Friday, December 20, 2024

​वृत्त क्र. 1222

​​विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी विविध योजना 

नांदेड दि. 20 डिसेंबर :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) या दोन महामंडळाची स्थापना केलेली आहे. ही महामंडळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत कार्यरत असुन त्यांना स्वतंत्र उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. 

या तिन्ही महामंडळांअंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, रुपये एक लाख थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यायातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ ( मर्या.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड. फोन क्र. 02462-220244 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे. 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना  

या योजनेची मर्यादा 10 लाख रु. पर्यंत असुन अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. योजना ही ऑनलाईन असून याकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, वयाचा पुरावा संबंधित व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल व इतर कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना

या योजनेची मर्यादा 10 लाख ते 50 लाख रुपयापर्यत असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावे. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 वर्ष पर्यत असावे. गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. उत्पन्नाची मर्यादा नॉनक्रिमिलिअर, आधारकार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल वेबसाईटवर मुळ कागदत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे. 

रुपये एक लाख थेट कर्ज योजना

या योजनेमध्ये महामंडळाकडुन 1 लाख रुपये थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत तसेच बोझा नोंद करुन देणे आवश्यक आहे. या योजनेकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ( रु.1 लाखापर्यत), रेशनकार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना आदी कागदपत्रांसह संबंधीत व्यवसायानुसार कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाच्या कार्यालयातुन जातीचा मुळ दाखला व आधार कार्ड दाखवुन रितसर नोंद करुन अर्जदारास मिळतील.

बीज भांडवल योजना

ही योजना बँकेमार्फत राबविली जात असुन अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (एक लाख रुपयापर्यंत), रेशनकार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, संबंधित व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन कार्यालयात दाखल करावी लागतील. यापुर्वी लाभार्थ्याने कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही. 

या योजनेचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे-100,05,05. गट कर्ज व्याज परतावा योजना योजनेचे- 01,01,01. बीज भांडवल कर्ज योजना-01,01,01. रुपये 1 लाख थेट कर्ज योजना-100,30,30 असे उदिष्ट प्राप्त झाले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी नमूद केले आहे.  

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी  किराणा साहित्य पुरवठादारांनी  15 ऑक्टोबरपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन नांदेड (जिमाका), दि...