Friday, February 9, 2024

विशेष लेख

 

(मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचा विशेष लेख) 

मार्गदर्शक व्यक्तिमत्व श्री. एकनाथ संभाजीराव शिंदे 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे म्हणजे राज्याला लाभलेले एक खंबीर, संवेदनशील व दिलदार मनाचे नेतृत्व होय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याची वाटचाल ही प्रगतीशील राज्याच्या दिशेने होत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे एक उत्कृष्ट प्रशासक, एक उत्कृष्ट टीम लिडर व दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली राज्याची तसेच माझ्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची कामगिरी सुधारत आहे.

गरीब परिस्थितीतही त्यांनी शिक्षण घेत सार्वजनिक जीवनात काम करण्यास सुरूवात केली. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून काम करत त्यांनी सामाजिक व राजकीय जीवनात आपल्या कामाचा ठसा उमटवला. पदापेक्षा कामाला महत्व देत त्यांनी तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या सोयीसवलती पोचविण्याचे काम अविरत सुरू ठेवले. यापूर्वीच्या काळात नगरविकास, सार्वजनिक बांधकाम या विभागाचे मंत्री,  त्यानंतर गेल्या दोन वर्षापूर्वी सत्ता बदल झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतरही श्री. एकनाथ शिंदे यांच्या स्वभावात अथवा वागण्यात कोणताही बदल घडलेला दिसत नाही. पूर्वी जसे ते प्रत्येक कार्यकर्त्यासोबत वागत होते आताही ते त्याच प्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याला वागविताना दिसतात. तळागाळातून आलेले हे नेतृत्व अजूनही स्वतःला कार्यकर्ता समजतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पूर्वीपासून काम करत असताना सतत त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. विविध खात्याचे मंत्री पद सांभाळताना त्यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. त्यामुळे मी ज्या ज्या खात्यात काम केले आहे तेथे एक वेगळा ठसा उमटविता आला आहे. सध्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा मंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सदैव सहकार्य मिळत आहे. राज्यातील जनतेला स्वच्छ व पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, यासाठी विभागाच्या माध्यमातून सदैव वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या हरघर नळ, हरघर जल या उद्देशानुसार राज्यात जलजीवन मिशनची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोचविण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामामध्ये राज्यातील काम हे देशपातळीवर अव्वल स्थानावर आहे. राज्यात जलजीवन मिशनअंतर्गत 43398 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. 99 टक्के कामांचे कार्यादेश दिलेले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही कामे होत आहेत.

जलजीवन मिशनअंतर्गत राज्यातील 80 हजार 459 शाळांमध्ये (98%) नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहे. तर 8847 अंगणवाड्यांमध्येही पाण्याचे नळ जोडणी देण्यात आले आहे. हरघर जल योजनेद्वारे राज्यातील 19 हजार 60 गावांना 100 टक्के घरगुती नळ जोडणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच 40 हजार 166 गावांचे कृती आराखड्यांची निर्मिती करण्यात आली आहेत.

पाणीपुरवठ्या बरोबरच स्वच्छ महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यासाठी ते स्वतः रस्त्यांवर उतरून स्वच्छता मोहिमा राबवित आहेत. सध्या स्थानिक स्वराज्य पातळीवर सुरू असलेली ही मोहिम राज्यभर चळवळ म्हणून वाढेल, अशी मला आशा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छ महाराष्ट्र या उपक्रमात राज्याचा स्वच्छता विभागही सहभागी आहे. राज्यातील ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी हागणदारी मुक्त उपक्रम, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन/गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन याबरोबरच सार्वजनिक/वैयक्तिक शौचालये निर्माण करणे हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यातील सुमारे 70 टक्के गावे ही हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) झाली आहेत. तसेच घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत 32950 गावांचे आराखडे तयार करण्यात आली असून सुमारे 13 हजार गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. स्वच्छ महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नेहमीच विभागास प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण महाराष्ट्रातील गावे स्वच्छ करण्याचा संकल्प माझ्या विभागाने केला आहे.

राज्यात जलजीवन मिशन राबविताना प्रत्येक टप्प्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहचायला हवे. ज्या भागात नेहमी दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण होते, तेथे कायमस्वरुपी पाण्याची सोय व्हावी, यासाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध योजना, जलयुक्त शिवार, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, सोलर पंप आदी योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नेहमीच आम्हाला प्रोत्साहित केले व योग्य निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. नागरिकांच्या भल्यासाठी योजना राबविण्यासाठी व त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी त्यांनी मंत्रीमंडळातील सर्वच सहकाऱ्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे माझ्यासह सर्वच सहकारी मंत्री हे राज्याच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहत आहेत.  

अहोरात्र राज्यातील जनतेच्या हितासाठी कार्यरत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक सक्षम नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाने अनेक महत्त्वपूर्ण योजना, उपक्रम धडाडीने राबविले आहेत. शब्द पाळणारा व त्यासाठी सर्वस्वपणे झोकून देऊन काम करणाऱ्या अशा या नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... यापुढील काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगतीशील राज्याच्या दिशेने वाटचाल सुरूच राहिल, अशा सदिच्छा व्यक्त करतो.

 

श्री. गुलाबराव पाटील,

मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,

महाराष्ट्र शासन

(शब्दांकन - नंदकुमार बलभीम वाघमारे, सहाय्यक संचालक)

विशेष लेख

 

शासन आपल्या दारी

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या भारत देशाने   लोककल्याणकारी शासन व्यवस्था स्विकारली आहे. लोकशाही मूल्यांचा आदर करुन आणि नागरिकांना केंद्रबिंदू मानून शासनाचे काम सुरु आहे. याच भूमिकेतून जनतेचे शासन थेट जनतेपर्यंत नेण्यात ‘शासन आपल्या दारी­’ हा उपक्रम यशस्वी झाला आहे.

शासन अनेक विकासाभिमुख आणि नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबवित आहे. या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळावा, त्यांच्या शासकीय कार्यालयातील कमी करणे व त्यांना सहज योजनेचा लाभ मिळावा तसेच योजनांचा लाभ सुलभपणे जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी हा लोकाभिमूख उपक्रम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण येथे १४ मे २०२३ रोजी शुभारंभ झालेल्या या अभियानामुळे आजपर्यंत राज्यातील सुमारे २ कोटी २० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना विविध लाभ मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेले ‘शासन आपल्या दारी’ अभियान आता गतिमान शासनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. लाभार्थ्यांनी शासनाकडे येण्याच्याऐवजी आता शासनच जनतेच्या दारात पोहोचले आहे, पाटणनंतर सुरु झालेल्या या लोकहक्क प्रदानाच्या सोहळ्याने पाहता पाहता महाराष्ट्र व्यापला आहे. जिथे जिथे हे कार्यक्रम झाले तिथे जनतेचा लाभलेला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि गरजू, सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान अभियानाच्या यशस्वीतेची प्रचिती देते…

लोककल्याणाचे ध्येय ठेवून शेवटच्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना सहज, सुलभपणे (Ease of Access to Government Schemes) पोहोचविण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. या निर्धाराला निमित्त लाभले स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे….त्यातून प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा  ‘महासंकल्प’ सरकारने केला आणि राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची मुहुर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला ‘शासकीय योजनांची जत्रा : योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी’ अशी संकल्पना असलेले हे अभियान ‘शासन आपल्या दारी’ मध्ये रुपांतरित झाले आणि विकासाच्या योजनांच्या लाभाचा, वेगवान अंमलबजावणीचा एक नवा अध्याय महाराष्ट्रात सुरु झाला.

शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी एकाच छताखाली, एकाच ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित राहून लाभार्थ्यांना फक्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहेत, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करुन देण्यासह गरजूला त्याच्या गरजांशी निगडीत योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा लाभ मिळण्यासाठीची प्रक्रिया केली जात आहे.

 ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून विविध शासकीय विभागातील योजना, रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरे, रक्तदान व अवयवदान शिबिरे, चष्मे, दिव्यांगांना साहित्य वाटप, शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश, कृषि प्रदर्शन, महिलांना सखी कीटचे वाटप, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट बाजार आणि बचतगटांचे स्टॉल्स, विविध सरकारी विभाग आणि महामंडळांच्या योजनांचे माहिती देणारे स्टॉल्स, सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ, नव मतदार नोंदणी आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी तसेच समन्वयासाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्री सचिवालयात खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याशिवाय जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा जनकल्याण कक्ष आणि प्रत्येक विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली विशेष जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

 ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा फायदा अधिकाधिक लोकांना व्हावा म्हणून आता माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. ‘महालाभार्थी’ या पोर्टलवर नोंदणी करून आपण योजनांचा लाभ घेऊ शकता.

जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये शासन जनतेच्या दारी पोहोचलं आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य, मार्गदर्शन शासनस्तरावरुन मिळत आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग यांच्यासह विविध घटकांना मिळणाऱ्या लाभामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली आहे, यातून शासन आणि जनता यांच्यातील अंतर दूर झालं आहे..

 

Thursday, February 8, 2024

वृत्त क्र. 115

 समाज कल्याण कार्यालया मार्फत विविध महामंडळांचा

एक दिवशीय जिल्हास्तरीय समन्वय मेळावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कर्ज मंजूरी देण्याबाबत एक दिवसीय समन्वय मेळावा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड येथील सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला.

 

या कार्यक्रमासाठी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ए.डी.गचके व तसेच लेखापाल महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे डी.एस. गायकवाड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी.आर शिंदे, संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळाच्या एस.व्ही श्रीमती कांबळे तसेच बँक आफ महाराष्ट्र , बँक ऑफ इंडिया, आयसी आयसी आय, जिल्हा ग्रामीण बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया बँकेचे जिल्हा समन्वय अधिकारी व महामंडळाचे बँक पेंडीग लाभार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात महामंडळाच्या लाभार्थ्यांचे कर्ज मंजूरी प्रस्ताव बँकेकडून तात्काळ मंजूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा अग्रणी बँक अधिकारी/ जिल्हा समन्वय अधिकारी यांनी पेंडींग बँक प्रकरणे, महामंडाळांचे वाटप केलेली सबसीडी वाटप न करणे, रिर्टन प्रकरणे व कर्ज मंजूरीचे प्रकरणे, बँक पेंडीग प्रकरणे निकाली काढण्यात येतील, असे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी ए.डी गचके यांनी सांगितले.

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ यांचेकडील पेंडीग प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच स्टेट बँक इंडीया कडे जे कर्ज प्रकरणे प्रलंबित होती त्यांची यादी देण्यात आली. लवकरात लवकर कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे स्टेट बँक ऑफ इंडीया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, आयसी आयसी आय, जिल्हा ग्रामीण बॅक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया बँकेचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी बँकेकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येतील असे उपस्थित लाभधारकांना सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन जिल्हा प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजात पोहरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती एस.व्ही.व्हडगीर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण निरिक्षक श्रीमती एस.व्ही.वडगीर व श्रीमती एस.टी. गच्चे व तसेच महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले. हा एक दिवसीय समन्वय मेळावा सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

0000



  

निरुपयोगी, वापरात नसलेल्या व कालबाहय वस्तूंच्या

खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 

लातूर(विमाका) दि.08:- विभागीय माहिती कार्यालयाच्या जडसंग्रह विभागातील काही वस्तू निरुपयोगी, वापरात नसलेल्या व कालबाह्य, तुटलेल्या अशा आहेत. या वस्तूंची विक्री करावयाची आहे, त्यासाठी इच्छुक खरेदीदारांनी  खरेदीबाबतची दरपत्रके विभागीय माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उत्तरबाजू तळमजला, लातूर येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेत दिनांक  20/02/2024 पर्यंत सादर करावीत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

        कार्यालयीन  कामकाजाच्या वेळेत या वस्तू पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कार्यालयात येऊन या वस्तुंची पहाणी करावी तसेच अटी व शर्तीची माहिती करून घ्यावी, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

***** 

Wednesday, February 7, 2024

वृत्त क्र. 114

 तत्पर व युध्दपातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विष बाधेतील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर

▪️जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाशी समन्वय साधत तातडीने उपचाराचे केले नियोजन
▪️लोहा तालुक्यातील अन्न विषबाधित झालेले सर्व रुग्ण सुखरुप
  • कोणतीही जीवीतहानी नाही
नांदेड (जिमाका) दि. 7 :- लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह कार्यक्रमाच्या प्रसादातून सुमारे 2 हजार भाविकांना मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी अन्न विषबाधा झाली होती. जिल्हा प्रशासनाने तातडीने धाव घेवून आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्णांना तातडीने हलवून युध्द पातळीवर उपचार केले. मध्यरात्रीनंतर अचानक रुग्णांची संख्या लक्षात घेवून कुठेही न डळमळता आरोग्य विभागाने रुग्णांवर केलेले उपचाराचे व्यवस्थापन हे महत्वाचे ठरले. तात्काळ सर्व रुग्णांना रुग्णालयात हलविल्या मुळे कोणतीही जीवीत हानी न होता सर्व रुग्णांना या विषबाधेतून बाहेर काढण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
सद्यस्थितीत दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे 19 रुग्ण, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 60, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात 50, लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात 70 व खाजगी रुग्णालयात सुमारे 150 रुग्ण असे सुमारे 500 रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रुग्णांवर उपचार होवून ते सुखरुप असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. विष बाधा झाल्याचे तात्काळ प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शीघ्र कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेची शहानिशा करून आरोग्य विभागाला अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.
कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर सुमारे 2 हजार भाविकांना 7 फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळलेले आहे. या रुग्णांना मळमळ, उलटी, संडास अशी लक्षणे दिसून आल्यानंतर काही रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय, लोहा येथे दाखल करण्यात आले.
दिनांक 6 फेब्रुवारी च्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच दि. 7 फेब्रुवारीच्या पहाटे डॉ. शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे सुमारे 600 रुग्णांना, श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात 100 रुग्णांना, उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे 150 रुग्णांना, प्राथमिक आरोग्य केंद्र, माळाकोळी येथे 20 रुग्णांना, डॉ. पवार रुग्णालय, लोहा खाजगी येथे 50 रुग्णांना तसेच डॉ. धनवडे रुग्णालय लोहा येथे 100 रुग्णांना औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर काही रुग्ण हे स्वत: खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे आरोग्य विभागाने अतिरिक्त खाटांची पूर्वतयारी करुन सर्व यंत्रणा सज्ज ठेवली.
रुग्णांना कोष्ठवाडी, सावरगाव, पोस्ट वाडी, रिसनगाव, मस्की या गावातून रुग्णालयात उपचारासाठी आणण्यासाठी टोल फ्री 102 क्रमांकाच्या 8 रुग्णवाहिका आणि टोल फ्री 108 क्रमांकाच्या 6 रुग्णवाहिका, खासगी 3 बसेस, 1 महामंडळ बस तसेच गावातील इतर प्रवासी वाहतूक वाहनांचा वापर करण्यात आला. रुग्णांवर औषधोपचारासाठी मुबलक औषधाचा साठा उपलब्ध होता. याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रुग्णांलयाना अतिरिक्त औषध साठ्याची पूर्तता करण्यात आली.
रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी अन्न, पाणी आणि उलटीचे नमुने घेण्यात आलेले आहेत. आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत सदर गावामध्ये 5 आरोग्य पथके हे औषधोपचार, सर्वेक्षण यासाठी कार्यरत करण्यात आलेली आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शीघ्र कृती पथक स्थापन करण्यात आलेले आहे. डॉ. संतोष सूर्यवंशी (पीएसएम) अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. नांदेड (पथक प्रमुख), डॉ. नितीन अंभोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. बालाजी माने (बाल रोग तज्ञ) जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. तज्जमुल पटेल (भिषक) जिल्हा रुग्णालय नांदेड यांचा या पथकात समावेश आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग हे समन्वयाने कार्यरत आहेत.
00000



वृत्त क्र. 113

 महासंस्कृती महोत्सवामध्‍ये शिवकालीन

पारंपारीक खेळ सादर करण्‍याची खेळाडूंना संधी 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती इ.बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत पाच दिवसीय "महासंस्कृती महोत्सवाचे" आयोजन करण्याचे  शासनाचे निर्देश आहेत.

 

त्‍याअनुषंगाने नांदेड जिल्‍हामध्‍ये जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 15व 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदान, वजिराबाद, नांदेड येथे महासंस्‍कृती महोत्‍सव अंतर्गत शिवकालीन पारंपारीक खेळाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. यामध्ये  खो-खो व कबड्डी या खेळामध्ये सन 2023-24 या वर्षातील शालेय तालुकास्तरावर 19 वर्षाआतील मुले-मुली संघनी प्रथम क्रमांक संपादन केलेल्या संघास संधी देण्यात येणार आहे.  कुस्ती या खेळ प्रकारासाठी 19 वर्षाआतील मुले-मुली खेळाडूंना आपली नांवे नोंदविता येईल व आटयापटया, लेझीम, लाठीकाठी, रस्सीखेच, गतका, लगोरी व मल्लखांब (पुरुष व महिला खुला गट) या खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

 

या क्रीडा प्रकारात पारंगत असणाऱ्या जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी  13 फेब्रुवारी, 2024 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज भरुन खेळाडूची/ संघाची प्रवेशिका ई-मेल आयडी dsonanded@rediffmail.com यावर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड येथे प्रत्यक्ष सादर करावेत.

 

उक्‍त कालावधी नंतर प्राप्‍त प्रवेशअर्जाची छानणी होऊन समितीद्वारे अंतिम करण्‍यात येवून, निवडक खेळाडूं/ संघास "महासंस्‍कृती महोत्‍सवात" सहभाग घेता येईल. वैयक्तिक व सांघीक खेळ प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन करणाऱ्या खेळाडू/ संघास रोख पारीतोषीक व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या शुभ- हस्ते पुरुष व महिला गटात स्वतंत्र देण्यात येणार आहे असे महासंस्कृती महोत्सव समिती नांदेड तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

0000

वृत्त क्र. 112

रस्ता सुरक्षा विषयी माहिती व प्रबोधनासाठी
जिल्ह्यात एलईडी वाहनाद्वारे जनजागृती


नांदेड (जिमाका) दि. 7 :- परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक माहिती व प्रबोधन व्हावे यासाठी एलईडी वाहनांद्वारे रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती 11 फेब्रुवारीपर्यत करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांचे हस्ते नुकतेच या एलईडी वाहनांची फित कापून हे वाहन रवाना करण्यात आले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, मोटार वाहन निरिक्षक विजयसिंह राठोड, श्रीमती भाग्यश्री देशमुख, श्रीमती रेणुका राठोड, सहा.मोटार निरिक्षक नितीन राख, केशव जावळे, सतीश भोसले, सचिन मगरे व लिपीक कर्मचारी राजेश गाजुलवाड, गजानन शिंदे, गजानन पवळे व इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी नांदेड शहरासह जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये या वाहनाद्वारे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
0000




वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...