Monday, April 24, 2017

हिवताप आजाराची नागरिकांनी काळजी घ्यावी
आरोग्य विभागाचे आवाहन; आज जागतिक हिवताप दिन  
नांदेड दि. 24 :-  जागतीक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयातीन सर्व आरोग्यसंस्थेत मंगळवार 25 एप्रिल 2017 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. भविष्यात या आजाराचा उद्रेक होवू नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्यादृष्टिने नागरिकांनी जागरुक रहावे व या आजाराची लक्षणे आढळुन आल्यास वेळीच नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.  
जिल्हयात डेंग्यु, हिवताप आजार वाढणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. हिवताप आजारात रुग्णास थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते. हा ताप एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड येतो. अंग दुखणे, डोके दुखणे तसेच रुग्णास पांघरुण घ्यावे वाटते व नंतर घाम येवून ताप कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरीत उपचार करुन घ्यावेत. उपचार न केल्यास वारंवार ताप येवून रुग्ण बेशुध्द होवू शकतो. डेंग्युच्या लक्षणात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायु दुखी होवून उलटया होणे, डोळयाच्या आतील दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातुन रक्त स्त्राव होणे, अशक्तपणा, भुख मंदावणे, तोंडाला कोरड पडणे ही लक्षणे दिसून येतात.
हिवताप आजारावर मात करण्यासाठी पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे. घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक दिवस निश्चित करुन रिकामे करावेत या साठयातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.             
आंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत. त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावे. पांघरुन घेवून झोपावे.  संध्याकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुन घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवू किंवा रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादीची वेळीच विल्हेवाट लावावी. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.
या सर्व रोगाची तपासणी व उपचार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवील त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

00000
जिल्हा रुग्णालयातील बुधवारचे
रोगनिदान शिबीर रद्द
नांदेड दि. 24 :- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे बुधवार 26 एप्रिल 2017 रोजी विशेष रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाढते तापमान लक्षात घेता रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून हे शिबीर स्थगीत करण्यात आले आहे. पुढील शिबिराचा दिवस नंतर कळविण्यात येईल याची संबंधीत रुग्ण व आरोग्य संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.

00000
ग्रंथामुळे जीवनात समृद्धी - डॉ हंबर्डे
नांदेड दि. 24 :-  शिक्षणाने मनुष्य शिक्षित होतो परंतु सुसंस्कृत होण्यासाठी अवांतर व चौफेर वाचन गरजेचे आहे. ग्रंथ वाचनाने व्यक्तिमत्व फुलण्यास मदत होते. ग्रंथामुळे जीवन समृद्ध होते, असे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. गोविंद हंबर्डे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे जागतिक ग्रंथदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी डॉ. श्रीकांत लव्हेकर, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ग्रंथ विक्रेते सुधीर देबडवार, ज्ञानविश्व साप्ताहिकाचे संपादक रमेश मस्के, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, मनपाचे ग्रंथपाल संजीव कार्ले, सेतू अभ्यासिकेचे ग्रंथपाल बाळू पावडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी ग्रंथराजच्या प्रतिकृतीचे पूजन मान्यवरांचे हस्ते झाल्यानंतर ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रस्ताविकातून जागतिक ग्रंथ दिनाचे महत्व  व कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली. डॉ.लव्हेकर यांनी उपस्थितांना वाचनाची गोडी लावून घेणं आवश्यक असल्याचे सांगून ग्रंथाचे महत्व याविषयी माहिती दिली. याप्रसंगी निर्मलकुमार सूर्यवंशी व सुधीर देबडवार यांचीही समायोचीत भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय वट्टमवार यांनी केले तर आभार मुक्तीराम शेळके यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन कोंडीबा गादेवार, सोपान येनगुलवाड, रघुवीर श्रीरामवार यांनी केले.

000000

Friday, April 21, 2017

प्रशासकीय कामकाजात मानवी आस्थेचा चेहरा जपा
– जिल्हाधिकारी पाटील
नागरी सेवा दिन कार्यक्रम संपन्न
नांदेड दि. 21 :- प्रशासकीय कामकाजात मानवी आस्थेचा चेहरा जतन करावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज नागरी सेवा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने अभिनंदनही करण्यात आले.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी,  कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, कार्यकारी अभियंता श्री. दारमवाड, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, तहसिलदार संतोषी देवकुळे, तहसिलदार ज्योती पवार आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शनपर भाषणात श्री. पाटील म्हणाले की, राज्याच्या, देशाच्या विकासात प्रशासकीय यंत्रणेचे मोठे योगदान आहे. उदारीकरणाच्या धोरणाचा स्विकार केल्यानंतर, अनेक नव संकल्पनाही रुजल्या. त्यामुळे नागरी विकासाच्या अनुषंगाने प्रशासनाचे स्वरुपही बदलले. लोककल्याणकारी राज्याची संकल्पनाही बदलली आहे. शिक्षण, आर्थिक कुवत आणि नागरिकांना झालेली अधिकारांची जाणीव यामुळे परस्थिती बदलली आहे. माहितीचा अधिकारी, सेवा हक्क अधिनियम यामुळे आता प्रशासनाच्या कामकाजात गुणात्मक बदल झाल्याचेही जाणवते. यापुढे प्रशासनातील विविध घटकांना नागरिकांना सेवा देण्याचे दायित्त्व स्विकारावेच लागेल. त्यासाठी आता सांघिकरित्याही प्रयत्न करावे लागतील. कर्तव्य  आणि सचोटीने प्रयत्न केल्या, सेवेचे दायित्त्व पार पाडल्यास कामाचे समाधानही मिळविता येते. त्यामुळे आता यापुढे प्रशासकीय कामकाजातही मानवी आस्थेचा चेहरा जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कार्यक्रमात सुरवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी प्रास्ताविक केले. अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाचंगे यांनी कर्मचाऱ्यांसाठी संवैधानीक आचारसंहिता या विषयावर सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. तर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वेणीकर यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या वाटचालीबाबत आणि वंचितासाठीची अन्नसुरक्षा योजनेबाबत माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पिनाटे यांनीही नागरी सेवा दिन संकल्पनेची माहिती देतानाच प्रेरक असे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री. दारमवाड यांचेही भाषण झाले. उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

000000
नागरी सेवा दिनानिमित्त व राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचा आज मुंबई येथे गौरव करण्यात आला. यावेळी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खा. अरविंद सावंत, आ. मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अप्पर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय आदी मान्यवर उपस्थितीत होते. 

Thursday, April 20, 2017

जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना
उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार
नागरी सेवा दिन व राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियान निमित्त
मुंबईत आज पुरस्कार वितरण

नांदेड दि. 20 :- जलयुक्त शिवार अभियानातून राज्यासाठी तीन महत्त्वपुर्ण पॅटर्न, वंचितांसाठी अन्न सुरक्षा आणि उज्ज्व नांदेड अशा अभिनव संकल्पनांना मुर्त
रूप देण्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न करणारे नांदेड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव प्राप्त झाला आहे. नागरी सेवा दिनानिमित्त व राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राज्य सरकारने जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार 21 एप्रिल 2017 रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या निवडीसाठी आज येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अर्जून खोतकर यांनीही जिल्हाधिकारी काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदनही केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नांदेड जिल्ह्यात रूजू झाल्यापासूनच लोकाभिमुख तसेच अनेक नाविन्यपुर्ण संकल्पना राबविण्यात सातत्य ठेवले आहे. या सर्व कामांचा या पुरस्कारासाठी निवड करताना विचार करण्यात आला. विशेषतः मे 2015 मधील दुष्काळाच्या झळा तसेच टंचाईचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी विविधस्तरावर प्रयत्न केले. विविध यंत्रणांचा समन्वयही साधला. यामुळे पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात करता आली. त्यासाठी इसापूर धरणातून थेट बाभळी बंधाऱ्यापर्यंत कमीतकमी खर्चात, आणि पाण्याचा कमीत कमी अपव्यय होऊन पिण्याचे पाणी उपलब्ध करता आले होते. नांदेड शहरासाठीही येलदरी धरणातून विष्णुपुरीपर्यंत पाणी आणण्यात आले होते.
नांदेड जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियानातून राज्यासाठी नाविन्यपुर्ण असे पॅटर्न देण्याचा मान पटकाविला आहे. या पॅटर्नच्या विकासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी यंत्रणांना प्रोत्साहन दिले. यातूनच उगम ते संगम नाला पुनरुज्जीवन, जलपुनर्भरण स्तंभ (रिजार्च शॅाफ्ट), विहीर पुनर्भरण अशा संकल्पना विकसित झाल्या. यामुळे नांदेडमधील जलयुक्त शिवार अभियानातील कामही वैशिष्ट्यपुर्ण ठरले. त्यातूनच जिल्ह्यात यंदा पिण्याच्या पाण्यासाठी लागणाऱ्या उन्हाळ्यातील टँकर्सची संख्याही लक्षणीयरित्या घटली. आता अवघे सहा ते सात टँकरने जिल्ह्यात पाणी पुरविले जाते, या तुलनेत गतवर्षी ही संख्या शेकड्यावर होती. विशेषतः कंधार-लोहा या भागातील टँकर्सची संख्या कमी झाल्याबाबत लोकप्रतिनीधींनीही थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी व विविध यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी स्वच्छ भारत मिशनमध्येही जिल्ह्यातील चौदाही नगरपालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान प्रभावीरित्या राबविले. यामुळे या नागरीक्षेत्रातील स्वच्छतेसाठीही जिल्ह्याला राज्यस्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. टंचाईच्या परिस्थितीतही जिल्ह्याची महसुली वसुली 105 टक्क्यांवर नेण्यातही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी यश मिळविले आहे. याशिवाय प्रलंबित महसुली प्रकरणे निकाल काढण्यातही आघाडी ठेवली आहे. माहूर विकास प्राधिकरण आराखड्यासाठी 216 कोटी रुपयांचा भरीव निधी मिळविण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. विष्णुपूरी उपसा जलसिंचनास चालना देण्यामुळे लोहा-कंधार भागातील कालवे पुनरूज्जीवत झाले, त्यातून खरीपासह, रब्बी आणि उन्हाळी पिके घेण्याचे नियोजन, त्या परिसरातील शेतकऱ्यांना करता आले आहे. जिल्ह्यातील पीक पद्धतीत सकारात्मक बदल व्हावा, शेतकऱ्यांनी कृषी पूरक उद्योगांसाठीही प्रयत्न करावेत यासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी विविध यंत्रणांना एकात्मिक पद्धतीने काम करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. शेतकरी गटही स्थापन केले.  
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाला उज्ज्वल नांदेड म्हणून आगळ्या पद्धतीने पुढे नेले. त्यामुळे हा उपक्रम आता अव्याहतपणे सुरु आहे. ज्याद्वारे नांदेड जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांतील विविध विषयांचे थेट विषयाशी निगडीत मार्गदर्शन मिळणे सुरु झाले आहे. यातून जिल्ह्यातील सुमारे शंभरहून अधिक उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षांचे यश मिळाले आहे. विविध उपक्रमात सामाजिक संस्थांचाही उत्कृष्ट सहभाग मिळविण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. ज्यामध्ये सगरोळीची संस्कृती संवर्धन समिती, सिद्धीविनायक ट्रस्ट, नाम फाऊंडेशन यासह स्थानिक विविध स्वयंसेवी संस्थांचाही समावेश आहे.
जिल्ह्यासाठीच्या विकास आराखड्यातील निधींचे काटेकोर नियोजन, तसेच पुरेपूर विनीयोग करतानाच जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी प्रशासनातील मानवी आस्थाही विविध उपक्रमानी वृद्धींगत केली आहे. यामध्ये वंचितासाठी अन्न सुरक्षा या उपक्रमास थेट राष्ट्रपती भवनातील सादरीकरणासाठी निमंत्रित कऱण्यात आले आणि त्याच्याविषयी कौतुकोद्गारही काढण्यात आले. प्रशासकीय रेट्यातही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी प्रचंड थंडीच्या दिवसात निराधारांना शालींचे वाटप, निराधार मुलींसाठी दंगल चित्रपट दाखविण्याचा उपक्रम यातून संवेदनशील प्रशासनाचा पायंडाही घालून दिला आहे. यासह विविध बाबींचा सर्वंकष विचार करून जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्काराचे श्रेय नांदेड जिल्हावासीयांनाच - जिल्हाधिकारी काकाणी
नांदेड जिल्ह्याने नाविन्यपुर्ण उपक्रम राबविताना आपल्या पाठीशी सकारात्मक पाठबळ उभे केले, त्यामुळेच हा गौरव मिळू शकल्याची प्रतिक्रीया जिल्हाधिकारी श्री. काकाणी व्यक्त केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणासाठी श्री. काकाणी सध्या मसूरी येथे आहेत. या पुरस्काराबाबत त्यांनी तेथून प्रतिक्रीया नोंदविली. ते म्हणाले की, या पुरस्काराचे श्रेय नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना, विविध पदाधिकारी, लोकप्रतिनीधी, सर्व विभागांचे प्रमुख, महसूल आदी विभागांचे अधिकारी-कर्मचारी सहकाऱ्यांना आहे. माझ्यासह हा गौरव नांदेड जिल्हावासियांचाच आहे, असे मी मानतो.

000000
पत्रकार संरक्षण कायद्यामुळे सत्य मांडण्याचे बळ
– पालकमंत्री खोतकर
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे खोतकर यांचा हृदय सत्कार
नांदेड दि. 20 :- पत्रकारितेसमोर लोकांसमोर सत्य मांडण्याचे दायित्त्व असते. हे दायित्त्व निभाविण्यासाठीचे बळ पत्रकार हल्ला विरोधी कायद्यातून मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे केले. राज्य सरकारने पत्रकारांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी पारित केलेला पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी तसेच अभिनंदन करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड अंतर्गत जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांच्यावतीने पालकमंत्री श्री. खोतकर यांचा हृदय सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पालकमंत्री श्री. खोतकर बोलत होते.
नांदेड येथील मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहातील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील-आष्टीकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आदींही उपस्थिती होते.
पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले की, पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता, राज्याच्या हिताकरिता आणि विकासाची दीशा दाखविण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून काम करीत असतात. जगात भारतीय पत्रकारितेचे एक आगळे महत्त्व आहे. त्यामुळेच या पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनही ओळखले जाते. यातून नेतृत्त्वालाही दीशा देण्याची पत्रकारितेने भुमिका बजावली आहे. पत्रकार सामान्यांच्या न्याय्यासाठी लढा देत असतात. यातूनच प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधींनाही धोरणे आखता येतात. त्यामुळेच सरकार म्हणून पत्रकारांना संरक्षण देण्याची जबाबदारी येते. सत्य असेल, ते लोकासमोर मांडण्याचे दायित्त्व पत्रकारितेकडे येते. हे दायित्त्व पार पाडण्यासाठीचे बळ या संरक्षण कायद्यामुळे मिळेल, असा विश्र्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री. खोतकर यांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस सरकारने पत्रकारांच्या कल्याणासाठी अनेकविध प्रयत्नही केल्याचे नमूद केले. तसेच या सत्काराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनाही अवगत केले जाईल, असे सांगितले.
विविध पत्रकार संघटनांच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन पालकमंत्री श्री. खोतकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमात पत्रकार सर्वश्री किरण कुलकर्णी, नंदकुमार कांबळे, कमलाकर बिराजदार, विश्र्वनाथ देशमुख, भास्कर धम्मा, अब्दूल सत्तार, रुपेश पाडमुख, कालिदास जहागिरदार आदींच्या हस्तेही सत्कार झाला. सुरवातीला पत्रकार विजय जोशी यांनी प्रास्ताविक केले व आभारही मानले. यावेळी विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार आदी उपस्थित होते.       
000000    

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...