Friday, February 9, 2024

विशेष लेख

 मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

सर्व सामान्यांच्या उत्कर्षाचा ध्यास घेतलेले नेतृत्व

- रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे 

            राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या समृद्धीचा ध्यास घेऊन दिवसातील 16 - 16 तास मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे काम करत आहेत. राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देता यावा यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणीसाठी स्वतः मुख्यमंत्री आग्रही असल्याचे दिसते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना सक्षम बनवून त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी झटणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

            गेल्या दीड वर्षापासून राज्याला एक सक्षम नेतृत्व मिळाले आहे. या सक्षम नेतृत्वामुळे राज्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे. विकासकामांसोबत सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात समृद्धी अणणारे अनेक महत्वाचे निर्णय शासनस्तरावर घेण्यात येत आहेत. जनतेशी बांधिलकी असलेले मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या या धडाक्यामुळेच जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या दूरदृष्टी आणि कल्पक बुद्धिमतेमुळे रोजगार हमीच्या क्षेत्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले गेले आहेत.

            राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत विकासाचे दालन खुले व्हावे, त्यांचे जीवनमान उंचवावे आणि हे करत असतानाच पर्यावरणाचेही संरक्षण व्हावे अशा तिहेरी उद्देशाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात मिशन बांबू लागवड राबवण्यात येत आहे. या मिशनमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून प्रती हेक्टरी सुमारे 7 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. बांबू ही भविष्याची गरज असल्याचे ओळखून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हे मिशन सुरू केले आहे. बांबूच्या माध्ममातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता तर मिळणार आहेच. त्याशिवाय देशाची आर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. पर्यावरण रक्षणामध्ये बांबू लागवडीला अनन्यसाधारण महत्व आहे. बांबू लागवडीमुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करणे आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. शेतकऱ्यांना पडिक जमिनीवर, शेताच्या बांधावरही बांबू लावगड करता येणार आहे आणि त्यासाठी मनरेगा अंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे. असा क्रांतिकारी निर्णय घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचे उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

            यासोबतच ग्रामीण भागाच्या विकासासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा पुरेपूर वापर करण्याचे अनेक महत्वाचे आणि लाभदायी निर्णय मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या पाठिंब्याने रोजगार हमी आणि फलोत्पादन विभागाने घेतले आहेत. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राम रोजगार सेवकांना कामासोबतच चांगल्या मानधनाची हमी मिळाली आहे. ग्राम रोजगार सेवक जितके जास्त काम करतील तितके जास्त मानधन त्यांना मिळेल अशी व्यवस्था या सुधारणा दरांमध्ये करण्यात आली आहे. पूर्वी 750 मनुष्य दिवस निर्मिती  करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा किमान 2 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 24 हजार रुपये मानधन मिळत होते. त्यामध्ये सुधारणा करून हे मानधन किमान 2 हजार 500 म्हणजेच वार्षिक 30 हजार रुपये करण्यात आले. तसेच 10 हजार मनुष्य दिवसांपर्यंत काम करून त्यांना किमान 84 हजार व कमाल 1 लाख रुपयांपेक्षाही जास्त वार्षिक उत्पन्नाची हमी देण्याची व्यवस्था या सुधारणांमध्ये करण्यात आली आहे.

            राज्यातील प्रत्येक कुटुंब सुविधा संपन्न बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवण्यात येत आहे. या मिशनमध्ये पाच वर्षांसाठी 10 लक्ष सिंचन विहिरी, 7 लक्ष शेततळे तयार करणे आणि 10 लक्ष हेक्टर क्षेत्रात फळबाग, बांधावर वृक्ष लागवड, रेशीम उद्योग उभारणी व बांबू लागवड करणे असे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या माध्यमातून शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सोय निर्माण करणे आणि मजुरांच्या हाताला काम देणे असे दुहेरी उद्दीष्ट साध्य होत आहे. तसेच यामध्ये गोठे, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड, पाणंद रस्ते, शाळांना संरक्षण भिंत बांधणे, गोडाऊन बांधकाम, नाला खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण, तलावातील गाळ काढणे अशी ग्रामीण विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत.

            प्रत्येक कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान कालावधीसाठी रोजगार हमी म्हणून मागणीनुसार ग्रामीण भागातील अकुशल हाताला काम देणे. गुणवत्तापूर्ण टिकाऊ उत्पादक मालमत्ता तयार करणे, गरिबांच्या उपजीविकेच्या साधनांचा आधार मजबूत करणे, समाजिक समावेश निश्चित करणे आणि पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे या उद्देशाने सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवण्यात येत आहे.

            तसेच ग्रामपंचायत क्षमता बांधणी, कामांमधील व मानधन वितरणातील विलंब टाळणे, कामे लवकर प्राप्त करून घेणे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ई-मस्टर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात रेशीम उद्योग विकास योजना मनरेगा अंतर्गत राबवण्यात येत आहे. सिंचन सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने व प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने सिंचन विहरींच्या कामांना गती देण्यात आली आहे.

            आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण भागाचा कायपालट होत असून शेतकरी व ग्राम रोजगार सेवकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जनतेच्या हितासाठी राबणारे असे हे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांना त्यांच्या वाढ दिवसानिमित्त पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा...!

                                                                                      

शब्दांकन:

हेमंतकुमार चव्हाण,

विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व त्यांना संपर्क

No comments:

Post a Comment