिकृत शिफारशीनुसार पीबीएनएस-86 (पूर्णा) या वाणांचा विचार करावा. खोल काळ्या जमिनीत चांगला अवशिष्ट ओलावा उपलब्ध असल्यास रब्बी ज्वारीची लागवड करावी. यासाठी परभणी सुपर मोती (एसपीव्ही-2407), परभणी मोती (एसपीव्ही-1411) आणि पीकेव्ही क्रांती या वाणांची स्थानिक शिफारशीनुसार निवड करावी.

जमिनीत पुरेसा ओलावा असलेल्या क्षेत्रात हरभरा हे महत्त्वाचे कडधान्य पीक ठरू शकते. विजय, दिग्विजय, आकाश आणि जाकी-9218 या वाणांपैकी स्थानिक परिस्थिती, पीक कालावधी, कोरडवाहू लागवडीची उपयुक्तता आणि विद्यापीठाच्या शिफारशींनुसार योग्य वाण निवडावा. आगामी रब्बी हंगामातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करावा आणि जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा व सिंचनाची स्थिती यानुसार पीक नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

*****

 

 वृत्त क्रमांक

दुष्काळजन्य परिस्थितीत चारा उपलब्धतेसाठी 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे

 

  • सिंचनाची सुविधा असलेल्या पशुपालकांनी गुगल फॉर्मद्वारे अर्ज करावेत

 

नांदेड (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यातील सद्यस्थितीतील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे तसेच संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र पशुपालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

ज्या पशुपालकांकडे वैरण पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे आणि जे वैरण पिकांची लागवड करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe6XnKi3XNZSK0yvbi1o3gQF29jgSRvjwIvwHC2UxmwE6FVJA/viewform?usp=header या गुगल फॉर्मद्वारे आपली माहिती व अर्ज सादर करावा.

 

अर्जासाठी आवश्यक बाबी

 

पशुपालकाकडे वैरण पिकांच्या लागवडीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. वैरण पिकांची लागवड करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. इच्छुक पशुपालकांनी दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करावा.

दुष्काळजन्य परिस्थितीत पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध राहावा, यासाठी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून वैरण पिकांची लागवड करण्याचे नियोजन पशुपालकांनी आतापासूनच करावे. या उपक्रमामुळे संभाव्य चाराटंचाईच्या काळात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन वैरण लागवडीचे नियोजन करावे आणि 100 टक्के अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या वैरण बियाण्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.

******

 वृत्त क्रमांक

विधान परिषद निवडणुकीत मतदान करताना नियमांचे पालन करा

 

·         प्रथम पसंतीच्या उमेदवारासमोर ‘1’ हा अंक लिहिणे अनिवार्य

·         मत नोंदविताना जांभळ्या स्केच पेनचाच वापर करा

 

नांदेड (जिमाका), दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे.

या निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रमानुसार मतदान केले जाणार आहे. मतदानासाठी आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे आवश्यक आहे. मतदारांनी मतदानाची पद्धत समजून घेऊन पुढील सूचनांचे पालन करावे.

मतदानाची पद्धत व महत्त्वाच्या सूचना

1. मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेननेच मत नोंदवावे. अन्य पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन वापरू नये.

2. प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम’ या स्तंभात ‘1’ हा अंक लिहावा. हा अंक केवळ एका उमेदवारासमोरच लिहावा.

3. उमेदवारांची संख्या कितीही असली, तरी केवळ एका उमेदवाराच्या नावासमोरच ‘1’ हा अंक लिहावा.

4. इतर उमेदवारांना पसंती द्यायची असल्यास त्यांच्या नावासमोर अनुक्रमे ‘2’, ‘3’, ‘4’ इत्यादी अंक लिहिता येतील. इतर पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या एकूण संख्येइतके पसंतीक्रम नोंदविता येतात.

5. प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर एकच पसंतीक्रम लिहावा. एकच पसंतीक्रम एकापेक्षा अधिक उमेदवारांसाठी वापरू नये. पसंतीक्रम शब्दांत (एक, दोन, तीन इत्यादी) न लिहिता मान्यताप्राप्त अंकांमध्ये दर्शवावा.

6. पसंतीक्रम दर्शविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपातील भारतीय अंक, रोमन अंक किंवा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता प्राप्त असलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंक वापरता येतात.

7. मतपत्रिकेवर स्वाक्षरी, आद्याक्षरे, स्वतःचे नाव किंवा इतर कोणतेही शब्द लिहू नयेत. अंगठ्याचा ठसाही उमटवू नये.

8. पसंती दर्शविण्यासाठी ‘टिक’ (√) किंवा ‘क्रॉस’ (X) अशी खूण करू नये. अशी खूण असलेली मतपत्रिका अवैध ठरते.

मतपत्रिका वैध ठरण्यासाठी किमान एका उमेदवाराच्या नावासमोर ‘1’ हा अंक लिहून प्रथम पसंती नोंदविणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान करण्यापूर्वी मतदारांनी वरील सूचनांची नोंद घ्यावी व योग्य पद्धतीने मतदान करावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

******

Thursday, October 15, 2026

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य #निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यकतेनुसार नाव नोंदणी किंवा दुरुस्तीच्या अनुषंगाने दि २६ ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. विशेष शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि इतर आवश्यक प्रक्रियांबाबत मार्गदर्शन व मदत करतील . मतदार यादीत नाव समावेशन करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ भरता येतो. मतदार यादीतील नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ७ वापरावा. तसेच निवासस्थानातील बदल, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती, नवीन मतदार ओळखपत्र (EPIC) मिळविणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ८ भरता येतो.

मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती ही वर्षभर सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पात्र नवीन मतदार किंवा प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांना नमुना अर्ज क्रमांक ६ द्वारे नोंदणी करता येईल. नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि तपशील तपासून आवश्यक अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार यादी तपासणे, नमुना अर्ज क्रमांक ६ भरणे किंवा नोंदणी प्रक्रियेसंदर्भात काही अडचण अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी ‘१९५०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कार्यालयीन वेळेत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय मदत केंद्र किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या मदत केंद्राशी संपर्क साधता येईल.

जिल्हानिहाय मतदार हेल्पलाइन आणि मदत केंद्रांचा सविस्तर तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/.../Districtvoterh... या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा आणि २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

#ECI 

वृत्त क्रमांक

महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणातून शेतीला नवी दिशा !

• नांदेडमध्ये ‘महिला किसान दिन 2026’ कार्यशाळा; 16 तालुक्यांतील 290 महिला शेतकरी व कृषी सखींचा सहभाग

नांदेड(जिमाका), दि. 15: शेतीतील महिलांचे योगदान अधोरेखित करत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतीपूरक उद्योग, मूल्यवर्धन आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने ‘महिला किसान दिन 2026’ निमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नांदेड आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील 16 तालुक्यांमधील 290 महिला शेतकरी व कृषी सखी सहभागी झाल्या.
शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नऊ महिला शेतकऱ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दत्तकुमार कळसाईत यांनी प्रास्ताविकात शेती क्षेत्रातील महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले. महिलांनी पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान, शेतीपूरक व्यवसाय आणि कृषिमालाच्या मूल्यवर्धनाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महिला शेतकऱ्यांचा सन्मान; उद्योग व स्वावलंबनावर भर
नांदेड, मुखेड आणि उमरी तालुक्यांतील महिला शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘महिला शेतकरी प्रमाणपत्रां’चे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र नोंदणी मोहिमेत विशेष पुढाकार घेऊन सर्वाधिक नोंदणी घडवून आणल्याबद्दल कंधार तालुक्यातील गऊळ येथील सौ. शिवकांता ज्ञानेश्वर हेंडगे आणि लोहा तालुक्यातील दापशेड येथील सौ. वैष्णवी विश्वनाथ होळगे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवनवार यांनी गृहउद्योग, प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी येथील विषय विशेषज्ञ सौ. अलका पवळे-पाटील यांनी महिलांचे आरोग्य, पोषण आणि संतुलित आहाराचे महत्त्व विशद केले. कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील शास्त्रज्ञ सौ. प्रियंका खोले यांनी सूक्ष्म सिंचन, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.
जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक उद्योग अधिकारी अरविंद हांडे यांनी महिलांसाठीच्या शासकीय उद्योग योजना, अनुदान आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली. कापूस संशोधन केंद्राचे तज्ज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी अवर्षणप्रवण परिस्थितीत उपयुक्त ठरणाऱ्या करडई पिकाचे सुधारित वाण, लागवड तंत्रज्ञान आणि खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका सौ. स्वाती बहीणजी यांनी ‘योगिक शेती’ संकल्पनेतून आत्मिक बळ, मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व स्पष्ट करत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किनवटचे तालुका तंत्र व्यवस्थापक शिवप्रकाश पटवे यांनी केले, तर आत्माच्या प्रकल्प उपसंचालक अर्चना गुंजकर यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी जिल्ह्यातील तालुका तंत्र व्यवस्थापक, सहाय्यक तालुका तंत्र व्यवस्थापक तसेच आत्मा, पोकरा आणि स्मार्ट प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
***




वृत्त क्रमांक

सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

• महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

नांदेड(जिमाका), दि. 15: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड येथील सांस्कृतिक सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नांदेड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नांदेड आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, शिवानंद मिनगीरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान प्राप्त नॅशनल यूथ आयकॉन मुरलीधर हंबर्डे, प्रा. डॉ. सागर कुलकर्णी, प्रा. डॉ. संदीप काळे तसेच समाज कल्याण निरीक्षक पी. जी. खानसोळे, एन. जे. शेख, एम. एन. जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सेवा संकल्प अभियानांतर्गतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचा निकाल मान्यवरांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. प्रास्ताविकात शिवानंद मिनगीरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी आणि त्यांच्या वक्तृत्व कौशल्याला वाव मिळावा, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने आणि मेहनतीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक शिवराज गायकवाड यांनी केले, तर मुख्याध्यापक एन. जे. शेख यांनी आभार मानले. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

***



  वृत्त क्रमांक शेतकऱ्यांसाठी 24 तास वीज तक्रार हेल्पलाईन   रोहित्र बिघाड , कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास 8087052830 वर सं...