Thursday, December 14, 2017

महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
  नांदेड, दि. 14 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 18 डिसेंबर 2017 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
भरडधान्य खरेदी केंद्र खुपसरवाडीला सुरु ;
शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी   
नांदेड दि. 14 :- खरीप हंगाम 2017-18 मधील भरडधान्य खरेदीसाठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासकीय हमी भावाने भरडधान्य (ज्वारी, बाजरी, मका) खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र नांदेड तालुक्यातील खुपसरवाडी येथील तहसील गोदाम येथे सुरु करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने कृषि उत्पन्न बाजार समिती नांदेड येथे नोंदणी करावी, असे आवाहन शेतकरी बांधवांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
भरडधान्याचे आधारभूत दर पुढील प्रमाणे आहेत. मालाचा प्रकार - ज्वारी ( एफएक्यु) मालदांडी प्रति क्विंटल आधारभूत किंमत 1 हजार 725 रुपये. ज्वारी (एफएक्यु) संकरीत 1 हजार 700 रुपये. बाजरी (एफएक्यु) 1 हजार 425 रुपये. मका (एफएक्यु) 1 हजार 425 रुपये आहे.
भरडधान्य खरेदी केंद्रावर एफएक्यु दर्जाचे भरडधान्य खरेदी करण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी सातबाराचा उतारा पीक पेऱ्याची नोंद असलेला, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत सोबत आणावी. नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर भरडधान्य विक्रीसाठी आणण्यासाठी भ्रमणध्वनीवरुन संदेश देण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

Wednesday, December 13, 2017

लेख

आता कर्जमुक्तीकडे वाटचाल
 शेतकरी सुखी तर संपूर्ण राज्य सुखी ही अत्यंत चांगली भावना लक्षात घेऊन फडणवीस सरकारने केलेल्या कर्जमाफीमुळे आता राज्याने शंभर टक्के कर्ज मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. दिनांक 24 जुन 2017 ला राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय देशातील अन्य राज्याच्या तुलनेत सर्वात मोठा आणि ऐतिहासीक आहे. सन 2013 ते 2015 पर्यत राज्याला नैसर्गिक संकटाना सहन करावे लागले. आवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी बेजार असतांनाच फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातुन राज्यातील 44 हजार तलावातुन गाळ काढला त्यामुळे त्यात मुबलक जलसाठा तयार होऊ शकला. जलयुक्त शिवार योजनेपासुन अनेक लोकोपयोगी निर्णय घेतांना फडणवीस सरकारने सामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवुन नियोजनबद्ध उत्कृष्ट अमलबजावणी सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही तर राज्यातील संपुर्ण शेतकऱ्यांना दिवाळीचा आनंद देणारी ठरली देशातील सर्वात मोठा 34 हजार कोटी रुपयाच्या कर्जमाफीचा निर्णय ही साधी गोष्ट नव्हती, ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि राज्याचे नेतृत्व किती धाडशी आणि लोकाच्या कल्याणाचे आहे. हे देशाला दाखवुन दिले या कर्जमाफीमुळे राज्यातील 34 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्यास मदत मिळणार आहे.
शेतकरी कर्जमाफी हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने निर्मित कार्यक्रमात मी मुख्यमंत्री बोलतोयमध्ये राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतःची अभ्यासुवृत्ती जनतेला दाखवुन दिली. कर्जमाफी हे अंतिम उद्दिष्ट नसुन शंभर टक्के कर्जमुक्त महाराष्ट्र हे आहे. त्यामुळेच पुढील पाच वर्षात खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्या शिवाय राहणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 83 हजार 950 शेतकऱ्यांना 396 कोटी, 42 लाख एवढ्या मोठ्या रक्कमेची कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे विविध कारणाने बेजार असलेल्या शेतकऱ्याला जगण्याचे बळ मिळाले आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी सुखी झाला पाहिजे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तळमळ आता फळाला आली आहे. कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना एक लाख 50 हजार पर्यत तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यास शासन प्रयत्नशील आहे. नांदेड जिल्ह्यात एकुण 83 हजार 950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी, 42 लाख, 16 हजार, 887 रूपये  जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकाकडून 11 डिसेंबर 2017 पर्यंत 57 हजार, 239 शेतकऱ्यांच्या खात्यात 359 कोटी, 21 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे नांदेड जिल्हयात एकुण 83 हजार, 950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी 42 लाख, 16 हजार 887 रुपये जमा केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशासन व बॅक स्तरावरून कर्जाची माहिती लेखा परिक्षण करून माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची लिस्ट बँकाना देण्यात आली त्या यादीनुसार बॅंकेमार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभाची रक्कम हस्तांतरीत करणे सुरू झाले आहे. याची इंतभुत माहिती एसएमएस द्वारे शेतकऱ्यांना दिली जात आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना विविधागाने  मदत करण्याचा उपक्रम खरोखर ऐतिहासीक ठरणारा आहे.
शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी देऊन सरकार मोकळे झालेले नाही तर शेतीला मुबलक विजपुरवठा व्हावा यासाठी सोलर फिडर योजना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे 12 तास विजपुरवठा होईल आणि शेती सिंचन ही होईल. हे राज्य छत्रपती शिवरायाच्या विचारावर चालणारे आहे. शिवरायाचा आदर्श शेतकऱ्यांपुढे सतत असल्यामुळे त्यांच्या नावे सुरू केलेली योजना राज्याला बळ देणारी ठरली आहे. कर्जमाफी अंतिम नसुन शेती उद्योगात गुंतवणुक वाढली पाहिजे, शेतीला पुरक असणारे जोडधंदे, कृषी मालाला योग्य बाजारपेठ, हमी भाव आणि दळण वळणाच्या सोयी आदीसाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे. 
बळीराजा चेतना अभियानांतर्गत विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण 30 टक्के कमी झाले आहे. सन 2015 च्या तुलनेत सन 2016 चे आत्महत्येचे आकडे 30 टक्केने कमी आहेत हे या योजनेचे फलित म्हणावे लागेल, संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमार्फत आर्थिक सहाय्य करून त्याच्या जगण्याला बळ दिले जात आहे. कर्जमाफीच्या निर्णयाचे मराठवाड्यातील नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांनी स्वागत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासुन अभिनंदन केले आहे. हे सरकार आता सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. कर्जमाफीमुळे राज्यातील 8 लाख 40 हजार शेतकऱ्यांच्या आयुष्यात यंदाची दिवाळी वेगळाच आंनद देऊन गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला कर्ज माफीचा निर्णय न भुतोन भविष्यती ठरणारा आहे. म्हणुनच राज्यातील 20 हजार शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचेशी एसएमएसद्वारे संवाद साधुन निर्णयाचे स्वागत केले आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची संपुर्ण माहिती सामान्य माणसापर्यंत पोहचावी याची दक्षता घेतली आहे. कर्जमाफी करतांना शेतकऱ्यांची पात्रता ठरविताना थकबाकीदार शेतकऱ्यांचे अल्प/अत्यल्प भुधारक याप्रमाणे जमीन धरणेचे क्षेत्र विचारात न घेता 1 एप्रिल 2009 रोजी व त्यानंतर पिककर्ज घेतलेल्या कर्जापैकी 30 जुन  2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना काही निकषाच्या आधीन राहुन सरसकट कर्जमाफी देण्यात यावेत कर्ज माफीच्या संदर्भात काढण्यात आलेल्या पत्रकात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. नऊ हजार कोटी मंजुर करण्यात आले होते. आता या योजनेअंतर्गत मात्र 34 हजार कोटी कामी येणार आहेत. महत्वाचे म्हणजे बळीराजाच्या विद्यमान सरकारवरील विश्वास वाढला आहे. संकटकाळी सरकार आपला पाठीराखा आहे, ही समज आता 100 टक्के कर्जमुक्तीकडे वाटचाल करणारी ठरणार आहे. 

ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे
मो. 8087565172

*******

Tuesday, December 12, 2017


किनवट नगरपरिषद मतदान, मतमोजणी
केंद्र परिसरात 144 कलम लागू
 नांदेड दि. 12 :- जिल्ह्यातील किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक हद्दीतील मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात बुधवार 13 डिसेंबर रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत व मतमोजणीच्या दिवशी जिल्हा परिषद मुलांची शाळा साईनगर, किनवट या मतमोजणी केंद्र परिसरात गुरुवार 14 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत प्रतिबंधीत आदेश जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी काढले आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी बुधवार 13 डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून तसेच गुरुवार 14 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा परिषद मुलांची शाळा, साईनगर किनवट या मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे, असेही आदेशात नमुद केले आहे.

00000
कर्जमाफी दिल्याबद्दल पिंपळगावात   
शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता  

नांदेड दि. 12 :- राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी दिल्याबद्दल नांदेड तालुक्यातील पिंपळगाव (निमजे) येथील शेतकऱ्यांनी राज्य सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन अभिनंदन केले.
कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न राज्य सरकाने केला आहे. नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजे या गावातील शेतकरी विठ्ठल गंगाराम डक, गंगाधर धर्माजी डक कर्जदाराची पत्नी श्रीमती ताराबाई गंगाधर डक, रामजी सिताराम डक (निधन) यांचा मुलगा माधव रामजी डक, मधुकर व्यंकटराव पुंड यांची पत्नी श्रीमती सुनिता मधुकर पुंड , पार्वतीबाई शंकरराव डक, दिलीप व्यंकटराव पुंड यांचे भाऊ प्रतापराव पुंड यांची मुलाखत घेण्यात आली.  
श्रीमती सुनिता पुंड यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेडून 40 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज शासनाकडून पूर्णपणे माफ झाल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रतापराव पुंड यांनी सेवा सहकारी सोसायटीचे 30 लाभार्थी असून  20 शेतकऱ्यांचे 25 टक्के कर्ज  माफ झाले असून तर 10 सभासदांना पूर्ण कर्ज माफी मिळाली आहे.  कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र व नवीन कर्ज मिळणार असून सावकारी, आडतीवर पैसे उचलण्याची आता गरज राहिली नाही. त्यांना कोणत्याही बँकेकडून शेतीसाठी कर्ज  मिळू शकते. ही कर्ज माफी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
श्रीमती ताराबाई डक यांनी 40 हजार रुपयाचे तर गंगाधर डक यांनी 35 हजार रुपयाचे कर्ज सहकारी सोसायटी नवा मोंढा नांदेड यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. परंतु, शेतीच्या नापिकीमुळे हे कर्ज भरु शकलो नाही. राज्य शासनाकडून झालेल्या कर्जमाफीमुळे आम्हा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले.
विठ्ठल डक या शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून 40 हजार कर्ज घेतले होते त्यापैकी 25 हजारांचे कर्ज शासनाकडून माफ झाल्याचे सांगितले. मागील तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थती असल्याने शेतकरी अडचणीत होता. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज माफी झाल्याने शेतकरी आनंदी असल्याचेही यावेळी ते म्हणाले. रामजी डक यांनी 9 हजार रुपये कर्ज घेतेले होते. माधव रामजी डक (मुलगा) यांनी माझ्या वडिलांनी घेतलेले कर्ज शासनाने माफ केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

 0000000
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत
नांदेड जिल्ह्यातील 83 हजार 950 शेतकऱ्यांना
396 कोटी 42 लाख रुपयांची कर्जमाफी  
 नांदेड दि. 12 :- राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय घेऊन कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यास शासन प्रयत्नशील आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 83 हजार  950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी 42 लाख 16 हजार 887 रुपये जमा केले आहेत. जिल्ह्यात डिसेंबर 2017 पासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून ती आता पुर्णत्वाच्या टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रवीण फडणीस यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 11 डिसेंबर 2017 अखेर 2 हजार 331 शेतकऱ्यांच्या खात्यात 7 कोटी 6 लाख 22 हजार 986 रुपये जमा करण्यात आले आहेत. तर प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात 24 हजार 380 शेतकऱ्यांच्या खात्यात 30 कोटी 13 लाख 93 हजार 901 रुपये जमा करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयकृत / ग्रामीण बँकांकडून 11 डिसेंबर 2017 अखेर 57 हजार 239 शेतकऱ्यांच्या खात्यात  359 कोटी 21 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे  नांदेड जिल्ह्यात एकूण 83 हजार  950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी 42 लाख 16 हजार 887 रुपये जमा केले आहेत.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशासन व बँक स्तरावरुन कर्जाची माहिती लेखापरीक्षण करुन माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट बँकांना देण्यात आली आहे. या यादीनुसार बँकेमार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभाची रक्कम हस्तांतरीत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर रकमेचा लाभ बँकेकडून प्रत्यक्ष दिला जात आहे त्यांना बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीद्वारे एसएमएस संदेश पाठविण्यात येणार आहेत.
            ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना किंवा बँकांकडून कर्जाबाबत माहिती भरताना काही त्रुटी राहिल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या माहितीची दुरुस्ती तालुकास्तरीय समितीकडून करण्यात येत असून उर्वरीत सर्व पात्र शेतकरी या योजनेपासून वंचीत राहणार नाहीत तसेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासन व प्रशासनाकडून पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे, असेही जिल्हा उपनिबंधक  श्री. फडणीस यांनी सांगितले आहे.

00000

Monday, December 11, 2017

किनवट नगरपरिषद क्षेत्रात
मतदानासाठी बुधवारी सुट्टी
नांदेड , दि. 11 :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद किनवट सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी बुधवार 13 डिसेंबर 2017 रोजी संबंधीत क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी बुधवार 13 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी शासनाने जाहीर केली आहे. ही सुट्टी निवडणूक क्षेत्रातील मतदारासंघातील जे मतदार उपरोक्त नमूद कार्यक्षेत्राच्या बाहेर कामासाठी असतील त्यांना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच केंद्र शासनाचे शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सुट्टी लागू राहील, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी पत्रात नमुद केले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...