Friday, April 28, 2017

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
उच्चांकी पाचशे दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई
तत्कालिन जिल्हाधिकारी काकाणी यांच्या प्रयत्नांचे यश

नांदेड दि. 28 :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 2016-17 च्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी नांदेड जिल्ह्यास तब्बल पाचशे दोन कोटी रुपयांची विमा रक्कम म्हणून जाहीर झाले आहेत. राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असा उच्चांकी पीक विमा मिळाला आहे. खरीप हंगाम 2016 मध्ये सात लाख 67 हजार 973 शेतकऱ्यांनी 30 कोटी 40 लाखांचा हप्ता भरला. त्यामुळे नुकसान भरपाईपोटी 4 लाख 44 हजार 74 शेतकऱ्यांना पाचशे दोन कोटी तीन हजार रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे. यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे यांनी केलेल्या सातत्यपुर्ण  प्रयत्नांना यश मिळाले आहे. नुकसान भरपाई मिळालेल्या पिकांत प्रामुख्याने मुग, उडीद, ज्वारी, सोयाबीन यांचा समावेश आहे.

पीक विम्याबाबत जिल्हा महसूल प्रशासन, कृषी, सहकार आणि बँकांनी समन्वयाने राबविलेल्या प्रयत्नामुळे आणि शेतकऱ्यांमध्ये पीक विमा संरक्षणाबाबत निर्माण झालेल्या जाणीव-जागृतीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात विमा रक्कम मिळाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सन 2014-15 च्या खरीप हंगामापासूनच पीक विमा भरण्याबाबत सकारात्मक जाणीव-जागृती झाल्याचे आकडेवारीवरूनही स्पष्ट झाले आहे. सन 2015 च्या खरीप हंगामासाठीही 245 कोटी 52 लाख रुपये विमा संरक्षणापोटी मिळाले होते. त्यानुसार सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात विमा संरक्षणाचा दिलासा देण्यात यश आले आहे.
 शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी व्हावे यासाठी अनेक स्तरावरून प्रयत्न करण्यात आले. यामुळे खरीप हंगाम 2016 मध्ये शेतकऱ्यांनी विमा योजनेत मोठा सहभाग नोंदविला. जिल्हयामध्ये 2016 च्या खरीप हंगामात 7 लाख 69 हजार 250 हेक्टरवर पेरणी झाली होती. यात जिल्ह्यातील 7 लाख 67 हजार 973 शेतकऱ्यांनी 30.48 कोटी विमा हप्ता बँकांद्वारे भारतीय कृषि पिक विमा कंपनी, मुंबई यांच्याकडे कंपनीकडे भरला होता. ज्यामुळे 3 लाख 83 हजार 69.38 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण मिळाले. या कंपनीकडून खरीप हंगाम 2016  साठी नुकताच नुकसान भरपाई म्हणून नांदेड जिल्ह्यास पाचशे दोन कोटी तीन हजार रुपयांची विमा रक्कम पिक संरक्षणापोटी जाहीर करण्यात आली. ही नुकसान भरपाई प्रामुख्याने मुग, उडीद, ज्वारी, सोयाबीन या पिकांना मिळाली. या पिकांसाठी जिल्ह्यातील 5 लाख 55 हजार 872 शेतकऱ्यांनी 17 कोटी 96 लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. त्याद्वारे 2 लाख 92 हजार 8 हेक्टरवरील पीकसंरक्षित झाले होते. त्यातील 4 लाख 44 हजार 74 शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी कंपनीने पाचशे दोन कोटी तीन हजार रुपयांचे विमा लाभ देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय विमा हप्ता भरलेल्या कापूस व तूर या पिकांची विमा नुकसान भरपाई अजूनही जाहीर होणे बाकी आहे.
गत  खरीप हंगाम 2015-16 मध्येही 4 लाख 72 हजार 617 शेतकऱ्यांनी  पीक विमा हप्त्यापोटी 17 कोटी 24 लाख रुपये भरले होते. त्यातून त्यांना नुकसान भरपाई पोटी 245 कोटी 52 लाख रुपये मिळाले होते. यामुळे पीक विमा भरलेल्या 7 लाख 7 हजार 565 हेक्टर पैकी 2 लाख 80 हजार 501.54 हेक्टरवरील पिकांना संरक्षणापोटी रक्कम मिळाली.
पिकांच्या विमा संरक्षणपोटी मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची बँक खातीही काढण्याची मोहिमही यशस्वी ठरली आहे.
पीक विमा योजनेत वाढला शेतकऱ्यांचा जागरूक सहभाग

वर्ष
भाग घेतलेले शेतकरी
नुकसान भरपाई पोटी मिळालेले रक्कम  
संख्या
विमा हप्ता रक्कम
2011-12
80 हजार 183
1 कोटी 20 लाख
15 लाख
2012-13
5 हजार 793
28 लाख
2 कोटी 4 हजार
2013-14
14 हजार
51 लाख
53 हजार
2014-15
1 लाख 39 हजार 27
4 कोटी 79 लाख
74 कोटी 44 लाख  
2015-16
4 लाख 72 हजार 617
17 कोटी 24 लाख
245 कोटी 52 लाख
2016-17
7 लाख 67 हजार 973
30 कोटी 48 लाख
502 कोटी 3 हजार
( कापूस,  तूर वगळता )

महसूल, कृषी, सहकार विभाग आणि बँकांमध्ये समन्वय
सलग टंचाई सदृश्य परिस्थिती तसेच अतिवृष्टीचा फटका यामुळे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याचा चंगच बांधला. सन 2015 मधील शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून, सन 2016-17 च्या खरीपासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वयासाठी बैठका घेण्यात आला. त्यामध्ये महसूल, कृषी आणि सहकार विभाग तसेच बँक यंत्रणांना प्रेरीत करण्यात आले. शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कृषी सहायकापासून, कृषी पर्यवेक्षक,तलाठी यांचा सक्रीय सहभाग घेण्यात आला. व्हॅाटसॲपस ग्रुपचाही प्रभावी वापर करण्यात आला. शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी शेतकरी गट, शेतकरी मित्र, वृत्तपत्रे, आकाशवाणी, मोबाईल एसएमएस, ईलेक्ट्रॅानीक माध्यमे यांचा पुरेपूर वापर करण्यात आला.
तत्कालिन जिल्हाधिकारी श्री. काकाणी, डॉ. मोटे यांचे सातत्यपुर्ण प्रयत्न
पीक विमा भरण्यात शेतकऱ्यांना कोणत्याही टप्प्यांवर अडचण येऊ नये यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या टप्प्यांबाबत वारंवार शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले. कृषी विभागांच्या कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांना आवर्जून पीक विमा भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्याकडून कागदपत्रांची पुर्तता करून घेण्यात आली. हप्ता भरण्याची अंतिम मुदत जवळ आल्यावर एका विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यात बँकामध्ये कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि तलाठी यांना नियुक्त करून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तिथेच पुर्तता करून घेण्यात आली. यामुळे बँक यंत्रणेलाही हप्ते भरून घेणे सोयीचे झाले आणि शेतकऱ्यांचीही मोठी सुविधा मिळाली. अशा प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षणाचा मोठा दिलासा मिळाल्याचे डॅा. मोटे यांनी सांगितले.

000000
महात्मा बसवेश्वर यांचे विचार पुढच्या
पिढीपर्यंत पोहचवावेत - जिल्हाधिकारी डोंगरे
जिल्हाधिकारी कार्यालयात बसवेश्वर यांना अभिवादन

नांदेड दि. 28 :- महात्मा बसवेश्वर यांचे जीवनच एक दार्शनिक होते. त्यामुळे नव्या पिढीपर्यंत महात्मा बसवेश्र्वरांचे विचारांची महती पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे केले. जगज्योती महात्मा बसवेश्र्वर यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. डोंगरे बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, तहसिलदार ज्योती पवार, तहसिलदार अरविंद नरसीकर आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले की, महात्मा बसवेश्र्वरांचे जीवन हाच एक संदेश आहे. त्यांनी समजोन्नतीसाठी केलेल्या कार्याची महती पुढच्या पिढीपर्यंत पोहचणे महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना, महात्मा बसवेश्र्वरांची कर्मभुमी म्हणून परिचित असलेल्या मंगळवेढा परिसरात ग्रंथालय, प्राचीन ठेव्यांचे जतन तसेच संशोधनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांत सक्रीय सहभागी होण्याची संधी मिळाल्याचेही नमूदही केले.
सुरवातीला महात्मा बसवेश्र्वर यांच्या प्रतिमेस नूतन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लिपीक दिपाली घाटोळ तसेच अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाचंगे यांची महात्मा बसवेश्र्वर यांच्या जीवन चरित्र-कार्याविषयी समयोचित भाषणे झाली. तहसिलदार श्री. नरसीकर यांनी आभार मानले.

000000
लोकाभिमुख प्रशासनाद्वारे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास – नूतन जिल्हाधिकारी डोंगरे
पदभार स्विकारला, विविध घटकांकडून स्वागत
नांदेड दि. 28 :- नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास राहील. हा ध्यास पुर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव लोकाभिमुख राहील असा प्रयत्न राहील, असा मनोदय नूतन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे व्यक्त केला. श्री. डोंगरे यांनी आज नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर ते सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. डोंगरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून तसेच विविध घटकांकडून त्यांना शुभेच्छा देऊन स्वागतही करण्यात आले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पदावरून श्री. डोंगरे यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. श्री. डोंगरे यांच्याकडे प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांना 2016 मध्ये  भारतीय प्रशासकीय सेवा श्रेणी मिळाली आहे. तत्त्पुर्वी ते सन 1991 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी-अमरावती, उपायुक्त महसूल व सामान्य प्रशासन-अमरावती, अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना सन २००३ साली शासनाचा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कालावधीत अमरावती महापालीकेस केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील आटो डीसीआर प्रणालीसाठी तसेच ई-इंडीया पुरस्कार मिळाला
           
मे 2015 पासून ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हा परिषदेतही त्यांनी माहिती-तंत्रज्ज्ञानाद्वारे ई-ओपीडी, ई-ऑफिस, ई-लायब्ररी यासह ग्रामविकासाच्या विविध संकल्पना यशस्वीपणे राबविल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यास जलयुक्‍त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन 2015-16 चा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेस यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकास विभागाचा सन 2016-17 चा द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
नांदेड जिल्हाधिकारी म्हणून रुजू होताच श्री. डोंगरे यांचे जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आदी घटकांकडून स्वागत करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, सहायक करमणूक कर अधिकारी मकरंद दिवाकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रूजू होताच जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी प्रशासनातील विविध बाबींचा तसेच योजनांचा आढावाही घेतला.
तत्पुर्वी शासकीय विश्रामगृह येथेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, दिपाली मोतीयेळे, अजित थोरबोले, तहसिलदार किरण अंबेकर आदींनीही नूतन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे स्वागत केले.

000000

Thursday, April 27, 2017

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 
नांदेड, दि. 27 :- एमएच-सीईटी परीक्षा 2017 ही गुरुवार 11 मे 2017 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत नांदेड शहरातील एकूण 27 केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या परीक्षा केंद्राच्या परिसरात सदरच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 10 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000


भारत सरकारच्या मल्टी टास्कींग
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 
नांदेड, दि. 27 :- भारत सरकार कर्मचारी निवड आयोगाची मल्टी टास्कींग परीक्षा-2016 ही रविवार 30 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते 4 यावेळत नांदेड शहरातील एकूण 23 केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या परीक्षा केंद्राच्या परिसरात सदरच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 10 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
मी मुख्यमंत्री बोलतोय...
संवाद युवा पिढीशी
प्रश्न पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 27 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या कडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युवकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी सर्व-सामान्यांना देणाऱ्या या कार्यक्रमात यावेळी विद्यार्थ्यांसाठी शालेय/महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील सुधारणा’ या विषयावर प्रश्नोत्तरे होणार आहेत. 
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तरे देतील. यासाठी विचारण्यात येणारे प्रश्न विषयाशी निगडीत धोरणात्मक बाबींवर असावेत, वैयक्तिक नसावेत, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यासाठी दिनांक 2 मे 2017 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत mmb.dgipr@gmail.com या ईमेलवर आणि 8291528952 या मोबाईल क्रमांकावर संदेश स्वरुपात किंवा ऑडिओ रेकॉर्ड करुन स्वत:च्या छायाचित्रासह पाठवावेत असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००
‘उडान’द्वारे पर्यटन, औद्योगीक, शिक्षण क्षेत्रातील
अमर्याद संधी खुल्या – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नांदेड-हैद्राबाद विमानसेवेस व्हिडीओलिंकींगद्वारे प्रारंभ
नांदेड दि. 27 :- ‘उडान’- उडे देश का आम नागरिक’ या योजनेद्वारे देशाचे अनेक भाग हवाई मार्गाने जोडून देशाची एकात्मता आणखी दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून भारताकडे हवाई क्षेत्राच्या विकासाबरोबरच पर्यटन, औद्योगीक, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या होतील असा विश्र्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ‘उडान’ या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी क्षेत्रीय संपर्क योजनेतील नांदेड–हैद्राबाद विमान सेवेचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओलिंकीगद्वारे करण्यात आला. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी शिमला येथून बोलत होते.
यानिमित्ताने नांदेड येथील गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याच्या ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, कामगार, भुकंप, पुनर्वसन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, डॅा. तुषार राठोड, एअरपोर्ट ॲथोरिटी आँफ इंडियाचे किशनलाल शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे,  मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर नांदेड-हैद्राबाद विमानाच्या प्रवाशांना शुभेच्छा देऊन, विमान हैद्राबादकडे रवाना करण्यात आले.
प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते नांदेड-हैद्राबाद विमानसेवेसह, शिमला –दिल्ली, कडप्पा-हैद्राबाद या विमानसेवांचाही प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रधानमंत्री मोदी यांनी परवडेल अशा दरात हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने, देशातील नागरिकांना आपल्या विविध क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळेल. यामुळे देश विकासाच्या वाटेवर अग्रेसर होईल. उडानमध्ये सामान्य नागरिकांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. देशाचा काना-कोपरा जोडला जाईल. यातून देशाची एकात्मता आणखी दृढ होईल. यातून पर्यटन, औद्योगीकरण, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधीही खुल्या होतील. नांदेड, अमृतसर आणि पाटणा या शिख धर्मियांच्या तीर्थस्थळांसाठी विमानसेवा सुरु करण्याने जगभरातील शिखबांधव या सेवेला चांगला प्रतिसाद देऊ शकतात, असेही प्रधानमंत्री मोदी यांनी विमान कंपन्यांना सुचित केले.
तत्पुर्वी, नांदेड विमानतळ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या की, देशाच्या प्रगतीत सामान्य नागरिकांना केंद्रीत ठेवून उडान या संकल्पनेला प्रधानमंत्री मोदी यांनी चालना दिली आहे. केवळ पायाभूत सुविधांचा विकास नव्हे, तर त्या सुविधांचा सामान्य नागरिकांसाठी वापर होणे आवश्यक आहे. या योजनेमुळे विमान प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येईल. नांदेड येथून सुरु होणाऱ्या विमानसेवेचा फायदा लगतच्या जिल्ह्यांनाही होणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासह, या परिसरातील प्रत्येक क्षेत्रासाठी विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे.
कामगार मंत्री पाटील-निलंगेकर म्हणाले की, विमानसेवा केवळ खास वर्गासाठी असू नये, तर ती देशातील आम नागरिकांनाही ही सेवा उपयुक्त ठरावी, अशी ही योजना आहे. या विमान सेवेचा नांदेडसह अन्य जिल्ह्यांना निश्चितच फायदा होणार आहे. या विमानसेवेचा भविष्यात चांगला विस्तारही होईल, असेही त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनीही या विमान सेवेमुळे नांदेडमधील पर्यटन, औद्योगीक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टीने विमान सेवा उपयुक्त ठरेल, असा विश्र्वास व्यक्त केला.
 सुरवातीला एअरपोर्ट ॲथॅारिटी आँफ इंडियाचे श्री. शर्मा यांनी प्रास्ताविक केले. आमदार श्री. सावंत यांचेही समयोचित भाषण झाले. नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी सुत्रसंचालन केले. 
कार्यक्रमास ट्रू-जेट विमान कंपनीचे अधिकारी, रिलायन्स विमानतळ व्यवस्थापन कंपनीचे अधिकारी, विमान प्रवाश्यांसह, विविध पक्षांचे पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...