Friday, February 9, 2024

विशेष लेख

धाडसी तितकेच विकासाभिमुख नेतृत्व...!

कृषी मंत्री धनंजय मुंडे

श्री. एकनाथराव शिंदे साहेब हे स्वतः एक शेतीनिष्ठ शेतकरी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असताना देखील त्यांना शेतात काम करताना, भात शेती करताना अनेकांनी पाहिले असेल. त्यामुळे शेती क्षेत्राला आधुनिकतेची जोड देणे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उकल करणे, याबाबत ते कायम आग्रही असतात. धनंजय आपण हे केले पाहिजे, धनंजय अमुक बाबीकडे तुम्ही स्वतः लक्ष द्या, असे त्यांचे नेहमी मार्गदर्शन असते.

आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार ही त्रिमूर्ती राज्याच्या विकासाची यशस्वी घोडदौड करत आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही त्यांना एकदा शब्द टाकला की मराठवाडा मुक्तीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मंत्रिमंडळाची एक बैठक मराठवाड्यात घ्यावी, त्याला त्यांनी तात्काळ मान्यता दिली, एवढेच नाही तर त्या बैठकीत अनेक विकासाच्या मुद्यांना व प्रकल्पांना चालना देण्यासाठी 54 हजार कोटींचे पॅकेज मंजूर केले. विकासाचे हे व्हिजन आदरणीय शिंदे साहेबांना आणि या महायुती सरकारला विशेष ठरवते!

आमच्या बीड जिल्ह्याला देखील त्यांनी या बैठकीत खूप काही दिले. अनेक रखडलेले प्रकल्प, काही नवीन शासकीय संस्था असे दीड हजार कोटींच्या पुढचे प्रकल्प या बैठकीत मंजूर होऊन निकाली निघाले.

मी आयुर्वेदिक गार्डन उभारण्याचा शब्द टाकला, एका दिवसात मंजूर. मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना एकत्र करून बीड जिल्ह्याचा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम परळीत घेण्याचे ठरवले. तिघांच्या एकत्र तारखा जुळायला थोडा वेळ गेला व जुळले. माझ्या परळीच्या एसटी बसस्थानकाचा 28 कोटींचा सुधारित आराखडा याच काळात मंजूर झाला होता. मी शब्द टाकला की शासकीय कार्यक्रमाच्या दिवशीच याचेही भूमिपूजन व्हावे आणि प्रशासकीय मान्यता ते निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करून तेही भूमिपूजन संपन्न झाले.

परळीच्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे, तिथल्या नियोजनाचे मुख्यमंत्री महोदयांनी कौतुक तर केलेच पण आमचा बीड जिल्हा मागासलेपणाच्या सावटातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने जिल्ह्याला तब्बल दीड हजार कोटींचा निधी त्या दिवशी दिला!

मी सामाजिक न्याय खात्याचा मंत्री असताना स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यास गती दिली होती. तसेच मी नेहमी म्हणायचो की या विभागाची उत्तम कामगिरी करून या विभागाची प्रतिष्ठा इतकी वाढविन की स्वतः मुख्यमंत्री हे खाते स्वतःकडे ठेवतील! आणि माझा तो शब्द देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी खरा केला, याचा आनंद वाटतो.

याच काळात मी स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे एक स्वप्न म्हणून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करून 10 तालुक्यात 20 वसतिगृहे सुरू केली होती. तर आणखी 31 तालुक्यात 61 वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा केली होती. माझी ती घोषणा 10 जानेवारी 2024 रोजी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण करत उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्याचा शासन निर्णय काढला! ही माझ्यासाठी केवळ आनंदाची बाब नव्हती तर ती स्व.मुंडे साहेबांच्या स्वप्नपूर्तीची कथा होती, त्यासाठी मी आदरणीय शिंदे साहेबांचा कायम ऋणी राहील.

मी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो तसेच त्यांचे जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करतो. आदरणीय शिंदे साहेबांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, ही प्रभू वैद्यनाथास प्रार्थना करतो.

शब्दांकन दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...