Thursday, August 1, 2024

 वृत्त क्र 658

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरु

·         नारीशक्ती दूत ॲपवर भरलेले अर्ज पुन्हा संकेतस्थळावर भरण्याची गरज नाही

नांदेड दि. ऑगस्ट :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी नवीन वेबसाईट (संकेतस्थळ ) सुरू झाले आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य आहे, त्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही पात्र लाभार्थ्याचा अर्ज शेवटी ऑनलाइन करावाच लागतो. तो एक तर स्वतः किंवा यंत्रणेद्वारे ऑनलाईन केला जातो जिल्ह्यामध्ये ज्यांना ऑनलाईन करता येत नाही. त्यांच्यासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र आता संकेतस्थळाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. ज्यामुळे त्वरेने आणि सुलभरीत्या अर्ज अपलोड होतील. जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत जवळपास सहा लाखावर पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. उर्वरित महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने सुरु आहे. या योजनेतील महिलांना अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नयेत यासाठी शासनाच्यावतीने डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन अर्थात www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आजपासून सुरु केले आहे. तरी या योजनेतील पात्र महिलांनी अर्ज भरण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सध्या जिल्ह्यात उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत असून याबाबत जिल्हा यंत्रणा अधिक सक्रीयपणे काम करीत आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना पहिला लाभ रक्षाबंधनाला मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांनी अद्यापपर्यत अर्ज भरला नसेल तर त्यांनी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात केलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्ती दूत ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या संकेतस्थळावर पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही असेही प्रशासनाने कळविले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने सुरु असून अर्ज भरण्यासाठी महिलांनी घाईगडबड करु नये. प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरुन घेण्यात येणार आहे आणि अर्ज भरलेल्या सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेतील अर्जाच्या छाननीचे कामही सुरू असून छाननीनंतर पात्र महिलांची यादी तयार करण्यात येवून महिलांना येत्या रक्षाबंधनापर्यत लाभ देण्याची कार्यवाही होण्याच्या दृष्टीने प्रशासन दक्षता घेत आहे. तरी ज्या महिलांनी अद्यापपर्यत या योजनेचे आपले अर्ज भरले नाहीत त्यांनी आजपासून सुरू केलेल्या www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून आपले अर्ज भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...