Friday, February 10, 2017

..ही तर उज्ज्वल नांदेड च्या वाटचालीतील
घवघवीत यशाची नांदी – जिल्हाधिकारी काकाणी
अधिव्याख्याता पदासाठी निवडलेल्या 11 जणांचा सत्कार संपन्न

नांदेड दि. 10 :- अधिव्याख्याता वर्ग-2 पदासाठी निवड झालेले अकरा उमेदवार म्हणजे उज्ज्वल नांदेडच्या वाटचालीतील घवघवीत यशाची नांदी, असल्याची भावना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे व्यक्त केली. उज्ज्वल नांदेड उपक्रमातील अभिरूप मुलाखतीद्वारे शिक्षण-प्रशिक्षण संस्था अधिव्याख्याता पदांसाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील अकरा उमेदवारांचा आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विशेष सत्कार केला.  हा क्षण या अकरा उमेदवारांच्या आणि त्यांच्या स्नेह्यांसाठी अवर्णनीय समाधानाचा होता. या निवडीत श्रीमती करूणा आवरगंड यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याचे विशेष कौतूकही होते.
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षातील एक उपक्रम म्हणून एप्रिल 2016 मध्ये दहा आठवड्यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान राबविण्यात आले. तीव्र उन्हाळा आणि टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी त्यावेळी विविध विभागांच्या समन्वयातून या उपक्रमाला सुरवात केली. यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड सेतू समिती आणि समितीची अभ्यासिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांचा सक्रीय सहभाग घेण्यात आला. यातूनच उज्ज्वल नांदेडची संकल्पना साकारली. या संकल्पनेत पुढे दोन महाविद्यालायांचाही सहभाग घेण्यात आला. त्यातूनच उज्ज्वल नांदेडची वाटचाल सुरु झाली.
याच दरम्यान, विविध स्पर्धा परीक्षांसाठीच्या मुलाखतींचे कार्यक्रम जाहीर झाले. मुलाखतींसाठी पात्र उमेदवारांना आवाहन करण्यात आले, आणि त्यासाठी अभिरूप मुलाखतींचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. या अभिरूप मुलाखतींच्या उपक्रमात जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्थांसाठीच्या अधिव्याख्याता पदांसाठीच्या उमेदवारांसाठी पुण्यातील तज्ज्ञ मनोहर भोळे, उपविभागीय अधिकारी डॅा. अजित थोरबोले, नांदेडच्या डायटचे प्राचार्य डॅा. बी. टी. पुटवाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे आणि समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी या मुलाखती घेतल्या होत्या. या उपक्रमांचा लाभ घेतलेल्या 35 पैकी अकरा जणांची प्रत्यक्ष निवड झाली. त्यामध्ये श्रीमती करुणा आवरगंड यांनी तर राज्यात पहिला क्रमांक पटकाविला. आवरगंड यांच्यासह राजेश गोरे, लिंगूराम राजूरे, श्रीमती आशाताई लोहटे, राजाराम टकले, सिद्धेश्र्वर कांबळे, शिवाजी साखरे, श्रीमती सुधाताई मेश्राम, श्रीमती शितल शिंदे, चंद्रकांत धुमाळ आणि प्रकाश सिरले यांचाही समावेश होता.
या यशस्वी उमेदवारांचा आज जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी आपल्या निजीकक्षात बोलावून सत्कार केला. या सर्वांचे अभिनंदन करतानाच, पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. यावेळी सेतू समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूनील हुसे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, मीना सोलापूरे, आरती कोकूलवार आदींची उपस्थिती होती.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...