Friday, February 9, 2024

विशेष लेख

 

विधायक कार्याचा कृतिशील आदर्श!

- शंभूराज शिवाजीराव देसाई,

राज्य उत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री- सातारा व ठाणे जिल्हा

महाराष्ट्राचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, जनहितदक्ष नेतृत्व मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांचा आज वाढदिवस! त्यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो.

राजकीय-सामाजिक जीवनात वावरताना विचार, तत्त्व यांना कृतीची पूरक जोड देणारी जी काही मोजकी नेतेमंडळी आहेत, त्यात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा अग्र क्रमांक लागतो. म्हणून अवघ्या दीड वर्षांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी, जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यकर्ता वृत्तीने दिवसाचे सतरा-अठरा तास झोकून देऊन काम करणारे नेतृत्व आज त्यांच्या रूपाने राज्याला लाभले आहे. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता ते महाराष्ट्रासाठी ज्या तळमळीने, तडफेने कामे करतात त्यास तोड नाही. मंत्रिमंडळातील त्यांचा एक सहकारी म्हणून काम करताना त्यांच्या या काम कार्यशैलीतून आम्हास नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. 

आदरणीय शिंदेसाहेब आता जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असले तरी राज्याच्या विधिमंडळात सहकारी म्हणून २००४ पासून आम्ही एकत्र काम करीत आहोत. सन २००४ मध्ये एकाच वेळी आम्ही दोघेही विधानसभेवर निवडून आलो. सत्ता असो अथवा नसो, मैत्री कशी जपावी, सहकाऱ्यांशी कसा स्नेह ठेवावा, जनतेच्या हितासाठी कसे सक्रिय राहावे, याचा वस्तुपाठ मा. शिंदे साहेबांनी घालून दिला आहे. कोरोना काळात शिंदे साहेब रोज अडीच लाख अन्नाची पाकिटे वाटत होते. सांगली-कोल्हापूरला अतिवृष्टीने झोडपले, तेव्हा पूरग्रस्तांसाठी ७० हजार चादरी घेऊन ते धावले होते. महाडला दरडी कोसळल्या, तेव्हा मुसळधार पावसात, गुडघाभर चिखलात उभे राहून ते कार्यकर्त्यांसह अहोरात्र आपद्ग्रस्तांना मदत करीत होते. मुंब्रा-भिवंडीमध्ये इमारती कोसळल्या, तेव्हा बेघर झालेल्या लोकांची निवास व जेवणखाण्याची त्यांनी व्यवस्था करून दिली. त्यांच्या संवेदनशील कार्यपद्धतीत आता ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही खंड पडलेला नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात रायगडमधील इर्शाळवाडी येथे डोंगर खचून दुर्घटना घडली, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब पहाटेच दुर्घटनास्थळी पोहोचले. दुर्घट असा डोंगर चढून घटनास्थळावरील ग्रामस्थांना दिलासा दिला. त्यांच्या या संवेदनशीलतेने मदतकार्य करणाऱ्या पथकांनाही ऊर्जा मिळाली. आपल्या कृतीतून आदर्श घालून देणारे असे नेतृत्व विरळाच! त्यामुळेच दीड वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असा उठाव झाला, तेव्हा अवघा शिवसैनिक त्यांच्या बाजूने एकवटल्याचे महाराष्ट्राने, देशाने आणि जगानेही पाहिले.

शिंदे साहेबांनी दूरदृष्टीने राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, नगरविकास अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी कार्यक्षमपणे सांभाळली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे आकारास आला. हा महामार्ग आज महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेखा म्हणून ओळखला जातो आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेतील एकनाथजी शिंदे साहेब असे एकमेव मुख्यमंत्री आहेत, जे सुरक्षा आणि शिष्टाचार न बाळगता सर्वसामान्यांना भेटतात. त्यांच्याशी संवाद साधतात. आज राज्यातील प्रत्येकाला ते आपला मुख्यमंत्री वाटतात. आपण जनसामान्यांचे मुख्यमंत्री आहोत, ही भावना बाळगून ते सर्वांना भेटत असतात. वैद्यकीय साहाय्यासाठी त्यांच्याकडे दररोज अक्षरशः रीघ लागते. प्रत्येकाला आपापल्या परीने ते नेहमीच मदत करतात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या आरोग्य चळवळीत उभ्या केलेल्या कामातून अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना तळागाळातील परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक अनुदान देणे असो किंवा दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका शिंदे साहेबांनी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची विक्रमी मदत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ६७२ कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. कृषी विकास होऊन आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावे, यासाठी शिंदे साहेब नेहमीच प्रयत्नशील असतात. शेतीबरोबरच उद्योग क्षेत्राकडेही त्यांचे तितकेच लक्ष असते. अलीकडेच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान शिंदे साहेबांच्या उपस्थितीत राज्याने ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा शिंदे साहेबांचा दावोस दौरा महत्त्वाचा ठरला आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून २ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले शिंदे साहेब हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, याचा आम्हास अभिमान आहे. सातारा जिल्ह्यातील विकासकामांकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांचा विकास व्हावा, जिल्ह्यात पर्यटन वाढ व्हावी, यासाठी ते आग्रही असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळत असताना सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न तातडीने मार्गी लागतात, याचे समाधान आहे. सामान्यातल्या सामान्य लोकांना ओळखणारा, त्यांच्या कष्टाची, मनाची, चिंतांची जाण राखणारा मुख्यमंत्री त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श उराशी बाळगून वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सामाजिक बांधिलकीने राजकारण-समाजकारण करणाऱ्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो आणि राज्याची, येथील जनतेची सेवा त्यांच्या हातून अखंड घडत राहो, अशी सदिच्छा व्यक्त करतो.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...