Friday, February 9, 2024

विशेष लेख

 मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लेख

 

*मंत्री अतुल सावे*

 

संवेदनशील मनाचा नेता 

     राज्याच्या विकासाबाबत दूरदृष्टी, तत्पर निर्णयक्षमता, बदलत्या काळानुसार धोरण राबविणारा संवेदनशील नेता राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसल्यास राज्याचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागत नाही. राजकारणात सामान्य लोकांना आपला वाटेल असा राजकारणी सापडणे दुरापास्त. सामान्यातील सामान्य माणूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधू शकतो. त्या संवाद साधणाऱ्या प्रत्येकाला हा माणूस आपलाच आहे, अस वाटत हे खरे मुख्यमंत्र्यांचे मोठेपण आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. विशेषत: सामान्य नागरिकांबद्दल आणि त्यांच्या कामांबद्दल ते स्वतः लक्ष घालून तळमळीने सगळी कामे करून घेतात. सामान्य नागरिकाला समोर ठेवूनच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्धतेने आमचे सरकार काम करीत आहे.   

      मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण विभागात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती विद्यार्थी संख्या 10 वरून 75 इतकी वाढ करण्यात आली आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे. इतर मागास व विशेष मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग या प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी एक व मुलींसाठी एक याप्रमाणे 36 जिल्ह्यांच्या ठिकाणी 72 शासकीय वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या इतिहासात ओबीसी विभागासाठी सर्वोच्य अशी 8252 कोटी रुपयांची विक्रमी तरतुद केली आहे.

        म्हाडाच्या  56 वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन १९९८ ते २०१८ या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे तब्बल 384 कोटींचा वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून या निर्णयामुळे मुंबईतील लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (एसआरए) पुनर्वसन करण्यात आलेली घरे यापुढे पाच वर्षांनी विकता येणार आहेत.राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत पुनर्वसन करण्यात येणारी घरे यापूर्वी १० वर्षांनंतर विकता येण्याचा नियम होता. हा नियम बदलून ५ वर्ष करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण दि.१९ जानेवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हा गृह प्रकल्प देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून असंघटित क्षेत्रातील 30 हजार कामगारांच्या घरकुलाच स्वप्न यामुळे साकार झाले आहे. राज्यात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही अशीच निर्णयाची वाटचाल असणार आहे. एक समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. 

 

     राज्याच्या हिताचे धडाकेबाज निर्णय आणि कृतीतून कायमच सर्वाच्या आदरस्थानी असलेले लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस...। त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...!

 

    ****

No comments:

Post a Comment