Saturday, February 10, 2024

 वृत्त क्रमांक 121

 

महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

 

·         महासंस्कृती महोत्सवात विविध कार्यक्रमाचे होणार आयोजन 

·         महोत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- महासंस्कृती महोत्सवाचे आयोजनदिनांक 15 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत नांदेड येथे करण्यात येत आहे. महोत्सवाच्या सुयोग्य आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत नेमण्यात आलेल्या सर्व सदस्यांनी सुक्ष्म नियोजनावर भर देवून आपली जबाबदारी पार पाडावी असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्देश दिले.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती आदी बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला अधिकाधिक लोकाभिमूख करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आज पुर्वतयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, प्रकल्प संचालक संजय तुबाकले, महिला बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, मीना सोलापूरे व विविध विभागाचे अधिकारी व समिती सदस्य आदींची उपस्थिती होती.

 

या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिक, कलाकार, मान्यवर, महिला यांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने नियोजन करावे. तसेच महोत्सवात प्रदर्शनीय दालने यामध्ये विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या माहितीचे, स्थानिक खाद्य पदार्थ, तृणधान्याचे पदार्थ, बचत गटामार्फत बनविण्यात आलेल्या पदार्थाचे प्रदर्शन व विक्री याबाबीचे स्टॉल लावण्यावर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

 

तसेच या महोत्सवात 15 व 16 फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे विविध मैदानी खेळाचे आयोजन क्रिडा विभागामार्फत करण्यात आले आहे. दिनांक 18 व 19 रोजी शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धाचे आयोजन आयटीआय नांदेड येथे तर 19 फेब्रुवारी रोजी नंदगिरी किल्ला येथे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत या महोत्सवात लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, आदिवासी समुहाचे पारंपारिक नृत्य या सर्व कलाप्रकाराचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. नागरिकांनी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येन सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. या बैठकीचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले.

0000




 वृत्त क्रमांक 120

 

ह्रदय रोगाशी संबंधित आजार असलेल्या

128 बालकांची टुडी ईको तपासणी

 

·   ह्रदय शस्त्रक्रियेसाठी गरजेनुसार पात्र 27 बालकांवर लवकरच मुंबई येथे उपचार  

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरात हृदयाचे आजार असलेल्या बालकांची 2 डी इको तपासणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय नांदेड येथे नुकतीच करण्यात आली. या शिबिरात नांदेड जिल्ह्यातील एकूण 128 बालकांची तपासणी करण्यात आली असून बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत ह्रदय शस्त्रक्रियेसाठी गरजेनुसार पात्र एकूण 27 बालकांना लवकरच संदर्भित करून उपचार केले जाणार आहेत.

 

या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. हे शिबीर बालाजी हॉस्पिटल मुंबई येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण आणि रुग्णालयाचे डॉ. प्रतिक मिश्रा ह्या विशेषज्ञांच्या उपस्थितीत पार पडले.

 

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून 2 वेळा अंगणवाडीतील व 1 वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शुन्य ते 18 या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात.

 

हृदयरोग तपासणी, नेत्ररोग, आकडी/फेफरे यांची मोठ्याप्रमावर शिबिरे आयोजित करून निदान व औषधोपचार करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींना या कार्यक्रमांचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो.

 

तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत शुन्य ते 6 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळल्यास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे. या शिबिरासाठी RBSK जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, DEIC चे व्यवस्थापक विठ्ठल तावडे,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0000000




Friday, February 9, 2024

 वृत्त क्रमांक 119 

नांदेड रेल्वेस्थानक परिसरात 22 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- नांदेड शहरातील रेल्वेस्थानक परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 9 फेब्रुवारी रोजी रेल्वे स्थानक परिसरात अचानक धाडी टाकून 22 तंबाखू विक्रेत्यांकडून 10 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, सहायक सुनिल तोटेवाड वाहनचालक गौरव येवले, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय समन्वयक मंगेश गायकवाड तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. बी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. प्रदिप खानसोळे व पो.कॉ. प्रदिप कांबळे उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 118

 

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत अर्जाची नोंदणी

महाडिबीटी प्रणालीद्वारे 15 फेब्रुवारी पर्यंत करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना चालू शैक्षणिक वर्षात सन 2023-24 पासून महाडिबीटी https://Prematric.mahait.org/Login/Login प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुला-मुलींसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकांनी 15 फेब्रुवारीपर्यंत महाडिबीटी प्रणालीमध्ये नोंदणी करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार यांनी केले आहे.

 

या योजनेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यत शिष्यवृत्ती, इयत्ता नववी व दहावी शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा फी या योजनांचा समावेश आहे.  

00000

वृत्त क्र. 117

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

थेट कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 9 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादिगा या समाजातील दारिद्र रेषेखालील महिला, पुरुष घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एनएसएफडीसी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कर्ज प्रस्तावासाठी महामंडळामार्फत वेबसाईट प्रणाली विकसित केली आहे. तरी मातंग समाजातील गरजु लाभार्थ्यांनी या “https://beta.slasdc.org” संकेतस्थळावर अर्ज भरावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापक टि.आर. शिंदे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत सुविधा कर्ज योजना 5 लाख रुपये, लघुऋण वित्त योजना 1 लाख 40 हजार रुपये, महिला समृध्दी योजना 1 लाख 40 हजार रुपये, शैक्षणिक कर्ज योजना देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 30 लाख रुपये व परदेशातील अभ्यासक्रमासाठी 40 लाख रुपयापर्यतचे कर्ज प्रस्ताव सादर करता येतील. लाभार्थ्यांनी आपले कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या संकेतस्थळ (Portal) वर ऑनलाईन पध्दतीने जिल्हा कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. महामंडळाचे संकेतस्थळ 5 मार्च 2024 रोजी बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक टि.आर.शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथील कार्यालयात येऊन संपर्क साधावा, असेही महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
0000

वृत्त क्रमांक 116

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यात 22 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 22 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 डीप क्लिन मोहिम- संपूर्ण स्वच्छतेचा ध्यास

स्वच्छता हा घटक आपल्या निरोगी जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. गेल्या काही महिन्यात मुंबईतील प्रदुषणाने धुळ, धूर यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देश, विदेश तसेच जगभरातून पर्यटक, विविध देशांचे उच्चपदस्थ येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई करण्यासाठी ‘डिप क्लिन ड्राईव्ह’ मोहीम सुरू केली आहे. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये देशात स्वच्छता मोहीम सुरू केली. आम्हीही त्यांच्या पावलांवर पाऊलं ठेवत या मोहिमेचा शुभारंभ केला. ही चळवळ फक्त शासनाची नाही तर सर्व नागरिकांची झाली आहे.

यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात महाराष्ट्राने उज्वल कामगिरी केली असून स्वच्छता अभियानाचा पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते महाराष्ट्राला नुकताच मिळाला. महाराष्ट्राच्या यशाचा हा आलेख असाच चढता राहण्यासाठी आणि स्वच्छतेच्या गुणवत्ता यादीत राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा सहभाग वाढावा, यासाठी ही मोहिम एक बुस्टर ठरणार आहे, हे लक्षात घेऊन थेट लोकांमध्ये जाऊन मोहिमेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला.

मुंबईकरांचा श्वास कोंडला जात असतांना शासन म्हणून सर्वसामान्यांची यातून सुटका करण्यासाठी आम्ही तातडीने पाऊले उचलली. मुंबईतील प्रत्येक रस्ता, नाले यांच्यातील कचरा स्वच्छ व्हावा, सोबतच वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक गल्लीतील रस्ता धुवून काढण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या. संपूर्ण मुंबईला स्वच्छ सुंदर करणाऱ्या या मोहिमेला दुहेरी यश मिळाले. यामुळे मुंबईतील प्रदुषणाची पातळी खाली आली. सोबतच मुंबईकरांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होऊन त्यांचा परिसर स्वच्छतेते सहभाग देखील वाढला. मोहिमेच्या यशाबद्दल सांगतांना याचे खरे हिरो स्वच्छता कर्मचारी आहेत, हे देखील नमूद करावे लागेल. त्यांच्या दिवस-रात्र सुरु असलेल्या कामांमुळेच हे अभियान मुंबईत यशस्‍वी होऊ शकले आहे.

संपूर्ण स्वच्छता मोहीमेचे हे यश लक्षात घेऊन टप्प्या टप्प्याने संपूर्ण राज्यात या मोहिमेचा विस्तार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात एका भव्‍य दिव्य सोहळ्यात या राज्यस्तरीय मोहिमेचे उद्घाटन देखील पार पडले. या मोहीमेच्या माध्यमातून लवकरच राज्य स्वच्छ, सुंदर व हरित होण्यास मदत होणार आहे. मोहिमेच्या दरम्यान 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. या मंगल सोहळ्याचे निमित्त साधून देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन प्रधानमंत्री महोदयांनी केले होते. या आवाहनाला संपूर्ण स्वच्छता मोहीमेच्या माध्यमातून राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

स्वच्छता मोहिमेअंतर्गत केवळ कचरा उचलणे, रस्ते स्वच्छ करणे एवढाच विचार न करता प्रदूषण कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरीत पट्टे तयार करणे, जेणेकरुन ऑक्सिजन पार्क तयार होतील, यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. तसेच  मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करुन शहरात जंगले (Urban forest) तयार करण्यात येत आहेत. विविध ठिकाणी ग्रीन पॅच तयार करुन तो परिसर हिरवागार करणे. चौक, भिंतीचे सुशोभिकरण करणे ही कामे सुद्धा पुढच्या टप्प्यात करण्यात येत आहेत.

संपूर्ण स्वच्छता मोहिमेतून सर्व शहरे स्वच्छ होत आहेत. राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी सुद्धा कायमस्वरुपी योजना राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

स्वच्छतेसोबतच नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे याकरिता शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम आपण राबविणार आहोत. या उपक्रमात  मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक घरा घरात भेट देऊन आरोग्य आपल्या दारी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य  तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

स्वच्छता हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे.  स्वच्छतेचा हा मूलमंत्र राज्यातील प्रत्येक गावात, घरा-घरात पोहोचला पाहिजे यासाठी या स्वच्छ्ता मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात स्वच्छतेची गुढी उभारायला हवी. आपल्या या प्रयत्नातूनच स्वच्छता अभियानात देशात अग्रेसर असलेला आपला महाराष्ट्र आपला हा बहूमान टिकवू शकणार आहे. चला तर मग आपण सर्व स्वच्छ, महाराष्ट्र आणि सुंदर महाराष्ट्रासाठीच्या प्रयत्नात सहभागी होऊया !

0000

वृत्त   निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...