वृत्त क्र 661
जिल्ह्यामध्ये महसूल पंधरवाडा जनसंपर्क अभियान म्हणून राबवा : जिल्हाधिकारी
नांदेड दि. 1 ऑगस्ट : महसूल सप्ताहाचा आता महसूल पंधरवाडा करण्यात आला असून या संपूर्ण पंधरा दिवसांमध्ये राज्य शासनाने दिलेल्या उपक्रमाप्रमाणे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावे. तसेच या सर्व उपक्रमांना सामान्य जनतेला जोडून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
महसूल दिनानिमित्त जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा संदेश देताना त्यांनी हे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आज मंत्रालयातून बैठकीद्वारे संपूर्ण महसूल यंत्रणेला जनतेमध्ये जाऊन काम करण्याचे आदेश दिले आहे. नंतर जिल्ह्यातील सर्व यंत्रणेची संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील पंधरा दिवस 'महसूल पंधरवाडा -24' पथदर्शी योजना आणि जनसंपर्क मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन केले आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपस्थित होते.
महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये एक ऑगस्टला शुभारंभ सप्ताह कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दोन ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना,तीन ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय,पाच ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी,6 ऑगस्ट ला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, तर 7 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 8 ऑगस्ट रोजी महसूल जनसंवाद, 9 ऑगस्ट रोजी महसूल इ प्रणाली, 10 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, 11 ऑगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन 12 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, 13 ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 14 ऑगस्ट रोजी महसूल पंधरवाडा वार्तालाप तर पंधरवड्याचा अखेर असणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ घेण्यात येणार आहे.
पंधरा दिवसांचा हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये व्यवस्थित राबविण्यात यावा, प्रत्येकाने त्याचा अहवाल ठेवावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. प्रत्येक दिवसांसाठी वेगवेगळे कार्यक्रमांचे नियोजन व ते वेगळेपणाने साजरे करणे यावर भर देण्याबाबतही त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे.
0000
No comments:
Post a Comment