Friday, February 10, 2017

जि.प., पं.स. निवडणूक प्रक्रियेबाबत
मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून समाधान व्यक्त
जि.प.साठी 374, पं.स.साठी 603 उमेदवार रिंगणात
नांदेड दि. 10 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आतापर्यंतच्या  प्रक्रियेबाबत जिल्ह्यासाठीचे मुख्य निवडणूक निरीक्षक तथा परभणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी   सुशील खोडवेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या दालनात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत सादर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेचा तपशील सादर केल्यानंतर श्री. खोडवेकर यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली. बैठकीस जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभागाच्या समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खोडवेकर यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून लोहा, कंधार, मुखेड आणि देगलूर या तालुक्यांचाही दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडूनही निवडणूक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. दौऱ्यात त्यांनी विविध मतदान केंद्रांचीही पाहणी केली. तसेच केंद्रांच्या ठिकाणच्या सुव्यवस्थेबाबत सूचनाही केल्या. या दौऱ्यानंतर आज जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीतही श्रीमती ढालकरी यांनी निवडणूक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत तपशीलवार  माहिती सादर केली. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यापासून ते अंतिम उमेदवारी निश्चित करण्याची प्रक्रिया, मतदान केंद्राची निश्चिती, ईलेक्ट्रॅानिक मतदान यंत्रांचे वाटप, निवडणूक कार्यक्रमांविषयी प्रशिक्षण, आचारसंहिता पालनाची अंमलबजाणी व त्यासाठी विविध पथकांचे नियुक्त्या, या पथकांनी सादर केलेले अहवालही याबैठकीत सादर करण्यात आली. निवडणूक आणि मतदानाची प्रक्रिया निर्भय आणि शांतता व सुव्यवस्थेत पुर्ण व्हावी, यासाठी विविध उपाय योजना या अनुषंगानेही चर्चा झाली. एकंदर निवडणूक प्रक्रिया विहित पद्धतीने आणि सुरळीतपणे सुरु असल्याबद्दल श्री. खोडवेकर यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, या निवडणुकीसाठी आज अंतिम उमेदवारी यादी निश्चित करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषद गटासाठी 374 व पंचायत समिती गणासाठी 603 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून देण्यात आली आहे.
 जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांच्यासाठी निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे आहे. सुरुवातीला जिल्हा परिषद गटातील निवडणूक रिंगणातील उमेदवारांची तालुकानिहाय संख्या ( कंसात पंचायत समिती गणासाठी उमेदवारांची संख्या ) पुढील प्रमाणे -  माहूर- 10 (24)  , किनवट-  48 (73) , हिमायतनगर –  13 (16). हदगाव- 45 (54) , अर्धापूर- 12 (20) , नांदेड- 34 (43) , मुदखेड- 7 (17) , भोकर- 16 (31) , उमरी- 9 (22), धर्माबाद- 12 (20) , बिलोली- 26 (36)  , नायगाव- 21 (39) , लोहा- 28 (57) , कंधार-  29 (56), मुखेड- 33 (56) , देगलूर- 31 (39) असे एकूण जिल्हा परिषद गटासाठी 374 व पंचायत समिती गणासाठी 603 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.  

0000000
..ही तर “उज्ज्वल नांदेड” च्या वाटचालीतील
घवघवीत यशाची नांदी – जिल्हाधिकारी काकाणी
अधिव्याख्याता पदासाठी निवडलेल्या 11 जणांचा सत्कार संपन्न

नांदेड दि. 10 :- अधिव्याख्याता वर्ग-2 पदासाठी निवड झालेले अकरा उमेदवार म्हणजे “उज्ज्वल नांदेड”च्या वाटचालीतील घवघवीत यशाची नांदी, असल्याची भावना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे व्यक्त केली. उज्ज्वल नांदेड उपक्रमातील अभिरूप मुलाखतीद्वारे शिक्षण-प्रशिक्षण संस्था अधिव्याख्याता पदांसाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील अकरा उमेदवारांचा आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विशेष सत्कार केला.  हा क्षण या अकरा उमेदवारांच्या आणि त्यांच्या स्नेह्यांसाठी अवर्णनीय समाधानाचा होता. या निवडीत श्रीमती करूणा आवरगंड यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याचे विशेष कौतूकही होते.
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षातील एक उपक्रम म्हणून एप्रिल 2016 मध्ये दहा आठवड्यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान राबविण्यात आले. तीव्र उन्हाळा आणि टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी त्यावेळी विविध विभागांच्या समन्वयातून या उपक्रमाला सुरवात केली. यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड सेतू समिती आणि समितीची अभ्यासिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांचा सक्रीय सहभाग घेण्यात आला. यातूनच “उज्ज्वल नांदेड”ची संकल्पना साकारली. या संकल्पनेत पुढे दोन महाविद्यालायांचाही सहभाग घेण्यात आला. त्यातूनच ‘उज्ज्वल नांदेड’ची वाटचाल सुरु झाली.
याच दरम्यान, विविध स्पर्धा परीक्षांसाठीच्या मुलाखतींचे कार्यक्रम जाहीर झाले. मुलाखतींसाठी पात्र उमेदवारांना आवाहन करण्यात आले, आणि त्यासाठी अभिरूप मुलाखतींचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. या अभिरूप मुलाखतींच्या उपक्रमात जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्थांसाठीच्या अधिव्याख्याता पदांसाठीच्या उमेदवारांसाठी पुण्यातील तज्ज्ञ मनोहर भोळे, उपविभागीय अधिकारी डॅा. अजित थोरबोले, नांदेडच्या डायटचे प्राचार्य डॅा. बी. टी. पुटवाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे आणि समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी या मुलाखती घेतल्या होत्या. या उपक्रमांचा लाभ घेतलेल्या 35 पैकी अकरा जणांची प्रत्यक्ष निवड झाली. त्यामध्ये श्रीमती करुणा आवरगंड यांनी तर राज्यात पहिला क्रमांक पटकाविला. आवरगंड यांच्यासह राजेश गोरे, लिंगूराम राजूरे, श्रीमती आशाताई लोहटे, राजाराम टकले, सिद्धेश्र्वर कांबळे, शिवाजी साखरे, श्रीमती सुधाताई मेश्राम, श्रीमती शितल शिंदे, चंद्रकांत धुमाळ आणि प्रकाश सिरले यांचाही समावेश होता.
या यशस्वी उमेदवारांचा आज जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी आपल्या निजीकक्षात बोलावून सत्कार केला. या सर्वांचे अभिनंदन करतानाच, पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. यावेळी सेतू समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूनील हुसे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, मीना सोलापूरे, आरती कोकूलवार आदींची उपस्थिती होती.

0000000

Thursday, February 9, 2017

* लेख क्र. 3

 हत्तीरोग उच्चाटनासाठी
सामुहिक औषधोपचार मोहीम

महाराष्ट्रात नांदेड, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा,  ठाणे, सोलापूर इत्यादी जिल्ह्यात हत्तीरोगाचे रुग्ण आजही आढळतात. या हत्तीरोगाचे सन 2020 पर्यंत उच्चाटन करण्याचे निर्धारीत करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी “एकदिवसीय सामुहिक औषधोपचार” मोहीम नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 10 ते मंगळवार 14 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे. याविषयी माहिती देणारा हा लेख...  

भारतात “हिवताप” खालोखाल “हत्तीरोग” ही सार्वजनिक आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. जगातील 110 कोटी लोकसंख्येचा भाग हत्तीरोगग्रस्त आहे. 80 देशातील 12 कोटी लोकांना याची लागण झाली आहे. त्यापैकी 1 / 3 रुग्ण भारतात आढळतात. भारतात हा रोग देशभर पसरलेला आहे. त्यातल्या त्यात केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, पं. बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहार राज्यातील काही भागात हत्तीरोग रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतो आहे. नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात 10, 11  व 12 फेब्रुवारी 2017 या तीन दिवसात, तर शहरी व मनपा निवडक भागात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान औषधोपचार मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण 34 लाख 82 हजार 628 लोकसंख्या पैकी 29 लाख 90 हजार 793 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकूण अपेक्षित लाभार्थी 27 लाख 81 हजार 437  आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. ही लोकसंख्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड शहरातील हडको, सिडको वाघाळा व तरोडा खु, व तरोडा बु. परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
बुचेरिया बॅक्रोपटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेंव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या (आजारी) व्यक्तीस चावते तेंव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतू रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरात या जंतुची 12 ते 14 दिवसात वाढ होऊन पुन: दुसऱ्या निरोगी व्यक्तीस जेंव्हा हा डास चावतो तेंव्हा हे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतू लसीका संस्थेत जातात तेथे त्यांची वाढ होते. नर व मादी वेगळे होतात. नंतर नर व मादी जंतूचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात त्यांना आपण मायक्रोफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीकावाहिनीत हे जंतू अडकून बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबंधीत व्यक्तीस विकृती येते त्यासच आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावण्यापासून ते हत्तीरोगाचे लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधिशयन काळ ) 12 ते 18 महिने आहे.
हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकागृंथी सुजतात. जांघेत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुद्धा वाजते. काही पुरुषामध्ये वृषणदाह होतो. हातपाय व बाह्य जननेंद्रिय सुजतात. रुग्णास अंडवृद्धी होते. या लक्षणामुळे रुग्ण सामाजिक उपेक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने सन 2020 पर्यंत उच्चाटण करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते.
जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी “एकदिवसीय सामुहिक औषधोपचार” एम.डी.ए. (मास ड्रेग ॲडमिनिट्रेशन) सर्वांना (ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरिया असोत किंवा नसोत, लक्षणे असोत किंवा नसतो) रोगाचा कायम प्रादुर्भाव असणाऱ्या भागात दिला जातो. फक्त 2 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रीयांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देवू नये.
या एम.डी.ए. ( एक दिवसीय सामुहिक औषधोपचार) मोहिम ही जवळ-जवळ 12 दिवसाच्या हत्तीरोगाच्या समुळ उपचारा इतकीच प्रभावी आहे. हत्तीरोग रुग्ण शोधणे फार कठीण काम आहे. हत्तीरोगाचे संपूर्ण सर्वेक्षण होत नाही. रोगीचे रक्त नमुने घेणे, तपासणे व रुग्णास 12 दिवस औषधोपचार करणे, शिवाय रुग्णांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. एकदम 10 ते 15 वर्षाला विकृती दिसून येते. म्हणून एम. डी. ए. या एकदिवसीय डी.ई.सी. अधिक ॲलबेनडॉझॅाल गोळ्याचा उपचार एक दिवसीय सतत पाच वर्षे केल्यास एकाच मात्रा ( डोस ) मुळे रुग्णाच्या शरीरात जर हत्तीरोगाचे जंतू असतील तर ते जंतू जवळ-जवळ 95 टक्के मरतात. यामुळे रोग फैलावत नाही. पर्यायाने हत्तीरोगाच्या प्रसारास आळा बसतो.
एक दिवसीय उपचार मोहिमेच्या गोळ्याचा डोस – वयोगट- 2 वर्षापेक्षा कमी ( डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- निरंक) ( ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ.- निरंक ), 2 ते 5 वर्षे (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 1 गोळी) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी), 6 ते 14 वर्षे (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 2 गोळ्या) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी), 15 वर्षावरील (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 3 गोळ्या) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी).
या मोहिमेबाबत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, ही मोहिम नांदेड जिल्ह्यात राबविण्यासाठी 1 हजार 833 टिम ( 2 कर्मचाऱ्यांची एक टिम) तयार करण्यात आली आहे. त्यावर 183 पर्यवेक्षक, 19 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व 11 जिल्हास्तरीय अधिकारी पाहणी करणार आहेत. मोहीम राबविण्यासाठी 75 लाख डि. ई. सी. गोळ्या व 30 लाख अलबेंडॉझॉल गोळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत पोहच करण्यात आल्या आहेत. तेंव्हा डी. ई. सी. , ॲलबेनडॉझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर व स्वयंसेवक ग्रामीण भागात 10, 11  व 12 फेब्रुवारी 2017 या तीन दिवसात, तर शहरी व मनपा निवडक भागात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान  येतील तेंव्हा या गोळ्या  उपाशी पोटी न घेता जेवन करुन घ्याव्यात. शासनाच्या या मोहिमेस नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास नक्कीच आपण हत्तीरोगापासून मुक्त होऊ.
-         संकलन
काशिनाथ र. आरेवार ,
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

0000000
कर्करोग दिन व पंधरवड्यानिमित्त
जिल्हा कारागृहात शिबीर संपन्न
नांदेड दि. 9 :-  कर्करोग दिन व पंधरवाडा 4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2017 या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आज श्री गुरुगोबिंद सिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय नांदेड व समता मेमोरिअल फाऊनडेशन  यांच्यावतीने जिल्हा कारागृह नांदेड येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम व सर्व रोगनिदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय डॉ. डी. एन. हजारी हे होते.  
डॉ. हजारी यांनी तंबाखू हे मानवी आरोग्यास कसा घातक आहे याबद्दल कैद्यांना सोप्या शब्दात माहिती दिली. दंत शल्याचिकित्सक  डॉ. रोशनी चव्हाण यांनी उपस्थित कैद्यांना तंबाखू सारख्या निकोटीनयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे कॅन्सरसह होणाऱ्या विविध आजाराची माहिती दिली.
यावेळी उपस्थित कैदी तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात 70  रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७.१ टक्के रुग्ण उच्चरक्तदाब व ७.१ टक्के मधुमेहाचे उपचार घेत असल्याची दिसून आली. तसेच ८ टक्के नवीन रुग्ण उच्चरक्तदाबासाठी निदान झाली. त्याचबरोबर ६१.४२ टक्के रुग्णांच्या त्वचेची व  १२.८५ टक्के रुग्णांची मुख आरोग्यासाठी तपासणी करण्यात आली.
शिबिरास डॉ. एच.आर साखरे, कारागृह अधीक्षक श्री. चव्हाण,  डॉ. रोशनी चव्हाण, डॉ. बोरसे डी. पी., सामुपदेशक सुवर्णकार सदाशिव, अधिपरिचारिका सारिका तथोडे व समता मेमोरिअल फाऊनडेसेन ऑफिसर शिवशंकर गव्हाणे उपस्थित होते.

0000000
हत्तीरोग उच्चाटनासाठी आजपासून
जिल्ह्यात सामुहिक औषधोपचार मोहीम
गृहभेटीत गोळ्या खाऊ घालण्यात येणार
नांदेड दि. 9 :- महाराष्ट्रात नागपूर, नांदेड, चंद्रपूर, ठाणे, भंडारा,  सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यात हत्तीरोगाचे रुग्ण आजही आढळतात. या हत्तीरोगाचे 2020 पर्यंत उच्चाटन करण्याचे निर्धारीत करण्यात आले आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी “एकदिवसीय सामुहिक औषधोपचार” मोहीम नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 10 ते मंगळवार 14 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात 10, 11  व 12 फेब्रुवारी 2017 या तीन दिवसात, तर शहरी व मनपा निवडक भागात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान औषधोपचार मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण 34 लाख 82 हजार 628 लोकसंख्या पैकी 29 लाख 90 हजार 793 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकूण अपेक्षित लाभार्थी 27 लाख 81 हजार 437  आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. ही लोकसंख्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड शहरातील हडको, सिडको वाघाळा व तरोडा खु, व तरोडा बु. परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
ही मोहिम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी 1 हजार 833 टिम (2 कर्मचाऱ्यांची एक टिम) तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर 183 पर्यवेक्षक, 19 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व 11 जिल्हास्तरीय अधिकारी पाहणी करणार आहेत. तेंव्हा डी. ई. सी. अधिक ॲलबेनडॉझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर व स्वयंसेवक वरील तारखांना येतील तेंव्हा या गोळ्या जेवन करुन ( उपाशी पोटी न घेता ) घेऊन या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी सर्वांना हातभार लावावा, असे आवाहन हिवताप अधिकारी डॅा. राजेंद्र पवार यांनी केले आहे.  

0000000

Wednesday, February 8, 2017

ई-पीओश मशिन्सद्वारे नांदेड जिल्ह्यात
धान्य वितरणाची कॅशलेस प्रणाली सुरू
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते गोपाळवाडी येथे प्रारंभ
नांदेड दि. 8 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण अंतर्गत सद्यस्थीतील ईपीडीएस अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील टप्पा ई-पीओएस मशिन्सद्वारे अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना आता यापुढे धान्य वितरीत होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील शंभर टक्के आधार सिडींग झालेल्या दोन दुकानांचा ई-पीओएस मशिन्सद्वारे धान्य वितरणास नुकताच जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते मुदखेड तालुक्यातील गोपाळवाडी येथे पार पडला. प्रायोगिक तत्वावरील ही प्रणाली पुढील काळात काळात सर्व दुकानांकरीता अंमलात आणली जाणार आहे.
 या प्रणालीअंतर्गत कॅशलेस व्यवहार करण्यासाठी आयडीएफसी बँकने मुदखेड शंभर टक्के आधार सिडींग पूर्ण केलेल्या गोपाळवाडी व मुदखेड येथील दोन दुकानदार यांचे पीओसी तसेच व्यवसाय प्रतिनिधींकरीता त्यांचेकडील मॅायक्रो एटीएमद्वारे आयडीएफसी बँकचे चालू बँक खाते सुरु केले आहे. यामुळे ई-पीडीएस म्हणजेच आधारद्वारे संलग्न वितरण व्यवस्थेंतर्गत आता स्वस्त धान्य दुकानदारांच्या पुढाकाराने महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यात ई-पीडीएस कॅशलेस तसेच एफपीएस व्यवसाय प्रतिनिधींची वाटचाल सुरु झाली. यावरुन हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये प्रथम यशस्वी करण्यात नांदेड जिल्ह्याने बाजी मारली आहे.
उपआयुक्त श्रीमती वर्षा ठाकूर यांनी या योजनेचा उद्देश तसेच डिजीटल तंत्रज्ञानाचा वापरामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक व सक्षम होणार आहे. याकरीता तुम्हा सर्वांचे सहकार्य असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण शासन लाभार्थ्यांकरीता तसेच त्यांचे हिताकरीता अधिक सुलभतेकडे व पारदर्शकतेकडे पावले उचलत असल्याचे सांगितले.
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी या योजनेचा हेतू गावकऱ्यांना पटवून दिला. तंत्रज्ञान ही काळाची गरज लक्षात घेता ईपीडीएस कॅशलेस तसेच एफपीएस बाबत जनसमुदायमध्ये जनजागृती होणे व या योजनेचा हेतू साध्य होणे हा आहे. याबाबत नांदेड जिल्हा सक्रीय झाला असून ही तंत्रज्ञानाची यशस्वी वाटचाल  नांदेड जिल्ह्याची सुरु झाल्याचे नमूद केले.
आयडीएफसी बँकचे स्टेट मॅनेजर सचिन पेटकर यांनी नवीन तंत्रज्ञानाचा किती फायदा आहे किती पारदर्शक हेतू आहे हे पटवून दिले. या मायक्रो एटीएमद्वारे आपण कोठेही 5 मिनीटांच्या आत आपले बँक खाते सुरु करू शकतो, तसेच रक्कम अन्य खात्यावर पाठवू शकतो, ठेव, तसेच ठेव-रक्कम काढून घेण्याची इत्यादी सुविधाही आता उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
0000000


तंबाखु सेवनाच्या सवयीपासून दूर
 राहण्याचा संकल्प करावा - डॉ. गुंटूरकर
नांदेड दि. 8 :- तंबाखुचे व्यसन ही एक वाईट सवय आहे. तंबाखुचे सेवन करणे हे स्वत:सह इतरांच्या आजारासाठीही खूप घातक आहे. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने तंबाखूसारख्या निकोटीनयुक्त पदार्थाचे सेवन करू नये. अशा वाईट सवयीपासून दूर राहण्याचा संकल्प करावा, असे आवाहन  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी केले.
कर्करोग दिन व पंधरवाडा 4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2017  या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आज श्री गुरुगोबिंदसिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयातील सर्जिकल हॉल येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गुंटूरकर हे बोलत होते.
डॉ. गुंटूरकर पुढे म्हणाले की , तंबाखू या निकोटीन युक्त पदार्थाचे सेवन हे कर्करोगाचे मुख्य कारण आहे. भारतात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे जवळपास दहा लक्ष व्यक्तीचा मृत्यु होतो. त्याचबरोबर नवीन पिढी मोठ्या प्रमाणात याच्या आहारी गेल्याचे दिसून येते असे सांगितले. त्यामुळे तंबाखुच्या कोणत्याही प्रकारच्या सेवनामुळे केवळ कर्करोग हा एकमेव आजार कारणीभूत  नाही. त्यापासून हृदयरोग, फुफुसाचे आजार, पोटाचे विकार अशा विविध आजार उद्भवण्याची  शक्यता असते.
कार्यक्रमास डॉ. डी. एन.हजारी, डॉ. सौ. लातूरकर डॉ.एच.के. साखरे डॉ.रोशनी चव्हाण (दंतशल्यचिकित्सक) डॉ.पवार, डॉ.बोरसे आदी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नर्सिंग स्कूल येथील विद्यार्थी सहभागी होते.

0000000

वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...