Friday, February 9, 2024

 डीप क्लिन मोहिम- संपूर्ण स्वच्छतेचा ध्यास

स्वच्छता हा घटक आपल्या निरोगी जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. गेल्या काही महिन्यात मुंबईतील प्रदुषणाने धुळ, धूर यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देश, विदेश तसेच जगभरातून पर्यटक, विविध देशांचे उच्चपदस्थ येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई करण्यासाठी ‘डिप क्लिन ड्राईव्ह’ मोहीम सुरू केली आहे. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये देशात स्वच्छता मोहीम सुरू केली. आम्हीही त्यांच्या पावलांवर पाऊलं ठेवत या मोहिमेचा शुभारंभ केला. ही चळवळ फक्त शासनाची नाही तर सर्व नागरिकांची झाली आहे.

यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात महाराष्ट्राने उज्वल कामगिरी केली असून स्वच्छता अभियानाचा पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते महाराष्ट्राला नुकताच मिळाला. महाराष्ट्राच्या यशाचा हा आलेख असाच चढता राहण्यासाठी आणि स्वच्छतेच्या गुणवत्ता यादीत राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा सहभाग वाढावा, यासाठी ही मोहिम एक बुस्टर ठरणार आहे, हे लक्षात घेऊन थेट लोकांमध्ये जाऊन मोहिमेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला.

मुंबईकरांचा श्वास कोंडला जात असतांना शासन म्हणून सर्वसामान्यांची यातून सुटका करण्यासाठी आम्ही तातडीने पाऊले उचलली. मुंबईतील प्रत्येक रस्ता, नाले यांच्यातील कचरा स्वच्छ व्हावा, सोबतच वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक गल्लीतील रस्ता धुवून काढण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या. संपूर्ण मुंबईला स्वच्छ सुंदर करणाऱ्या या मोहिमेला दुहेरी यश मिळाले. यामुळे मुंबईतील प्रदुषणाची पातळी खाली आली. सोबतच मुंबईकरांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होऊन त्यांचा परिसर स्वच्छतेते सहभाग देखील वाढला. मोहिमेच्या यशाबद्दल सांगतांना याचे खरे हिरो स्वच्छता कर्मचारी आहेत, हे देखील नमूद करावे लागेल. त्यांच्या दिवस-रात्र सुरु असलेल्या कामांमुळेच हे अभियान मुंबईत यशस्‍वी होऊ शकले आहे.

संपूर्ण स्वच्छता मोहीमेचे हे यश लक्षात घेऊन टप्प्या टप्प्याने संपूर्ण राज्यात या मोहिमेचा विस्तार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात एका भव्‍य दिव्य सोहळ्यात या राज्यस्तरीय मोहिमेचे उद्घाटन देखील पार पडले. या मोहीमेच्या माध्यमातून लवकरच राज्य स्वच्छ, सुंदर व हरित होण्यास मदत होणार आहे. मोहिमेच्या दरम्यान 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. या मंगल सोहळ्याचे निमित्त साधून देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन प्रधानमंत्री महोदयांनी केले होते. या आवाहनाला संपूर्ण स्वच्छता मोहीमेच्या माध्यमातून राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

स्वच्छता मोहिमेअंतर्गत केवळ कचरा उचलणे, रस्ते स्वच्छ करणे एवढाच विचार न करता प्रदूषण कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरीत पट्टे तयार करणे, जेणेकरुन ऑक्सिजन पार्क तयार होतील, यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. तसेच  मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करुन शहरात जंगले (Urban forest) तयार करण्यात येत आहेत. विविध ठिकाणी ग्रीन पॅच तयार करुन तो परिसर हिरवागार करणे. चौक, भिंतीचे सुशोभिकरण करणे ही कामे सुद्धा पुढच्या टप्प्यात करण्यात येत आहेत.

संपूर्ण स्वच्छता मोहिमेतून सर्व शहरे स्वच्छ होत आहेत. राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी सुद्धा कायमस्वरुपी योजना राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

स्वच्छतेसोबतच नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे याकरिता शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम आपण राबविणार आहोत. या उपक्रमात  मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक घरा घरात भेट देऊन आरोग्य आपल्या दारी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य  तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

स्वच्छता हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे.  स्वच्छतेचा हा मूलमंत्र राज्यातील प्रत्येक गावात, घरा-घरात पोहोचला पाहिजे यासाठी या स्वच्छ्ता मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात स्वच्छतेची गुढी उभारायला हवी. आपल्या या प्रयत्नातूनच स्वच्छता अभियानात देशात अग्रेसर असलेला आपला महाराष्ट्र आपला हा बहूमान टिकवू शकणार आहे. चला तर मग आपण सर्व स्वच्छ, महाराष्ट्र आणि सुंदर महाराष्ट्रासाठीच्या प्रयत्नात सहभागी होऊया !

0000

No comments:

Post a Comment