Friday, July 7, 2017

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आज आयोजन
तडजोडीसाठी 4 हजार 603 प्रकरणात प्रयत्न होणार  
            नांदेड दि. 7 :- जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्हयातील सर्व न्यायालयात शनिवार 8 जुलै 2017 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, भूसंपादन, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, कामगारांची प्रकरणे तसेच विविध बॅंकांची व विविध मोबाईल कंपन्यांची दाखल पूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार असून अद्यापपर्यंत 2 हजार 463 दाखल पुर्व प्रकरणे व न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 2 हजार 140 प्रकरणे अशी एकूण 4 हजार 603 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत. या लोकन्यायालयात आपली प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
            लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी एकूण 12 पॅनल तयार करण्यात आले असून त्यावर न्यायाधीश व विधीज्ञ तडजोडीसाठी प्रयत्न करणार आहेत. शनिवार 8 जुलै 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे,  अभियोक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे,‍ जिल्हा सरकारी वकील अॅड. अमरिकसिंघ वासरीकर,   जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश,  विधिज्ञ व संबंधीत पक्षकारांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून हा सोहळा संपताच प्रकरणे तडजोडीने मिटविण्यास सुरूवात होणार आहे.
सर्व विधीज्ञ, भू-संपादन अधिकारी, विमाकंपनी अधिकारी, विविध मोबाईल कंपन्यांचे अधिकारी, बँका व फायनान्स कंपन्यांचे अधिकारी तसेच पक्षकार बांधव यांनी आपली प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व हे लोकन्यायालय यशस्वी करावे असेही आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डी. टी. वसावे यांनी केले आहे.

0000000
सिल्क म्युझियम, माहितीगृहाचे रविवारी
वस्त्रोद्योग मंत्री देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड दि. 7 :- रेशीम संचालनालयाच्यावतीने आयोजित जिल्हा रेशीम कार्यालय पाचगणी रोड वाई जि. सातारा येथे सिल्क म्युझियम, माहितीगृहाचे उद्घाटन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते रविवार 9 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वा. संपन्न होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणुन जलसंपदा, जलसंधारण, संसदीय कार्य राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती राहणार आहे. सर्वश्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, शंभुराजे देसाई, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे, असे रेशीम विकास अधिकारी श्रेणी -2 नांदेड यांनी कळविले आहे.

0000000
सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती
            नांदेड दि. 7 :-  सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथील वसतीगृहामध्ये कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक व अवलंबितांमधून पदे भरावयाची आहेत. माजी सैनिक / अवलंबित उपलब्ध नसल्यास पदे नागरी संवर्गातून भरण्यात येणार आहेत.
             चौकीदार (एक पद)- पात्रता माजी सैनिक, स्वयंपाकी (तीन पदे)- किमान एक वर्ष अनुभव, सफाई कामगार (एक पद)- किमान एक वर्ष अनुभव, सहा. वसतीगृह अधिक्षक (एक पद) या पदासाठी माजी सैनिक (एन.सी.ओ.) / अवलंबित किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी 02462-245510 व 9689677217 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

00000
  महाविद्यालय, शाळांनी विद्यार्थ्यांची 
परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत
            नांदेड दि. 7 :-  सर्व कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक शाळांनी जुलै-ऑगस्ट 2017 च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने लॉगीनमधून डाऊनलोड करुन घ्यावीत. नेहमीच्या पद्धतीने छापील प्रवेशपत्र दिली जाणार नाहीत. तसेच सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र स्वाक्षरी व शिक्यानिशी विद्यार्थ्यांना हस्तांतरीत करावीत, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव यांच्यावतीने लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याची कार्यवाही जवळपास पूर्ण झाली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

000000
सैनिकी मुलांचे वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
नांदेड दि. 7 :- जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत विष्णुपुरी येथील सैनिकी मुलांचे वसतीगृहात अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त माजी सैनिक, विधवा व इतर नागरिकांच्या पाल्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.  जिल्हयातील माजी सैनिक / विधवांनी याचा लाभ घ्यावा.
प्रवेश अर्ज वसतीगृह विष्णुपुरी येथे विक्रीस उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी 02462-245510 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कप्तान सुनील गोडबोले यांनी केले आहे.  

00000
जीएसटीमुळे रासायनिक खताच्या किंमती कमी
खत विक्रेत्यांना जीएसटीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 7 :- गुडस ॲन्ड सर्व्हिस टॅक्स (GST) लागु होण्यापूर्वी रासायनिक खतावर 1 टक्के उत्पादन शुल्क (Excise Duty) व 5 टक्के मुल्य आधारीत कर (VAT) लागु होता. मात्र दिनांक 1 जुलै 2017 पासून अनुदानीत रासायनिक खतावर सरसकट 5 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनुदानीत रासायनिक खताच्या किंमती 1 जुलै 2017 पासून कमी झाल्या आहेत. घाऊक किरकोळ विक्रेत्यांना जीएसटीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
किरकोळ, घाऊक खत विक्रेत्यांनी कमी झालेल्या दराबाबत ग्रेडनिहाय दर, दरफलकावर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना नवीन दराने खताची खरेदी करावी.  खतावरील जीएसटी बाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र शासनाने मदत दुरध्वनी क्रमांक दिलेला आहे. त्यांचा नंबर 011-26106817 हा आहे. खतावरील जीएसटीबाबत शंका असल्यास प्रश्न विचारुन शंकानिरसण करुन घेता येईल. हा मदत क्रमांक केंद्र शासनाने fert.nic.in या संकेतस्थळावर सुध्दा प्रसिद्ध केला आहे. या व्यतिरिक्त केंद्र शासनाने सर्वसाधारण जीएसटीबाबत येणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी पुढील दुरध्वनी क्रमांक मदत केंद्रे म्हणून जाहीर केले आहेत. 011-23094160, 011- 23094161, 011- 23094162, 011- 23094168, 011- 23094169. अशी माहिती कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी दिली आहे.

0000000
‘मी मुख्यमंत्री बोलतोय’
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन रविवारी प्रसारण
कर्जमाफीविषयक प्रश्नांना सडेतोड उत्तरे

नांदेड , दि. 7 : कर्जमाफी सरसकट का नाही, कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, 34 हजार कोटींचा मेळ कसा घातला, कर्जमाफीने शेतकरी सुखी होईल काय, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय का…. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील अशा विविध प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. येत्या रविवारी 9 जुलै 2017 रोजी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्यांना पडलेल्या या प्रश्नांना उत्तरे मिळणार आहेत.  
राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाच्या ‘शेतकरी कर्जमाफी’ या विषयावरील पहिल्या भागाचे येत्या रविवारी म्हणजे 9 जुलै 2017 रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन सकाळी 10 वाजता प्रसारण होणार आहे. मुंबई दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनी, झी 24 तास आणि साम टिव्ही या वाहिन्यांवरुन सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होईल. याच दिवशी सकाळी 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर त्याचे प्रसारण होईल. 
आकाशवाणीवरुनही होणार प्रसारण
या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवार दिनांक 10 जुलै 2017 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन सायंकाळी 5.30 वाजता होईल. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण सोमवार दि. 10 जुलै, मंगळवार दि. 11 जुलै व बुधवार दि. 12  जुलै रोजी सकाळी 7.25 वाजता होईल. 
या कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्यभरातील लोकांनी विचारलेल्या तसेच कार्यक्रमाच्या चित्रीकरणावेळी उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाआधी ई-मेल आणि एसएमएसवरुन लोकांकडून या विषयावर प्रश्न मागविण्यात आले होते. त्याला राज्याच्या विविध भागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण 20 हजाराहून अधिक जणांनी यात सहभाग घेऊन शेतकरी कर्जमाफी, कर्ज पुनर्गठन, शेतमालाला हमीभाव, नवीन पीक कर्ज अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले होते. यातील निवडक प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात उत्तरे दिली आहेत. 
व्यवसाय अडचणीत आला म्हणून कर्ज माफ करणे योग्य आहे काय, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय का, कर्जमाफी सरसकट का नाही, कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, 40 लाखांचा आकडा कोठून आला, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्त फायदा ?, 34 हजार कोटींचा मेळ कसा घातला, जॉईंट अकाऊंट खातेदारांना काय फायदा होणार, चुकीच्या लोकांना लाभ मिळणार नाही याची काय खात्री, कर्जमाफीने शेतकरी सुखी होईल काय अशा विविध प्रश्नांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या कार्यक्रमात उत्तरे दिली आहेत. 
0000000


वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...