Saturday, February 10, 2024

 वृत्त क्रमांक 120

 

ह्रदय रोगाशी संबंधित आजार असलेल्या

128 बालकांची टुडी ईको तपासणी

 

·   ह्रदय शस्त्रक्रियेसाठी गरजेनुसार पात्र 27 बालकांवर लवकरच मुंबई येथे उपचार  

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरात हृदयाचे आजार असलेल्या बालकांची डी इको तपासणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय नांदेड येथे नुकतीच करण्यात आली. या शिबिरात नांदेड जिल्ह्यातील एकूण 128 बालकांची तपासणी करण्यात आली असून बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत ह्रदय शस्त्रक्रियेसाठी गरजेनुसार पात्र एकूण 27 बालकांना लवकरच संदर्भित करून उपचार केले जाणार आहेत.

 

या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. हे शिबीर बालाजी हॉस्पिटल मुंबई येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण आणि रुग्णालयाचे डॉ. प्रतिक मिश्रा ह्या विशेषज्ञांच्या उपस्थितीत पार पडले.

 

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून 2 वेळा अंगणवाडीतील व 1 वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शुन्य ते 18 या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात.

 

हृदयरोग तपासणी, नेत्ररोग, आकडी/फेफरे यांची मोठ्याप्रमावर शिबिरे आयोजित करून निदान व औषधोपचार करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींना या कार्यक्रमांचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो.

 

तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत शुन्य ते 6 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळल्यास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहेया शिबिरासाठी RBSK जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, DEIC चे व्यवस्थापक विठ्ठल तावडे,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0000000




No comments:

Post a Comment

नांदेड जिल्ह्यात आज मतमोजणी लोकसभेसाठी 19 व विधानसभेच्या 165 उमेदवारांचे भविष्य ठरणार * प्रशासन सज्ज, विद्यापीठाच्या ज्ञानार्जन केंद्रात मतम...