Friday, August 2, 2024

 वृत्त क्र 664

शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड दि. 2 ऑगस्ट :- पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे. पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी विहीत कालावधीत आपल्या मोबाईलमध्ये‍ ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची अचूक नोंद करावी, असे आवाहन जिल्हा  प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

क्षेत्रीय स्तरावरुन (Real Time crop data) पीक पाहणी रियल टाइम क्रॉप डाटा संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर डाटा/ माहिती संकलन करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा  सक्रीय सहभाग घेणे,  पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध  करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य‍ प्रकारे मदत करणे शक्य  व्हावे  या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲपचालू करुन त्यात पीक पाहणी नोंदवण्याची नवीन पध्दत शासनाने सुरु केली आहे. 

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सातबारावर विविध पिकाची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे.  महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 1 ऑगस्ट 2024 पासून राज्यभर राबविण्यात येत आहे.  खरीप हंगाम 2024 साठी 1 ऑगस्ट  ते 15 सप्टेंबर 2024 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी 3.0.2 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करून घ्यावे. तसेच ई-पिक पाहणी नोंदणीसाठी काही अडचण आल्यास ई पीक पाहणी राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्षाच्या 020 25712712 क्रमांकावर किंवा आपल्या गावचे तलाठी, कृषी सहाय्यक संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे

00000

 वृत्त क्र 663

मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत

महाडीबीटी पोर्टलवर 6 ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड, दि. 2 ऑगस्ट :- सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत सन 2024-25 मध्ये चालू खरीप हंगामामध्ये निविष्ठा 100 टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील 10 दिवसापासुन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू असुन सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या  कमी प्रमाणात असल्याने 6 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

शंभर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावर लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in - farmer login या वेबसाईटवर 6 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.


अर्ज करणेची पध्दत mahadbt.maharashtra.gov.in - farmer login लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकावा, अर्ज करा बाबीवर क्लिक करणे, कृषि यांत्रिकीकरण, बावी निवडा यावर क्लिक करणे, मुख्य घटक बाबीवर क्लिक करणे, कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, तपशिल बाबीवर क्लिक करून, मनुष्यचलीत औजारे घटक निवडणे, यंत्र/औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करून, पिक संरक्षण औजारे निवडणे, मशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करून बॅटरीसंचलीत फवारणी पंप (गळीतधान्य) निवडणे जतन करा याप्रमाणे आहे.

00000

 विशेष लेख :    दि. 2 ऑगस्ट 2024

 

मरावे परी शरीर मागे उरावे...

आज अवयवदान दिवस

 

शरीर मर्त्य आहे आत्मा अमर आहे... अशी मान्यता आहे. मात्र आता शरीरही अमर होऊ शकते. आपल्या अमूल्य अशा दायित्वाच्या भावनातून शरीराचे अनेक अंग आपण दान करू शकतो. अनेकांना दृष्टी देऊन हजारोंना सृष्टी बघायला कारणीभूत ठरू शकतो. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराची राख करायची की जातानाही दातृत्वाचा परमोच्च आनंद घ्यायचा याचा निर्णय घेणे म्हणजे अवयवदान करणे आहे. जेंव्हा एखादा व्यक्ती किंवा मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या जवळचा नातेवाईक अवयवदान करून गरजू व्यक्तीला ज्याला जगण्यासाठी अवयवांची गरज असते त्याला वैद्यकीय साहित्याच्या माध्यमातून अवयवाची मदत करतात त्याला अवयवदान म्हणतात.

 

18 वर्षावरील कोणताही व्यक्ती आपल्या स्वेच्छेने शासनाला सांगून अवयव दान करू शकतो. व्यक्ती जिवंत असताना स्वत:निर्णय घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला असेल तर त्याच्या जवळचे नातेवाईक त्या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

 

अवयव दान का करावे.. ?

जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की, आपण एके दिवशी जग सोडून जाणार आहोत. आपला मृत्यू अटळ आहे. तो कोणालाही टाळता येणार नाही. आयुष्यभर आपण स्वतःसाठी जगलो. मृत्यूनंतर आपले शरीर जाळून राख करताना देखील आपण तीन क्विंटल लाकडासाठी तेरा वर्षे वयाची झाडे नष्ट करतो. प्रदूषण वाढविण्यात कारणीभूत ठरतो. हे आता परवडणारे नाही. त्यामुळे काही ठिकाणी मृतदेह लाकडाने जाळण्याऐवजी व्हाईट् कोलने जाळला. पुणे, नागपूरने व्हाईट कोलचा प्रयोग यशस्वी केला. पुणे महानगरपालिकेने कोरोना काळात 2019 मध्ये 589 मृतदेह व्हाईट कोलने दहन केले. तसा प्रयोग नांदेड महानगरपालिकेने करावा अशी अपेक्षा आहे.

 

परंपरा, रूढीचे अडथळे दूर सारा 

अवयवादांना दुसरा मोठा अडथळा परंपरा, रुढी, अंधश्रद्धेचा आहे. आपला समाज परंपरा प्रिय असला तरी बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून मानसिकता बदलली तर सर्वांचे कल्याण होईल. शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेला अवयवदानाच्या विषयी प्रचंड गैरसमज आणि अज्ञान आहे. परंपरा आणि रूढीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक अवयदानाविषयी तर्क वितर्क मांडून अवयवदान करण्याला बगल देतात. शिवाय विविध धर्माच्या रीती रिवाजानुसार अंत्यविधीचे प्रकार ही वेगवेगळे आहेत. त्यामुळे अवयवदानाला अडथळे येतात. देशातील सर्वच धर्मगुरूंनी जरी अवयवादानाला समर्थन दिले असले तरी सर्वसामान्य जनतेची मानसिकता सहजासहजी बदलणार नाही. मानसिकता बदलासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचाराची गरज आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामसभेत यासाठी ठराव होणे आवश्यक आहे. शाळांपासून अवयवदानाच्या चर्चेचा विषय मना-मनामध्ये रुजविण्याचे कार्य गरजेचे आहे.

 

अवयव दान तीन प्रकारे करता येते

जीवंतपणी : रक्त, यकृत ,स्वादुपिंड, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि आतड्याचा काही भाग दान केल्या जाऊ शकतो.

नैसर्गिक मृत्यूनंतर : नेत्र आणि त्वचा याशिवाय हृदयाची झडप, त्वचेखालील आवरण, बंद कानातील हाडे, रक्तवाहिन्या दान केल्या जाऊ शकतात.

 

ब्रेनडेथ नंतर : नेत्र पटले, कर्ण पटल, मूत्रपिंड, त्वचा, हाडे, हात, पाय, गर्भाशय, यकृत, हदय स्वादुपिंड आणि आतडे

ब्रेन डेडचा निर्णय घेणारी सरकारी समिती छत्रपती संभाजीनगर येथे आहे. झोनल ट्रान्स प्लांट को-ऑर्डिनेशन समिती पाच तासात रुग्णालयाशी, प्रशासक निवासी डॉक्टर, उपचार करणारे डॉक्टर यांची व्यवस्था करते. ज्यांना अवयवदानाची करण्याची इच्छा आहे त्यांनी या समितीकडे नाव नोंदणी गरजेचे आहे.

 

शासन स्तरावरही प्रयत्न सुरू

1984 ला भारत सरकारने अवयवदानाच्या कार्यालयाला मंजुरी दिल्यानंतर पंधरा वर्षानंतर 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व आणि गरज लक्षात घेऊन देशाला अवयव दानाचे आवाहन केले. त्यांना प्रतिसाद देत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या परिवारासह मुंबईतून या महाअभियानाला सुरूवात केली. राज्यात सध्या अवयवादानासाठी कार्य करणाऱ्या 25 सेवाभावी संस्था आहेत. यामध्ये  फेडरेशन ऑफ ऑरगॅनिक अँड बॉडी डोनेशन या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार आणि सुनील देशपांडे यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल. त्यांनी अवयवदानासाठी नऊ पदयात्रा काढल्या. 4 हजार किलोमीटर प्रवास केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की, प्रत्येक अवयवदात्याच्या अंत्यसंस्काराला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्याला शहिदाचा सन्मान द्यावा. दुखी परिवाराचे सांत्वन करून भावनिक आधार द्यावा. त्यामुळे शासन, प्रशासन या चळवळीच्या पाठीशी आहे. राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांना अवयवादानाची प्रक्रिया सुलभ करावी. प्रत्येक रुग्णालयात अवयवदानाचा स्वतंत्र कक्ष सुरू करून तज्ञाची नेमणूक करावी. लोकांना अवयवदान करण्यासंदर्भातील पत्रे उपलब्ध करून द्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर देखील मोठ्या प्रमाणात यासंदर्भातील जनजागृती होत असून नांदेडमध्ये आम्ही यासाठी झटत आहोत. या आमच्या अवयवदान यज्ञाला आपल्या स्वीकृतीचे दान मिळावे ही अपेक्षा आहे. अत्यंत सोपी पद्धत आहे. आपल्याला स्वतः सुरुवातीला यासंदर्भात स्वीकृती द्यावी लागते. त्यानंतर मृत्यू पश्चात नातेवाईकांनी याबाबत संबंधितांना माहिती देणे आवश्यक आहे.

 

नांदेडची मोहिमेत आगेकूच

17 ऑक्टोंबर 2016 रोजी नांदेड पहिले अवयवदान सुधीर रावळकर यांचे झाले. त्यानंतर 3 जुलै 2024 रोजी अभिजीत ढोकेचे अवयदान झाले. अवयवदानाच्या प्रचारात आपण स्वतःही 2017 पासून वाहून घेतले आहे. या मोहिमेत जिल्ह्याच्या  यशात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची यंत्रणा व शहरातील खासगी वैद्यकीय संस्थांनी देखील आपले दायित्व निभवले आहे. नांदेड मधील एका खाजगी हॉस्पिटलने तर परवा सहावे अवयव दान करून ग्रीन कॉरिडोर यशस्वी केला. शहरातील खासगी हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. नांदेडमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी अवयदानाला स्वीकृती दिली आहे. नांदेडमध्ये सामान्य नागरिकाला कोणालाही अवयव दान करायचे असेल तर आपल्या हयातीत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय विष्णुपुरी याठिकाणी आपला अर्ज देता येतो. आपल्या पश्चात आपल्या नातेवाईकांच्या परवानगीने मृतदेह देण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. यासंदर्भातले स्वतंत्र व विस्तृत लिखाण मी स्वतः केले आहे. याबाबतचे विपुल साहित्य माझ्याकडे उपलब्ध आहे. नागरिकांना ते दिले जाऊ शकते. मात्र या एका अभियानात अगदी शाळकरीवयापासून प्रबोधन होण्याची गरज वाटत असून आजच्या अवयवदान दिनाला याबाबतची वचनबद्धता मनामनात व्हावी हीच अपेक्षा.

 

माधव अटकोरे

ज्येष्ठ पत्रकार, नांदेड

00000




Thursday, August 1, 2024

 


 


मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेत नांदेड जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. माध्यमांसाठी चित्रफीत.

 वृत्त क्र 662 

मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील

युवकांमुळे प्रशासन आणखी गतीमान व्हावे : जिल्हाधिकारी

 

शुक्रवार सायंकाळपर्यंत सर्व विभागांनी आपली मागणी कळवण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 1 ऑगस्ट : राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून तरुण रक्ताचे सुशिक्षित बेरोजगार युवक शासकीय यंत्रणेला मिळणार आहे. युवाशक्तीचा उपयोग प्रशासन आणखीन गतिमान करण्यासाठी करा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांची नियुक्ती, त्यांना द्यावयाची कामे, आणि नव्याने सरकारी आस्थापनावर नियुक्ती होताना घ्यावयाची काळजी, यासंदर्भातील जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी  कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यासहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी सादरीकरण केले. तसेच कशाप्रकारे नियुक्ती करण्यात यावी ऑनलाइन नोंदणी कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी केले.

 

त्यानंतर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने येणारे उमेदवार ही पदभरती नसून युवकांना पुढील आयुष्यात ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी प्रशासन, प्रशासनाचे कार्य आणि प्रशासनाची बांधिलकी याबाबतचे योग्य मत तयार करण्याची संधी आहे. शासनामध्ये काम करताना अनेक कामांसाठी आपले मनुष्यबळ लागत असते काही दुय्यम कामांमध्ये आपले मनुष्यबळ खर्ची होते. शासनाच्या अनेक ऑनलाईन योजना आहेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आहे. त्यांच्या प्रसिद्धीची कामे आहेत.अशा कामांमध्ये या नव्या मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे. येणारे उमेदवार हे आपल्या शासकीय यंत्रणेचे सदस्य नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या कायद्यानुसार पद निहाय कोणतीही कामे देता येणार नाही. मात्र त्यांचे योग्य प्रशिक्षण करणे हे आपले कार्य असून त्यासाठी नियोजन करावे. उद्यापर्यंत सर्व कार्यालयाने या संदर्भात नोंदणी नोंदवावी असे आवाहनही त्यांनी केले.

00000











 वृत्त क्र 661 

  वृत्त क्रमांक दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा! • चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्...