Tuesday, October 27, 2026

वृत्त क्रमांक

डाक जीवन विमा प्रतिनिधी होण्याची सुवर्णसंधी

नांदेड डाक विभागात 30 ऑक्टोबरला थेट मुलाखती

नांदेड, दि. 27 : भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) योजनांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड डाक विभागाकडून थेट विमा प्रतिनिधी (डायरेक्ट एजंट) पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवार, दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत अधीक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग, नांदेड येथे घेण्यात येणार आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. केंद्र किंवा राज्य शासनाने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. बेरोजगार व स्वयंरोजगार करणारे युवक-युवती, माजी विमा सल्लागार, विमा कंपन्यांचे माजी विमा प्रतिनिधी, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, महिला मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामप्रधान, ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला बचत गटांचे सदस्य यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विम्याविषयीचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान आणि स्थानिक भागाची माहिती या बाबींची तपासणी केली जाईल. निवड झालेल्या उमेदवाराला 5 हजार रुपये सुरक्षा ठेव राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) किंवा किसान विकास पत्र (केव्हीपी) स्वरूपात जमा करावी लागेल.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाची (आयआरडीएआय) परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हा परवाना कायमस्वरूपी करण्यात येईल. ही परीक्षा तीन वर्षांच्या आत उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. ही नियुक्ती परवाना व कमिशन तत्त्वावर राहणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज अधीक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग, नांदेड येथे उपलब्ध करून घ्यावा. भरलेला अर्ज घेऊन दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. यावेळी बायोडाटा, मूळ कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सोबत आणावीत, असे आवाहन अधीक्षक डाकघर, नांदेड विभाग यांनी केले आहे.

****

वृत्त क्रमांक

नांदेड एमआयडीसीत 20.99 लाखांचे संशयित भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

• 9 हजार 744 किलो खाद्यतेलाचा साठा जप्त

• अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई

नांदेड, दि. 27 : ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या अनुषंगाने अन्नपदार्थांतील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि अन्न व औषध प्रशासन, नांदेड यांच्या संयुक्त पथकाने दि. 26 ऑक्टोबर 2026 रोजी नांदेड येथील औद्योगिक वसाहतीतील मे. शिवगंगा ऑईल मिल या खाद्यतेल उत्पादक पेढीवर छापा टाकून 9 हजार 744 किलो संशयित भेसळयुक्त खाद्यतेलाचा एकूण 20 लाख 99 हजार 507 रुपये किमतीचा साठा जप्त केला.

नांदेड एमआयडीसीतील डी-19 येथे असलेल्या मे. शिवगंगा ऑईल मिल या पेढीवर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यावेळी विक्रीसाठी उत्पादित केलेल्या डबल फिल्टर्ड शेंगदाणा तेल, परिष्कृत सोयाबीन तेल आणि परिष्कृत सूर्यफूल तेल या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या खाद्यतेलात भेसळ असल्याच्या संशयावरून संबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई सहआयुक्त (अन्न), छत्रपती संभाजीनगर श्री. करकाळे यांच्या निर्देशानुसार आणि सहायक आयुक्त (अन्न), नांदेड परिमंडळ-1 सु. दा. जिंतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगरचे अन्न सुरक्षा अधिकारी योगेश चिभडे तसेच नांदेडचे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अ. के. दुधाटे आणि स. वि. कनकावाड यांचा समावेश होता.

नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. अन्नपदार्थांतील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी आवश्यक तपासणी व नियमानुसार कारवाई करण्यात येत असून, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

**



वृत्त क्रमांक

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

नांदेड, दि. 27 : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी व अडचणींचे न्याय्य आणि तत्परतेने निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत हा लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. या उपक्रमांतर्गत नागरिकांना आपल्या तक्रारी व अडचणी प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. या दिवशी अर्जांची नोंदणी दुपारी 12.30 वाजल्यापासून सुरू होईल. त्यानंतर प्राप्त अर्ज व निवेदनांवर संबंधित नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे.

लोकशाही दिनासाठी महसूल, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, सहकार, कृषी आणि पाणीपुरवठा विभागांसह विविध विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांशी संबंधित अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. नागरिकांच्या तक्रारी व अडचणी समजून घेऊन त्यांचे शक्य तितक्या लवकर निराकरण करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

नागरिकांनी सोमवार, दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी केले आहे.

****

वृत्त 

मतमोजणी केंद्रातील मीडिया सेंटरला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट!

🗳️ ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ 

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज, दि. २७ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मतमोजणी केंद्राबाहेर प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी उभारण्यात आलेल्या मीडिया सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.

याप्रसंगी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष माधव सावरगावे व विभागातील विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

📸 छायाचित्रे : मीडिया सेंटरला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधताना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व उपस्थित अधिकारी.

000000

#औरंगाबादपदवीधरमतदारसंघ #मतमोजणी२०२६ #MediaCentre #ElectionCounting #ChhatrapatiSambhajinagar


अपडेट : औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी आठ जिल्ह्यातील पदवीधरांनी मतदान केले आहे.मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेत या ठिकाणी निवडणूक निरीक्षक माधवी खोडे चावरे व विभागीय आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी केंद्रावर कार्यरत आहेत








वृत्त  

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रारंभ !

🗳️ सकाळी ७.२५ वाजता स्ट्राँग रूम उघडली; ८ वाजता मतमोजणी सुरू

विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला आज, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे सकाळी ठीक ८ वाजता प्रारंभ झाला.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे-चावरे, निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या उपस्थितीत सकाळी ठीक ७.२५ वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात आली. त्यानंतर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १२८ नुसार मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

विभागातील आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवरील मतपेट्यांच्या प्राथमिक मतमोजणीसाठी ७० टेबलांवर १३ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक, अचूक व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे.

#पदवीधरमतदारसंघ #मतमोजणी२०२६ #AurangabadGraduatesConstituency #ElectionCounting #ChhatrapatiSambhajinagar











वृत्त क्रमांक

निरोगी बालक, सुदृढ समाजासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

• मालेगाव जिल्हा परिषद शाळेत मोहिमेचे उद्घाटन

• जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले व शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांची उपस्थिती

नांदेड, दि. 27 : जागतिक जंतनाशक दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालके व युवकांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्यात आली. अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत राज्यस्तरीय सनियंत्रण अधिकारी डॉ. किरणकुमार वाघमारे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना फुटाणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अल्बेन्डाझोल या जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले.

जंतमुक्त बालके, निरोगी समाजाचा पाया

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी निरोगी आरोग्याचे महत्त्व विशद केले. बालकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांचे शरीर जंतमुक्त असणे आवश्यक आहे. जंतनाशक गोळ्यांच्या सेवनामुळे बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून देत शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम आरोग्य आवश्यक असल्याचे नमूद केले. निरोगी शरीर आणि सुदृढ मन यांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक चांगली प्रगती साधता येते, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. तोटावाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, माध्यम व प्रसार अधिकारी रेणुका दराडे, अर्धापूरचे गटशिक्षणाधिकारी अजित तरवटे, आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. एस. पी. गोखले, लक्ष्मणराव इंगोले, मारोतराव बुट्टे व अनिल इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम सावंत, डॉ. रोहिणी जाधव तसेच मालेगाव जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक पुप्पलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला. यामध्ये शिवा कांबळे, संतोष थोरात, अनिल पिंपळे, एस. एम. पाटील, श्रीकांत शिंदे, अनुजा देशपांडे, मुखडे मॅडम, पवार मॅडम, गणेश शिराळ, अनिता कोंटमवाड, ललिता थोरात, अमोल यादव व पंकज गोरे यांनी सहभाग घेतला.

**





 वृत्त क्रमांक

अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची धडक कारवाई

• नांदेड तालुक्यातील संशयित सावकाराच्या घर व दुकानावर झडती

• हिशेब वह्या व दस्तऐवज तपासणीसाठी ताब्यात

• अवैध सावकारीबाबत गोपनीय तक्रार करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 27 : नांदेड तालुक्यातील वाडी पुयड येथील विनापरवाना अवैध सावकारी व्यवहारासंबंधी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 च्या कलम 16 अंतर्गत संबंधित व्यक्तीच्या राहत्या घरावर व दुकानावर झडतीची कारवाई केली. या कारवाईदरम्यान कथित अवैध सावकारी व्यवहारांशी संबंधित संशयित हिशेब वह्या व दस्तऐवजांच्या प्रती पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

गैरअर्जदार गजानन प्रभाकर कदम, रा. वाडी पुयड, ता. जि. नांदेड यांच्याविरुद्ध दाखल तक्रारीच्या अनुषंगाने दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी ही तपासणी करण्यात आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 च्या कलम 39 अन्वये गुन्हा क्रमांक 1391/2026 नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची कायद्यानुसार पुढील चौकशी करण्यात येणार आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच लातूरचे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे आणि नांदेड येथील उपनिबंधक, सहकारी संस्था किशन फिसके यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. या कारवाईसाठी नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी आवश्यक प्रशासकीय सहकार्य केले.

या पथकात सहकार अधिकारी श्रेणी-1 एम. आर. येवते व बी. बी. बोधगिरे, सहकार अधिकारी श्रेणी-2 जी. यू. कुटे व एस. एन. पटके, मुख्य लिपिक ए. वाय. दीक्षित, सहायक सहकार अधिकारी ए. ए. शिंदे व ए. व्ही. वडेपल्ली तसेच कनिष्ठ लिपिक एस. व्ही. करंजे यांचा समावेश होता. पोलिस विभागाचे संरक्षण आणि पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी विनापरवाना सावकारी व्यवहार करणाऱ्या व्यक्तींबाबतची माहिती सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा जिल्हा निबंधक (सावकारी), नांदेड कार्यालयाकडे किंवा संबंधित तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही सहकार विभागाने कळविले आहे.

 ***

वृत्त क्रमांक नांदेडमध्ये १४ वर्षीय प्रणव मेंडके बेपत्ता ; शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन नांदेड, दि. २८ ऑक्टोबर : नांदेड शहरातील भाग्यनगर प...