Friday, February 9, 2024

विशेष लेख

 ‘.. संवेदनशील, अथक कार्यशैली हीच प्रेरणा’ – विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.

ुख्यमंत्री महोदयांच्या कामाचा वेग कित्येकदा अचंबित करण्यासारखा असतो. अहोरात्र ते कामात असतात. इथं अहोरात्र म्हणजे अहोरात्र असंच असतं. निर्णय घ्यायचा आहे, तर त्यामध्ये वेळ दवडणं त्यांना आवडत नाही. ते त्यांना अपेक्षितही नसतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यातील त्यांच्या वेगवेगळ्या विभागांच्या कामांवर नजर टाकली तर, त्यांचा झपाटा लक्षात येतो. इथं उल्लेखित कामे, प्रकल्प, उपक्रम, ही वाणगीदाखल आहेत. त्यांची यादी मोठी होऊ शकते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासाठी रुग्णसेवा ही सर्वोच्च आहे. त्यामुळे आपण अलिकडच्या काळात पाहिलं असेल, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम देखील मुख्यमंत्री महोदयांप्रमाणेच अहोरात्र सुरु असते. या कक्षाद्वारे महाराष्ट्रातल्या काना-कोपऱ्यातल्या गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय उपचारांसाठी मदत पोहचवली जाते. ही मदत आर्थिक असतेच. पण त्याशिवाय दररोज कित्येकांचे वेगवेगळ्या कारणांसाठी मदतीसाठी विनंती, विचारणा सुरु असते. वेगवेगळ्या प्रकारची मदत मागितली जाते. मुख्यमंत्री महोदयांप्रमाणेच तत्पर आणि वेळेत मदत पोहचवणारा कक्ष अशी ओळख तयार झाली आहे. या वैद्यकीय कक्षाच्या व्यतिरिक्तही मुख्यमंत्री महोदय विशेष बाब म्हणूनही सातत्याने मदत करण्यात पुढे असतात. अशी मदत करताना त्यांच्यापुढे वेळ-काळाचं बंधन नसतं. समोरचा मदत मागतो आहे. तो गरजू आहे, याची खात्री झाली की तिथल्या तिथे मदत करतात. रात्री-अपरात्री पर्यंत वैद्यकीय सहायता कक्ष आणि संबंधितांपर्यंत मदत पोहचवण्याचे संदेश जातात. एकदा एका अपघातात दोन्ही हात गमावलेला आणि पायांनीही अधू झालेला तरूण मुलाला घेऊन त्याचे वडील आले होते. त्यांनी आपली करून कहाणी ऐकवणे सुरु असतानाच, त्यांना मदत पोहचवण्याची प्रक्रीया सुरु झाली होती. सगळी मदत केली जाईल, कुटुंबाला हातभार लावला जाईल, असा धीर-दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला. याच दरम्यान सगळी चक्रे फिरली होती, आणि मदतीचा धनादेशही संबंधित बाप-लेकांच्या हातात सुपूर्द केला गेला होता.

मदतीची अपेक्षा बाळगून येणाऱ्यांचे प्रत्येकाचे समाधान करण्यात ते यशस्वी होतात. प्रत्येकाचे समाधान व्हावे यासाठी तिथल्या तिथे निर्णय घेण्याची. संबंधिताना तडक दूरध्वनी करून, जागेवरच सूचना देण्याची त्यांची पद्धत असते. यामुळे त्यांच्या भेटीची अपेक्षा बाळगून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. ते त्यांना जाणीवपूर्वक वेळही देतात. अभ्यागतांची गर्दी हा त्यांच्यासाठी दैनंदिनीचा भाग असतो. त्यामुळेच उशिरा रात्रीपर्यंत त्यांच्याकडे भेटीसाठी गर्दी आणि रांगच असते.

आपत्तीच्या काळातही मुख्यमंत्र्यांची स्वतःहून जाणून घेऊन पुढे राहण्याची आणि प्रत्यक्ष फिल्डवर उतरून नेतृत्व करण्याची भूमिका असते. त्यामुळेच नैसर्गिक किंवा अन्य कुठल्याही आपत्तीत ते आर्थिक सहाय्य आणि मदत-बचावासाठी ते सदैव सतर्क आणि त्याबाबतच्या माहितीने अद्ययावत असतात. अशा वेळी या गोष्टीं ते दुसऱ्यांवर सोपवून बाजूला राहू शकतात. पण तसे होत नाही. ईर्शाळवाडी सारखी दरड कोसळण्याची दुर्घटना असो किंवा अन्य कुठला अपघात, पूर अशा आपत्तीतही ते मदत पुरवण्यापासून त्यातील आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनाच्याबाबतीत आग्रही असतात. या सर्व गोष्टींचा सातत्याने आढावा आणि वेळच्या वेळी या गोष्टी पार पडताहेत की नाही याचा पाठपुरावा करण्यावरही त्यांचा भर असतो.

दिव्यांग आणि दिव्यांगांच्या मदतीसाठी ते दक्ष असतात. स्वतंत्र दिव्यांग विभाग व्हावा यासाठी त्यांची तळमळ होती. दिव्यांगाविषयी आस्थेचे आणि त्यांच्या हितांचे रक्षण व्हावे असे निर्णयही त्यांनी तडकपणे घेतले आहेत.

गरजूंना मदत यासोबतच राष्ट्रभक्तीचे आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे उपक्रम अशा सर्वच बाबतीत मुख्यमंत्री महोदय संवेदनशील असतात. त्यांचे या सगळ्या गोष्टींवर बारकाईनं लक्ष असतं. या उपक्रमांच्या नियोजन-आयोजनात कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी ते आग्रही असतात. स्वतः लक्ष घालून अनेक गोष्टींना ते आकार देतात. यातही त्यांची दूरदृष्टी आणि नावीन्याचा ध्यास दिसून येतो. सहभागी कलाकार, ज्येष्ठांचा-तज्ञांच्या मतांचा आदर, त्यांना काय हवं- काय नको हे पाहण्यातही ते मागे राहत नाही. उत्तम, उत्कृष्ट आणि भव्य-दिव्य यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असतात. यातूनच महाराष्ट्रात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सर्व उपक्रमात मग तो हर घर तिरंगा असो किंवा पुढे दीर्घकाळ चाललेला मेरी माटी-मेरा देश हा उपक्रम. या सगळ्याच्या आयोजनात महाराष्ट्र अव्वल राहीला आहे. यातील काही उपक्रमांत तर विक्रमच रचला गेला आहे. या अमृत कलश उपक्रमाच्या आयोजनात तेही आवर्जून सहभागी झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध उपक्रम आयोजित केले गेले. किल्ले रायगडवर विशेष कार्यक्रम केला गेला. त्यामध्येही हिरीरीने सहभागी झाले. यातील सर्व उपक्रमांत त्यांनी स्वारस्य दाखवून अनेक सूचना केल्या होत्या. त्यामुळेच आपण वर्षभर हा या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करू शकलो. यातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाणता राजा या महानाट्याचे प्रयोगांचे आयोजन करण्यात आले. आता आगामी काळात शिवजयंतीच्या निमित्यानेही प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजिक करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या ठिकाणी स्वच्छता, रंगरंगोटी, सुशोभिकरण करण्यात यावे असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

स्वच्छता हा देखील मुख्यमंत्र्यांच्या आवडीचा आणि आस्थेचा विषय आहे. ते स्वच्छतेचे भोक्ते आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्वच्छतेचा विषय प्राधान्यक्रमावर आला आहे. विशेषतः शहरी भागातील स्वच्छतेसाठी त्यांनी डिप क्लिनिंग या संकल्पनेवर भर दिला आहे. सध्या महानगरापर्यंत असलेली ही मोहिम पुढे राज्यभरातील सर्वच शहरात राबवली जाणार आहे. अलिकडेच केंद्र सरकारने महाराष्ट्राचा या नागरी स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला प्रथम क्रमांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यातच या मोहिमेचे यश सिद्ध होते. यापुढे या मोहिमेचा, या संकल्पनेचाही विस्तार केला जाणार आहे. याशिवाय सौंदर्यीकरण, सुशोभिकरण याबाबतही त्यांचा कटाक्ष असतो. शहरात वृक्षराजी आणि ऑक्सिजन पार्क निर्माण व्हावेत. प्रदूषण आणि अस्वच्छता दूर व्हावी यासाठी त्यांचा आग्रह असतो. त्यासाठी ते वारंवार यंत्रणांना सूचना देत असतात. प्रचंड व्यस्तात आणि अनेक कार्यक्रम असतानाही ते प्रसंगी भल्या सकाळी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहित करण्यासाठी दौरे करतात हे आपण पाहतोच आहोत.

शेती विषयक आणि अनुषांगिक अनेक गोष्टींबाबत त्यांच्याकडे अद्ययावत माहिती असते. त्यामुळेच त्यांनी अलिकडेच बांबू लागवडीसारख्या अभिनव गोष्टींवर भर दिला आहे. बांबुची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण होणार आहे. यासाठी अलिकडच्या मंत्रिमडळ बैठकीतही ऊती संवर्धित बांबूची लागवड तसेच त्याच्या देखभालीसाठी अनुदानाची तरतूद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

दहिहंडी हा पारंपरिक उत्सव आता एक महत्वाचा क्रीडा प्रकार आहे. यातील गोपाळांविषयी मुख्यमंत्र्यांना मनापासून आत्मियता आहे. या गोपाळांना दुखापत झाल्यास त्यांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी विमा संरक्षण आणि मंडळांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. या दहिहंडीला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा प्रकारात (इनटॅन्जिंबल कल्चरल हेरिटेज) स्थान मिळावे यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्याही मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. त्यादृष्टीनेही प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडून अशा या विविध विषयांचा सातत्याने आढावा सुरु असतो. यातून सकारात्मक आणि चांगले काही घडून यावे अशी त्यांची भूमिका असते. त्यासाठी ते मार्गदर्शन करतात, सातत्याने पाठबळ देत असतात. त्यांचा काम करण्याचा उत्साह आणि झपाटा यामुळे अशा उपक्रमांच्या नियोजन, आयोजनात सहभागी विविध यंत्रणांना, अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळत असते. त्यांच्याकडून प्रेरणा मिळत असते. त्यांची प्रेरणा आणि प्रतिसाद हाच आणखी चांगले काम करण्यासाठी ऊर्जा देत राहतो. हेच त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.

-         विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.

 

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...