वृत्त क्रमांक
चारा साक्षरता अभियानांतर्गत आज रामतीर्थ येथे निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक
• पशुपालकांनी या प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्याचे आवाहन
• चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चारा सकस करा
नांदेड(जिमाका), दि. 01 : जिल्ह्यातील अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करण्यासाठी ‘चारा साक्षरता अभियान’ राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत दि. 2 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी मौजे रामतीर्थ, ता. बिलोली येथे गुणवंत शिवाजीराव देगलूरे यांच्या पशुपालन प्रक्षेत्रावर ‘निकृष्ट चारा सकस करणे’ या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.
या प्रात्यक्षिकात सोयाबीन कुटार व हरभरा कुटारावर युरिया आणि मोलासेस (काकवी) प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत पशुपालकांना प्रत्यक्ष दाखविण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे उपलब्ध चाऱ्याची पौष्टिकता, पाचकता व रुचकरता वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
तसेच चाऱ्याचे योग्य संवर्धन, साठवणूक आणि व्यवस्थापन करून टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा पशुधनासाठी प्रभावी वापर करण्याच्या पद्धतींची माहिती देण्यात येणार आहे.
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पशुधनासाठी उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असल्याने पशुपालकांनी या प्रात्यक्षिकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
**

No comments:
Post a Comment