Friday, February 9, 2024

विशेष लेख

 

(मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचा विशेष लेख) 

मार्गदर्शक व्यक्तिमत्व श्री. एकनाथ संभाजीराव शिंदे 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे म्हणजे राज्याला लाभलेले एक खंबीर, संवेदनशील व दिलदार मनाचे नेतृत्व होय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याची वाटचाल ही प्रगतीशील राज्याच्या दिशेने होत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे एक उत्कृष्ट प्रशासक, एक उत्कृष्ट टीम लिडर व दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली राज्याची तसेच माझ्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची कामगिरी सुधारत आहे.

गरीब परिस्थितीतही त्यांनी शिक्षण घेत सार्वजनिक जीवनात काम करण्यास सुरूवात केली. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून काम करत त्यांनी सामाजिक व राजकीय जीवनात आपल्या कामाचा ठसा उमटवला. पदापेक्षा कामाला महत्व देत त्यांनी तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या सोयीसवलती पोचविण्याचे काम अविरत सुरू ठेवले. यापूर्वीच्या काळात नगरविकास, सार्वजनिक बांधकाम या विभागाचे मंत्री,  त्यानंतर गेल्या दोन वर्षापूर्वी सत्ता बदल झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतरही श्री. एकनाथ शिंदे यांच्या स्वभावात अथवा वागण्यात कोणताही बदल घडलेला दिसत नाही. पूर्वी जसे ते प्रत्येक कार्यकर्त्यासोबत वागत होते आताही ते त्याच प्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याला वागविताना दिसतात. तळागाळातून आलेले हे नेतृत्व अजूनही स्वतःला कार्यकर्ता समजतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पूर्वीपासून काम करत असताना सतत त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. विविध खात्याचे मंत्री पद सांभाळताना त्यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. त्यामुळे मी ज्या ज्या खात्यात काम केले आहे तेथे एक वेगळा ठसा उमटविता आला आहे. सध्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा मंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सदैव सहकार्य मिळत आहे. राज्यातील जनतेला स्वच्छ व पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, यासाठी विभागाच्या माध्यमातून सदैव वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या हरघर नळ, हरघर जल या उद्देशानुसार राज्यात जलजीवन मिशनची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोचविण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामामध्ये राज्यातील काम हे देशपातळीवर अव्वल स्थानावर आहे. राज्यात जलजीवन मिशनअंतर्गत 43398 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. 99 टक्के कामांचे कार्यादेश दिलेले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही कामे होत आहेत.

जलजीवन मिशनअंतर्गत राज्यातील 80 हजार 459 शाळांमध्ये (98%) नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहे. तर 8847 अंगणवाड्यांमध्येही पाण्याचे नळ जोडणी देण्यात आले आहे. हरघर जल योजनेद्वारे राज्यातील 19 हजार 60 गावांना 100 टक्के घरगुती नळ जोडणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच 40 हजार 166 गावांचे कृती आराखड्यांची निर्मिती करण्यात आली आहेत.

पाणीपुरवठ्या बरोबरच स्वच्छ महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यासाठी ते स्वतः रस्त्यांवर उतरून स्वच्छता मोहिमा राबवित आहेत. सध्या स्थानिक स्वराज्य पातळीवर सुरू असलेली ही मोहिम राज्यभर चळवळ म्हणून वाढेल, अशी मला आशा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छ महाराष्ट्र या उपक्रमात राज्याचा स्वच्छता विभागही सहभागी आहे. राज्यातील ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी हागणदारी मुक्त उपक्रम, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन/गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन याबरोबरच सार्वजनिक/वैयक्तिक शौचालये निर्माण करणे हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यातील सुमारे 70 टक्के गावे ही हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) झाली आहेत. तसेच घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत 32950 गावांचे आराखडे तयार करण्यात आली असून सुमारे 13 हजार गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. स्वच्छ महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नेहमीच विभागास प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण महाराष्ट्रातील गावे स्वच्छ करण्याचा संकल्प माझ्या विभागाने केला आहे.

राज्यात जलजीवन मिशन राबविताना प्रत्येक टप्प्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहचायला हवे. ज्या भागात नेहमी दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण होते, तेथे कायमस्वरुपी पाण्याची सोय व्हावी, यासाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध योजना, जलयुक्त शिवार, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, सोलर पंप आदी योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नेहमीच आम्हाला प्रोत्साहित केले व योग्य निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. नागरिकांच्या भल्यासाठी योजना राबविण्यासाठी व त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी त्यांनी मंत्रीमंडळातील सर्वच सहकाऱ्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे माझ्यासह सर्वच सहकारी मंत्री हे राज्याच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहत आहेत.  

अहोरात्र राज्यातील जनतेच्या हितासाठी कार्यरत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक सक्षम नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाने अनेक महत्त्वपूर्ण योजना, उपक्रम धडाडीने राबविले आहेत. शब्द पाळणारा व त्यासाठी सर्वस्वपणे झोकून देऊन काम करणाऱ्या अशा या नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... यापुढील काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगतीशील राज्याच्या दिशेने वाटचाल सुरूच राहिल, अशा सदिच्छा व्यक्त करतो.

 

श्री. गुलाबराव पाटील,

मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,

महाराष्ट्र शासन

(शब्दांकन - नंदकुमार बलभीम वाघमारे, सहाय्यक संचालक)

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...