Friday, February 9, 2024

विशेष लेख

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवदेनशील मनाचे कृतीवंत व्यक्त‍िमत्व

-   आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे.. अत्यंत कर्तबगार.. संवेदनशील मनाने भरलेले व्यक्तीमत्व. कुठलाही मुख्यमंत्री पदाचा बडेजाव न करता.. एक सामान्य कार्यकर्ता. त्यांच्यातील कार्यकर्ता इरशाळवाडी दुर्घटनेच्या वेळी महाराष्ट्राने पाहिला. असे हे महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या सेवेत समर्पित असलेले व्यक्तीमत्व.. या कृतीवंत नेत्याचा आज वाढदिवस. त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी तुळजा भवानी भरभरून आयुष्य देवो.. त्यांना सुदृढ, निरोगी शरीर लाभो .. अशी प्रार्थना मी त्यांच्या वाढदिवसा दिवशी व्यक्त करतो.

मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या संवेदनशील मनाचे मला नेहमी दर्शन घडले आहे. जनतेच्या सेवेप्रती कटीबद्ध असलेल्या या नेत्याने मला ईश्वरीय सेवा करण्याचे खाते दिले. रूग्ण कल्याण व त्यांची सेवा करण्याचे काम माझ्या हातून घडत आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच.. खात्याचा कारभार बघत असताना वेळोवेळी मला त्यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. कुठेही अडचण आली, तर त्यांच्याकडून ती चुटकीसरशी सोडविल्या जाते, याचा प्रत्यय मला बऱ्याच वेळा आला. जनतेच्या आरोग्याप्रती एखादा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे लक्षात आले, तेव्हा मला त्यांच्याकडून पाठींबा मिळतो. ‘बिनधास्त काम करा.. मी आहे.’ हे त्यांचे शब्द ऐकले की.. काम करण्याची नवीन ऊर्मी येते.

आरोग्य खात्याच्या माध्यमातून मला रूग्णसेवा करण्याची संधी मिळाली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना विभागांतर्गत असलेल्या सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार विनाशुल्क करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. गरीबांसाठी संजीवनी ठरलेली महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार  करण्यात आला. योजनेचे दीड लाखाचे विमा कवच पाच लाख रूपयापर्यंत वाढविण्यात  येत आहे. त्यामुळे पाच लाख रूपयापर्यंतचे उपचार राज्यातील रूग्णांना मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर या योजनेच्या पॅनलमध्येही रूग्णालयांची संख्या वाढविण्यात  येत आहे.  किडनी, कर्करोग, हृदयरोग अशा दुर्धर आजारांनी बाधीत असणाऱ्या रूग्णांना या योजनेतून उपचाराचा लाभ मिळत आहे. त्यामुळे मृत्यूच्या दाढेतूनही बरेच रूग्ण परत येत आहे.  हे ईश्वरीय कार्यच आहे, हे कार्य माझ्या हातून मुख्यमंत्री शिंदे साहेबांमुळे घडत आहे.

आजार होण्यापूर्वीच निदान झाले पाहिजे, त्यासाठी आरोग्य विभागाने उपाय योजना केल्या पाहिजे, असा नेहमीच त्यांचा अट्टाहास असतो. आजार झाल्यावर उपचार केल्यापेक्षा आजार न होण्यासाठी काळजी घेणे,  आरोग्य सांभाळणे महत्वाचे आहे.  त्यामुळे  आरोग्य खात्याच्या माध्यमातून समाजातील सर्व वयोगटातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आपण घेतला. सर्वात आधी  घरातील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात आले. यामध्ये राज्यभरातील जवळपास 4 कोटी 39 लाख महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून गरजेनुसार आवश्यक असलेल्या महिलांवर उपचार करण्यात आले आहेत.

महिलांच्या तपासणीनंतर लहानापासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत आरोग्य तपासणी ‘जागरूक पालक.. सुदृढ बालक..’ अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. भविष्यात होऊ शकणाऱ्या आजारांचा शोध घेवून आवश्यक उपचारही करण्यात आले. या दोन्ही अभियानातून समाजातील मोठ्या वर्गाची आरोग्य तपासणी पूर्ण झाली.

मात्र अजूनही कुटूंबाचा आधारस्तंभ असलेल्या समाजातील महत्वाच्या घटकाची आरोग्य तपासणी राहली असल्याची खंत होतीच.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘आजार होण्यापेक्षा न होण्यासाठी काळजी करणारा’ संवेदनशीलपणा आठवला.. आणि 18 वर्षावरील पुरूषांच्या आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘निरोगी आरोग्य तरूणाईचे.. वैभव महाराष्ट्राचे’ अभियान सुरू करण्यात आले. या अभियानातून पुरूषांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आजार होण्यापूर्वीच निदान करण्यासाठी काम करण्याचे दिलेले निर्देश प्रत्यक्षात आल्याचे समाधान मिळेल.

मा. मुख्यमंत्री यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे भविष्यातही विभगाच्या माध्यमातून मोठे निर्णय घेण्याचे धाडस करणार आहे. कर्करोगाचे निदान लवकर होण्यासाठी कॅन्सर व्हॅन, कर्करोगावर केमोथेरपी उपचार मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. जनतेच्या  मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे काम म्हणजे.. जे मनात ते कर्तृत्वात.. त्यामुळे त्यांनी जे ठाणलं.. ते प्रत्यक्षात येणारच. ही त्यांची टॅगलाईनच बनली आहे. अशा या मोठ्या मनाच्या.. जनतेच्या सेवेप्रती समर्पित असणाऱ्या करारी व्यक्तीमत्वाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून असेच जनतेची सेवा घडत राहण्यासाठी निरोगी, सुदृढ आरोग्य त्यांना लाभो, ही प्रार्थना व्यक्त करतो..

0000

No comments:

Post a Comment