Friday, December 6, 2019

दिव्यांग व्युक्तींना मोफत उपकरणे
देण्यासाठी शिबीराचे मंगळवारी आयोजन
नांदेड दि. 6 :- नांदेड तालुक्यात आर्थिक दृष्टया दुर्बल दिव्यांग व वयोश्री योजनेतील जेष्ठ व्यक्तींना मोफत आवश्यक सहायक उपकरणे उपलब्ध करुन देण्यासाठी तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन मंगळवारी 10 डिसेंबर 2019 रोजी श्री विद्याविकास पब्लिक स्कुल टिळकनगर कॉर्नर भाग्यनगर नांदेड येथे करण्यात आले आहे.
 लाभार्थ्यांनी आधार कार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, राशनकार्ड, जन्म तारखेचा पुरावा आदी प्रमाणपत्रे घेवून यावे, असे आवाहन नांदेड उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांनी केले आहे.  
याबाबत नांदेड तहसिल कार्यालय येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. बैठकीस उपआयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगर पालि‍का नांदेड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड, गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदेड, बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड, समाज कल्याण अधिकारी जि.प.नांदेड, तालुका आरोग्य अधिकारी नांदेड यांचे प्रतिनिधी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड हे उपस्थित होते. या शिबीराच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना बाबत उपविभागीय अधिकारी नांदेड व तहसीलदार नांदेड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या शिबीरास आर्थिक दृष्टया दुर्बल दिव्यांग व वयोश्री योजनेतील जेष्ठ व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने मंगळवार 10 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 9 वा. श्री विद्याविकास पब्लिक स्कुकल टिळकनगर कॉर्नर भाग्य‍नगर नांदेड येथे उपस्थित राहून शिबीराचा लाभ घ्यावा. ओळखीचे, परिसरातील दिव्यांग व वयोश्री व्यक्तींना या शिबीराबाबत माहिती करुन दयावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
000000

केंद्र शासन वयोश्री योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांचा
भव्य मोजमाप शिबीराच्या पूर्वनोंदणीस प्रतिसाद
            नांदेड दि. 6 :- केंद्र शासनाच्या वायोश्री व एडीआयपी (ADIP) योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 ते 26 डिसेंबर 2019 या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगांना  सहाय्यभूत साधने व कृत्रिम अवयव वितरण करण्यासाठी मोजमाप शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले असून या शिबिरासाठीच्या नोंदणीस प्रतिसाद मिळत आहे.
वाढत्या वयोमानानुसार जेष्ठ नागरिकांनाही कर्णदोष, दृष्टीदोष, अस्थिव्यंगत्व, दातांच्या व्याधी आदींचा त्रास होतो, यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत जेष्ठ नागरिकांना मोफत व्हीलचेअर, श्रवणयंत्रे, चष्मे, दातांची कवळी आदी त्यांना आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे मोफत देण्यात येणार आहेत यासाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा बि.पी.एल. कार्ड सादर करणे आवश्यक आहे.
तसेच एखादे अवयव नसेल तर दिव्यांगांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते याचे गांभीर्य केवळ दिव्यांगांनाच माहित असते. लहान सहान गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येते अशा दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांच्या बळावर स्वावलंबनाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न दिव्यांग दिनाचे औचीत्य साधत एडीआयपी (ADIP) व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे. ज्यामुळे जिल्यातील दिव्यांगांमध्ये जीवनाचा आत्मविश्वास वाढून, त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी याद्वारे निर्माण होणार आहे.
अस्थिव्यंगांसाठी 3 चाकी सायकल, कुबडी, रोलेटर, व्हीलचेअर, सर्व प्रकारच्या काठ्या, सीपीचेअर देण्यात येणार आहे तर मोटराइज ट्रायसायकल साठी 80  टक्के दिव्यांगत्व असलेले प्रमाणपत्र व 12  हजार रुपये स्थानिक सहभाग गरजेचा आहे. अंध प्रवर्गासाठी 75 टक्क्यावरील दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणाऱ्याना स्मार्ट केन, ब्रेल कीट, डेसी प्लेअर, स्मार्ट फोन. मतिमंद प्रवर्गासाठी व्हीलचेअर, एम आर कीट, सी. पी. चेअर तर कर्णबधीर प्रवर्गासाठी श्रवणयंत्राचे वितरण करण्यात येणार असून 10 ते 26 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दिव्यांग लाभार्थ्यासाठी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 जिल्यातील तालुका स्तरावर, नांदेड येथे 10 डिसेंबर, अर्धापूर 11, मुदखेड 12, भोकर 13, हदगाव 14, किनवट 15 व 16, माहूर 17, हिमायतनगर 18, लोहा 19, कंधार 20, नायगाव 21, मुखेड 22, देगलूर 23, बिलोली 24 धर्माबाद 25 तर उमरी येथे 26 डिसेंबर रोजी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वनोंदणी साठी त्या-त्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जेष्ठ नागरिकांनी व  दिव्यांगांनी दिव्यंगत्व प्रमाणपत्र, चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्डच्या झेरॉक्स व दोन फोटोसह संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरांसाठी संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात नोंदणी करण्यात येत असून यासाठी अनेक पात्र लाभधारकांनी नोंदणी केली आहे. आत्तापर्यंत नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने परिश्रम घेण्यात येत आहे.

Thursday, December 5, 2019


शस्त्र परवाना नुतनीकरणाचे आवाहन
नांदेड दि. 5 :- नांदेड जिल्‍हयातील शस्‍त्र परवाना धारकांना सुचित करण्‍यात येते की, जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय, नांदेड यांचे मार्फत निर्गमीत/अभिलेखात नोंद असलेले शस्‍त्र परवाने, ज्‍याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी संपुष्‍टात येत आहे. अशा शस्‍त्र परवानाधारकांनी त्‍यांचा शस्‍त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्‍यावा.
परवानाधारकाने 6 डिसेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत आपला शस्‍त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्‍यासाठी नुतनीकरण शुल्‍क (चलनाने) शासन जमा करावे. आपले शस्‍त्र परवान्‍यातील असलेले अग्निशस्‍त्राची पडताळणी या कार्यालयात करुन, विहित नमुन्‍यातील अर्ज, जन्‍म तारखेचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्‍त्र परवाना सेतू समिती, जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दाखल करावा. याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


अनधिकृत स्कूल बसमधून शालेय  
विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास मनाई
नांदेड दि. 5 :- शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करण्यास मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका क्र.97/2016 मध्ये 25 नोव्हेंबर 2019 रोजी अनधिकृत स्कूल बसबाबत आदेश पारित केले आहेत. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक अनधिकृत ऑटोरिक्षा, स्कूल व्हॅन व बसेस मधून करण्यास मनाई करण्यात आली आहे.   
या आदेशानुसार विहीत परवान्याशिवाय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांविरुध्द वाहतूक पोलीस व परिवहन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने 25 नोव्हेंबर 2019  ते 10 डिसेंबर 2019 या कालावधीत या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अनधिकृत स्कूल बस, व्हॅन, ऑटोरिक्षा व इतर वाहनांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या अनधिकृत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
यासोबतच मा. उच्च न्यायालयाने ऑटोरिक्षामधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणे धोकादायक असल्याने पालक त्यांच्या पाल्यांना ऑटोरिक्षामधून प्रवास करण्यास मनाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याबरोबर समाजसेवक तसेच सेवाभावी व्यक्ती यांनी राज्य शासनास सुरक्षा विषयक तरतूदी असलेल्या बसेस, वाहने माफक दरात विद्यार्थ्यी वाहतूक करण्यास सहकार्य करावे अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच शाळांना एनजीओ व समाजसेवी व्यक्ती यांच्याकडून याबाबतीत सहकार्य घेण्यास कळविले आहे. जिल्हयातील सर्व स्कूल बस, व्हॅन व ऑटोरिक्षा बस चालक, मालक तसेच सर्व शाळा व पालक वर्गांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
000000


कृषि विभागाच्यावतीने जागतिक मृदा दिन साजरा
नांदेड दि. 5 :- कृषि विभागाच्यावतीने जागतिक मृदा दिन आज साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार मोहनराव हंबर्डे, तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्या श्रीमती पुनमताई पवार हे होते.
प्रमुख मार्गदर्शक कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे प्राचार्य डॉ. एस. डी. मोरे, शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव, नांदेड तालुका कृषि अधिकारी विनायक सरदेशपांडे, मुदखेड तालुका कृषि अधिकारी श्री शर्मा, अर्धापूर तालुका कृषि अधिकारी श्री. शिंगाडे, कृषि अधिकारी श्री सानप, कृषि पर्यवेक्ष एम. जी. चामे हे उपस्थित होते.
यावेळी आमदार मोहनराव हंबर्डे, जि.प. सदस्या  श्रीमती पुनमताई पवार व तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चलवदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकाचे वितरण करण्यात आले. तसेच सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कृषि शास्त्रज्ञ एस.डी.मोरे व देविकांत देशमुख यांनी मातीचे आरोग्य व विश्लेषणबाबत मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रगतशिल शेतकरी भगवान इंगोले, संजय घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी श्रीमती गुंजकर ए. एस. यांनी तर सुत्रसंचालन वसंत जारीकोटे यांनी केले. शेवटी आभार कृषि पर्यवेक्षक एम. जी. चामे एम.जी.  यांनी मानले.
000000


अनुसूचित जातींच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना
90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची योजनेतील
अर्जाच्या त्रुटीची पुर्तता करण्यास 12 डिसेंबरची मुदतवाढ
            नांदेड दि. 5 :- अनुसूचित जातींच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टर योजनेत अर्जातील कागपत्रांच्या त्रुटींची पूर्तता संपूर्ण कागदपत्रांसह गुरुवार 12 डिसेंबर 2019 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड येथे संबंधीत शाखेत सादर करावीत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. शासन निर्णय 8 मार्च 2017 नुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सन 2018-19 या वर्षात ज्या बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्या सर्व अर्जांची तपासणी केली असता अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे.
सर्व त्रुटींची पूर्तता करण्यासाठी यापूर्वीच वेळ देण्यात आली होती परंतु अद्यापपर्यंत त्रुटींची पूर्तता झालेली नाही म्हणून पुनश्च सर्व बचत गटांना शेवटची संधी देण्यात येत आहे. या त्रुटींची पूर्तता 4 डिसेंबर 2019 ते 12 डिसेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत करुन घ्यावी. अन्यथा आपला अर्ज अपात्र ठरवून ईश्वर चिट्ठीने निवड प्रक्रियेत आपल्या बचत गटाचा सहभाग नसेल तसेच आपला कुठलाही दावा मान्य करण्यात येणार नाही, असेही आवाहन केले आहे.
00000



जन आरोग्य योजना ठरतेय नवं संजीवनी
नांदेड दि. 5 :- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने विषयी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संलग्नीकृत रुग्णालयांची बैठक आज संपन्न झाली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक प्रतिनिधी डॉ. साखरे, जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना डॉ. दिपेशकुमार शर्मा, सर्व संलग्नीकृत रुग्णालय प्रशासन, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना 2 जुलै 2012 पासून सुरु झालेली आहे. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी पासून कार्यान्वित असून या योजनेंतर्गत 23 सप्टेंबर 2018 पासून आजपर्यंत 20 हजार 528 शस्त्रक्रिया व औषधोपचारांचा लाभ लाभार्थ्यांना भेटलेला आहे.
 नांदेड जिल्ह्यातील 12 रुग्णालये या योजनेअंतर्गत संलग्नीकृत असून या अंतर्गत डायलेसिससाठी 5 हजार 930, कॅन्सरसाठी 4 हजार 323, अपघातग्रस्त रुग्ण 3 हजार 553, हृदयरोगसाठी 2 हजार 639, अश्या विविध 30 प्रकारच्या स्पेशालिटी अंतर्गत रुग्णांनी लाभ घेतलेला असून या औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी 42 कोटी 99 लाख 72 हजार 942 रुपये विम्याच्या रक्कमेतून अदा करण्यात आली आहे. ही योजना गरीब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबांना उपचारासाठी राबविण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत 971 व आयुष्यमान योजनेंतर्गत 1 हजार 300 या वेगवेगळ्या 1 हजार 300 दुर्धर आजारावर औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या जात आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यां जवळ केसरी, पिवळे, अन्नपूर्णा, अंत्योदय तसेच शेतकरी कुटुंबांसाठी पांढरी शिधापत्रिका व आयुष्यमान योजनेच्या लाभार्थ्याकडे ई-कार्ड असणे आवश्यक आहे.
बदलत्या जीवनशैलीने दिवसागणिक आजाराचे प्रमाण वाढत आहे. परंतु सर्व सामान्य नागरिकांना शस्त्रक्रिया व औषधोपचारांवर होणारा खर्च आवाक्या बाहेरचा असल्याने केंद्र सरकारची आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तर राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना त्या रुग्णांच्या दृष्टीने नव संजीवनी ठरत आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभार्थ्यांचा समावेश असल्यास संगणक प्रणालीद्वारे कुटुंब सदस्यास ई-कार्ड मिळण्याची तरतूद आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी केसरी, पिवळे, अन्नपूर्णा,अंत्योदय तसेच पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंब पात्र आहेत अशी माहिती डॉ दिपेश कुमार शर्मा, जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना नांदेड यांनी दिली आहे.
000000

वृत्त क्रमांक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘जलतारा’अंतर्गत जलसंधारण कामांना गती द्या- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले लखमापूर येथे जलताराचे उद्घाटन...