Friday, February 9, 2024

 मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा लेख

कामाप्रती समर्पित असणारा नेता

हसन मुश्रीफ

(मंत्री, वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य) 

मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मेहनती, समर्पित आणि निष्ठावान आहेत.  ते अत्यंत शिस्तप्रिय आणि जे काही काम निवडतात त्यात ते प्राविण्य कमवितात. त्यांच्या कामाप्रती समर्पित असतात.  त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि समृद्धी मिळविण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात. यशस्वी होण्यासाठी ते शॉर्टकट मारत नाही.  वरून कितीही कठोर दिसत असले तरी आतून मात्र ते मृदु आणि मधुर आहेत. ते प्रेमळ आणि काळजी घेणारे आहेत. आपल्या कामाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घणा-या या नेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक अनंत शुभेच्छा.. त्यांच्याविषयी दोन शब्द...

मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे नगर विकास आणि मी ग्रामविकास मंत्री म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये  काम केले आहे. श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे २० वे मुख्यमंत्री आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. २००४,२००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले आहेत.

  श्री.एकनाथ शिंदे यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता.

सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्यातील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली.

सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) ते पदसिद्ध अध्यक्ष झाले आणि एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम त्यांनी केले.

श्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प यामध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार, वांद्रे-वर्सोवा सी लिंक,ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, शीळ-कल्याण रुंदीकरण, ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता अशी महत्त्वाची कामे झाली आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा प्रयत्न त्यानी केला.

आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला.

खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने श्री.शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे.

मी आरोग्याला प्राधान्य देणारा असल्याने मला वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी त्यांनी सोपवली आहे. आभ्यासू नेतृत्व असल्याने त्यांनी माझ्याकडे असलेले कौशल्य गुणानुसार खाते दिली आहेत.मुख्यमंत्री मा.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध निर्णय घेण्यात आले.त्यातील काही महत्वाचे निर्णय पुढील प्रमाणे..

*प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण. त्यानुसार या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू. परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी सादर. नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसलेल्या 9 जिल्ह्यांत (पालघर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि वर्धा) शासकीय वैद्यकीय महाविद्यालये लवकरच सुरू करण्यात येणार.

* राज्यातील शासकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करणे व नव्याने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याकरिता आशियाई विकास बँक संस्थेकडून सुमारे 4,000 कोटी व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी या संस्थेकडून सुमारे 5,500 कोटी रुपयांचे कर्ज घेणार.

* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमार्फत रक्तदान मोहीम, स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान, स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान, स्वच्छ मुख अभियान, थायरॉईड जनजागृती व उपचार अभियान आणि अवयव दान जनजागृती अभियाने सुरू करण्यात आली असून सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत.

* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रूग्णालयातील परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण 5,182 पदे भरण्याबाबतची जाहिरात 10 मे 2023 रोजी प्रसिद्ध. ही भरती प्रक्रिया टी.सी.एस. या नामांकित कंपनीकडून ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

* वैद्यकीय महाविद्यालयास जोडून वाढीव 157 नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देण्याबाबत सन 2023-2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

* जळगाव येथे मेडिकल हब निर्माण करण्यात आले असून त्यानुसार शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरू झाले आहे, तर राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय जळगाव येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून सुरू.

* भारतीय वैद्यकीय आयोगाच्या मानकांनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक निवासी वैद्यकीय अधिकारी यांची 1,432 पदे निर्माण करण्यात आली.

* विविध संवर्गातील एकूण 5182 पदांसाठी  भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आली.

 

पुन्हा एकदा वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

शब्दांकन: राजू धोत्रे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

०००००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...