Monday, February 3, 2025

 वृत्त क्र. 141 

दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

 

नांदेड दि. 3 फेब्रुवारी :- समाज कल्याण विभाग व नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पोलीस मैदानावर आज दि.३ फेब्रुवारीला दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले.

 

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे हे होते.

 

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा समाज  कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती.

0000















 वृत्त क्र. 140

सन्मान योजनेंतर्गत साहित्यिक, कलाकारांच्या 11 वारसांसाठी अनुदान मंजूर

* जिल्हा प्रशासनाने मानले लाभार्थ्यांनी आभार 

नांदेड दि. 3 फेब्रुवारी :- राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत जिल्हयातील 11 मयत लाभार्थ्यांच्या वारसास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकतेच अनुदान मंजुर केले आहे. ही योजना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांचा शासन निर्णय 16 मार्च 2024 अन्वये राबविण्यात येत आहे. ही योजना गरजू व होतकरु तळागाळातील साहित्यिक, कलावंत यांच्यापर्यंत प्रशासनाने पोहचविल्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेअंतर्गत जिल्हा निवड समितीची पूनर्रचना करण्यात आली आहे. या योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सदस्य सचिव उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) श्रीमती मंजुषा जाधव (कापसे) या सर्वांचे जिल्ह्यातील राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांकडुन व त्यांच्या विविध संघटनेकडुन आभार व्यक्त करण्यात आले आहे.

000

वृत्त क्र. 139

 

जागतिक सूर्यनमस्कार दिनरथसप्तमी निमित्त

सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेड दि. 3 फेब्रुवारी :- जिल्हयातील योगसंघटना, योग शिक्षक, योग मित्रमंडळ, योग विद्याधाम, योग परिषद, पतंजली योग समिती, योग ॲण्ड स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र योग शिक्षक संघ असोसिएशन आदींच्या सहकार्याने जागतिक सुर्यनमस्कार (रथसप्तमी) कार्यक्रम 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वा. यशवंत महाविद्यालय मैदान नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. नांदेड जिल्हा प्रशासन नांदेड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व क्रीडा भारती यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त यांच्या मान्यतेने नांदेड जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सुदृढतेचा मुलमंत्र नागरीक विद्यार्थी युवा यांच्यामध्ये बिंबवण्यासाठी सातत्याने शासन स्वयंसेवी संस्था तसेच या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबवित आहेत.

 

क्रीडा भारती महाराष्ट्र प्रदेश यांनी 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवा दिन) ते 4 फेब्रुवारी जागतिक सूर्यनमस्कार (रथसप्तमी) या कालावधीत सुर्यनमस्कार- योगप्रशिक्षण वर्ग, सुर्यनमस्कार स्पर्धा, योगासन स्पर्धा आणि विविध स्तरीय स्पर्धाचे आयोजन शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे इत्यादीना सदर दिनाच्यानिमीत्ताने कार्यक्रम क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

 

तसेच शहरातील महात्मा फुले हायस्कुल, बाबानगर,नांदेड, सावित्रीबाई फुले विद्यालय,बाबानगर, नांदेड, महात्मा फुले विद्यालय, विजयनगर, नांदेड, राजर्षी शाहू विद्यालय, वसंतनगर, नांदेड, नरहर कुरुंदकर हायस्कूल, कौठा, नांदेड, माधवराव वटेमोड विद्यालय नांदेड, शाकुंतल हायस्कुल नांदेड, पिनॅकल इं. मेडीयम स्कुल नांदेड व नांदेड जिल्हयातील सर्व शाळा/ क. महाविद्यालयात क्रीडा भारती यांच्या सहकार्याने 4 फेब्रुवारी रोजी वेळ सकाळी 7.30 वा. जागतिक सूर्यनमस्कार दिन रथसप्तमी निमित्त आपआपल्या ठिकाणी क्रीडा भारती यांच्या सहकार्याने मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी योग संघटना, योग शिक्षक, योग मित्र मंडळ, योग विद्याधाम, योग परिषद, पतंजली योग समिती, योग ॲण्ड स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र योग शिक्षक संघ असोसिएशन आदींच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात आयोजन करुन कार्यक्रमांचा फोटोसह अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व क्रीडा भारतीचे ई-मेल आयडी dsonanded@rediffmail.com, udaylakahalekar@rediffmail.com यावर पाठविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

000000

Sunday, February 2, 2025

 विशेष वृत्त क्र. 138 

महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख

श्रद्धास्थळांचा विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·    हदगाव येथील पुरातन श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळा

 

हदगाव (नांदेड) दि. 2 फेबुवारी : पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रध्दास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे, उर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 

नांदेड जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव येथील श्री. गुरुवर्य बापूनगर परिसरातील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व व कलशारोहण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते. मराठवाडा,विदर्भ व महाराष्ट्रातील ठीक ठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते.

 

वैराग्यमूर्ती मठाधिपती महंत श्री. योगी बापू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर माहूर पिठाधीश कवीश्वराचार्य माहुरकर बाबा यांच्यासह परिसरातील मठाधिपती धर्मपीठावर विराजमान होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या या मठाधिपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महानुभाव पंथीयांसाठी केलेल्या कार्यकर्तृत्वाला लक्षात घेऊन स्तुती सुमनांनी साकारलेले सन्मानपत्र बहाल केले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम चक्रधर स्वामीना दंडवत घातला. त्यानंतर धर्मपीठावरून बोलताना सर्वज्ञ चक्रधर स्वामी व त्यांच्या अनुयायांनी अतिशय विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचे कार्य केल्याचे स्मरण केले. महानुभव पंथीयांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांनी गौरव केला.परकीय आक्रमणामुळे कृष्णदेवाची पुजा करून घेणे, हिंदू म्हणवून घेणे कठीण होते. त्या काळात चक्रधर स्वामीनी जातीपाती, पंथाचा विचार न करता महानुभव दाखवला, समरसता व समता युक्त समाज त्याकाळी देशात निर्माण केला.

 

महाराष्ट्र शासनाने राज्यभरात आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी महानुभाव पंथीयांचे मंदिर आहेत. त्या मंदिरांचा विकास करण्याचे काम केल्याचे सांगितले. रिद्धपुरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंद प्रभू देवस्थान या अनेक ठिकाणी संवर्धनाचे काम सुरु आहे. याही पुढे हे कार्य सुरू राहील, असे आश्वस्थ केले. तसेच या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून येथील विकास कामे केली जातील. चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभे राहील, असे सांगितले.

 

यावेळी त्यांनी महानुभावपंथीयांच्या ग्रंथ प्रेमाची, धर्म साहित्य निर्मितीच्या चिकाटीचे  कौतुक केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, राजमान्यता मिळाली. यामध्ये महानुभाव साहित्याचा मोठा वाटा आहे. आपण जे पुरावे दिले आणि जे स्वीकारले गेले.यातील एक महत्वाचा पुरावा लीळाचरित्र होते.

 

मराठी भाषा किती प्राचीन याचा पुरावा यानिमित्ताने देता आला.लीळाचरित्र ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला, त्या रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठाचा विकास पुढील टप्यात करण्यात येणार आहे. महानुभाव पंथाच्या माध्यमातून मराठी भाषा विद्यापीठाचा उपयोग करून आपले साहित्य ,विचार,अध्यात्म जगभरामध्ये पोहोचवण्याचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

देशाच्या कानाकोप-यात नाही तर अफगाणिस्तानपर्यंत महानुभव पंथ पोहोचला आहे .आज इतका मोठा संप्रदाय आपल्याला समतेच्या अधिष्ठानावर काम करतांना दिसतो. आज या धर्मपीठावर या स्थानावर इतकी मोठी महंत मंडळी येऊन गेली. ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे, असे त्यांनी धर्मपीठावरील सर्व मान्यवरांना अभिवादन करताना स्पष्ट केले.

  

तत्पूर्वी, त्यांनी आगमन झाल्यानंतर  जीर्णोद्धार करण्यात आलेल्या उखळाई माय मंदिरात जाऊन मायचे विडाअवसर ( दर्शन घेतले ) केले. आजच या ठिकाणी संत महात्म्यांच्या उपस्थितीत कलशारोहण झाले. हे मंदिर पाचशे वर्षापूर्वीचे असल्याची मान्यता आहे. यावेळी त्यांनी श्रीकृष्ण मूर्तीचे भक्तार्पण केले.

 

कार्यक्रमाचे आयोजक वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचा त्यांनी सत्कार केला. भक्तांना प्रातिनिधिक सेवा पुरस्कार बहाल केला. या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे हरीद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ.हेमंत पाटील, हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर,आ. भीमराव केराम, आ. आनंद पाटील बोंढारकर, आ.बाबुराव कदम कोहळीकर,आ. बालाजी कल्याणकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार सुरेखा नांदे, आदीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या महानुभव पंथाचे पिठाधीशांसह मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक योगीबापु विद्वांस यांनी केले तर आभार संदिपराज दादा कपाटे यांनी मानले. यावेळी अविनाश ठाकरे व कारंजेकर बाबा यांनी मनोगत व्यक्त केले.

 

महाराष्ट्रातील उपस्थित पीठाधीश

अ.भा.म.प.अध्यक्ष प.म.श्री विद्वांसबाबा, माहूर पिठाधीश आचार्य श्री माहूरकरबाबा, उपाध्य कुळाचार्य वर्धनस्थबाबा, प.म.श्री. रिधपुरकर बाबाजी, पारिमांडाल्य कुळाचार्य लासुरकर बाबाजी, कविश्वर कुळाचार्य करंजेकर बाबाजी,  प.म.श्री मठाधीपती महंत योगीबापु, श्रीगुरु दत्ताबापु, गोपीराजबाबा, कान्हेराज बाबा विद्वांस,पुणंताबेकर महानुभाव, परसराज बाबा विद्वांस, संदीपराज शास्त्री कपाटे, अर्जुनराज दादा नांदेडकर, रमेशराज शास्त्री कपाटे, महंतबाबा वाघोदेकर, बाळकृष्णदादा सरळ, भाईदेवमुनी नांदेडकर, मधुकरदादा धाराशिवकर,विजयराजदादा कारंजेकर आदीसह अन्य पिठाधीशांची उपस्थिती होती.

00000













हदगाव येथील श्रीकृष्ण उखळाई माय या कलशारोहण झालेल्या मंदिरात उखळाईमायचे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. येथे विडाअवसर केले. श्रीकृष्णमूर्तीचे अनावरण झाले. महानुभपंथीयांची 500 वर्षाची मान्यता असलेले हे पीठ आहे.










केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...