Saturday, January 5, 2019


शासनस्तरावरुन जयंती साजरी करण्याचा निर्णय 2013 चा…
पुण्यतिथीचा उल्लेख न करण्याची प्रथा यावर्षी देखील कायम
मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या यावर्षीच्या दिनदर्शिकेत महापुरुषांच्या पुण्यतिथीचा उल्लेख करण्यात आलेला नाही यावरून विविध माध्यमांमधून शासनाच्या या दिनदर्शिकेबद्दल वस्तुस्थिती जाणून न घेता विनाकारण टीका केली जात आहे. मात्र, 2013 मध्ये शासकीय स्तरावरुन फक्त जयंतीच साजरी करावी असा निर्णय झाल्याने आणि तसा जयंती कार्यक्रमांचा शासन निर्णय निर्गमित होत असल्याने त्यांचाच उल्लेख यावर्षीच्या दिनदर्शिकेत केला आहे. दरवर्षीच्या शासकीय दिनदर्शिकेमध्ये ज्याप्रमाणे पुण्यतिथींचा उल्लेख करण्यात येत नाही, तीच पद्धत यावर्षी देखील अनुसरण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.
यापूर्वी ज्या जयंतींना शासकीय सुट्टी आहे, त्याचाच उल्लेख दिनदर्शिकेत करण्यात येत असे, मात्र यंदा शासनस्तरावरुन साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्व जयंतींचा उल्लेख (छपाईला जाण्याच्या दिवसापर्यंत) दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रतापसिंह, महर्षी वाल्मिकी या जयंती तिथीनुसार साजऱ्या केल्या जात असल्याने इंग्रजी तारखेनुसार दरवर्षी हे दिवस वेगळ्या तारखांना जयंती म्हणून साजरे केले जातात.
महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या दिनदर्शिकेत नमूद केली आहे, फार पूर्वीपासून पुण्यतिथीचे उल्लेख दिनदर्शिकेत केले जात नाहीत. 2013 मध्ये शासकीयस्तरावरुन फक्त जयंतीच साजरी करावी, असा निर्णय झाल्याने आणि तसा जयंती कार्यक्रमांचा शासन निर्णय निर्गमित होत असल्याने त्याचाच उल्लेख यावर्षीच्या दिनदर्शिकेत केला आहे. महासंचालनालयाच्या दिनदर्शिकेमध्ये तारखांचे सर्व उल्लेख शासन निर्णयानुसार करण्यात आलेले आहेत. मात्र, केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश असल्याने दिनदर्शिकेत तसा उल्लेख करण्यात आला आहे.
केवळ माहितीच्या अभावातून बातम्या दिल्या जाणे उचित नाही, किंवा बातमी देण्यापूर्वी एकदा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे विचारणा केली असती, तर गैरसमजुतीतून बातम्या देण्याची वेळ आली नसती, असेही महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे.
००००


ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
             
 नांदेड दि. 5 :-  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने 1 ते 15 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा पंधरवाडा निमीत्त ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन नुकतेच नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती माधवी मारकड यांच्या हस्ते करण्यात आले. हे ग्रं‍थप्रदर्शन 15 दिवस चालणार असून या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000


जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 5 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 8 जानेवारी 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
00000


निवृत्तीवेतन धारकांना बचतीबाबत
कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 5 :-  निवृत्तीवेतन / कुटूंबनिवृत्ती वेतनधारकांची सन 2018-19 निवृत्तीवेतन रक्कम 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त असेल त्यांनी बचतीबाबत आवश्यक बचत प्रमाणपत्र अर्ज, आधारकार्ड व पॅनकार्डसह गुरुवार 17 जानेवारी 2019 पर्यंत कोषागार कार्यालयातील निवृत्ती वेतन शाखेत जमा करावे. मुदतीत सादर न केल्यास नियमाप्रमाणे आयकर कपात केला जाईल, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

Thursday, January 3, 2019


गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांचे
एक दिवसीय जिल्हा स्तरीय प्रशिक्षण येथे संपन्न

नांदेड, दि. 3 :- नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (POCRA) अंतर्गत दुस-या टप्प्यात निवडण्यात आलेल्या 15 तालुक्यातुन 215 गावातील सरपंच,ग्रामसेवक,कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांचे एक दिवसीय प्रकल्पाची तोंड ओळख व रुपरेषा विषयाचे प्रशिक्षण नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उत्साहात संपन्न झाले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार  प्रतापपाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे,यशदाचे तज्ञ प्रशिक्षक व 215 गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक तसेच जिल्हातील उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री रविशंकर चलवदे यांनी प्रस्ताविका मध्ये प्रकल्पाची रुपरेषा, ग्रामसंजिवनी समितीची रचना, जबाबदाऱ्या व कार्ये व प्रकल्पाची सर्वसाधारण कार्यपध्दती बाबत मार्गदर्शन केले.
आमदार  प्रतापपाटील चिखलीकर यांनी उपस्थित सरपंचाना प्रकल्पामध्ये निवड झालेली ही संधी समजुन प्रकल्पाची अंमलबजावनी व्यवस्थितरित्या करुन गावाचा व शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करणे बाबतही अवाहन केले.
जिल्हाधिकारी  अरुण डोंगरे यांनी प्रकल्पाअंतर्गत राबवायच्या बाबीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड,रेशीम उद्योग,कुकुटपालन,शेळीपालन,नियंत्रित  शेती, शेततळे अशा व इतर वैयक्तिक लाभाच्या बाबी व सामुदायिक बाबीचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले.
यशदा पुणे येथील तज्ञ प्रशिक्षक जयदेव शंकर रांजनकर यांनी प्रकल्प संकल्पना घटक आणि दुरदृष्टीकोन,सुक्ष्मनियोजन  व सविस्तर प्रकल्प आराखडा बाबत मार्गदर्शन केले यशदाचे तज्ञ प्रशिक्षक राजेश बाबाराव भटकर यांनी ग्राम कृषि संजिवनी समिती स्थापना, भुमीका आणि जबाबदारी व वैयक्तिक घटकाचा लाभ देणे पध्दती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी मान्यवारांच्या उपस्थितीत 5 शेतकरी गटांना गट शेती प्रोत्साहन योजनेअंतर्गत मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि उपसंचालक सौ. माधुरी सोनवणे यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.व्ही.आकोलकर प्रकल्प विशेषज्ञ (कृषि) व नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प जिल्हास्तरीय समितीचे कर्मचाऱ्यांनी प्ररिश्रम घेतले.
0000


शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीकरिता अपॉईंमेन्ट घेतलेल्या
उमेदवारांची चाचणी सुध्दा घेतली जाणार नाही

नांदेड, दि. 3 :- नांदेड जिल्हयातील सर्व वाहन मालक / चालक यांना कळविण्यात येते की,  दि.04 जानेवारी, 2019 रोजी  मालेगांव यात्रा निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आल्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही. तसेच सदर दिवशी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीकरिता अपॉईंमेन्ट घेतलेल्या उमेदवारांची चाचणी सुध्दा घेतली जाणार नाही.
            सबब, सर्वांना सूचित करण्यात येते की, दि.04 जानेवारी,2019 रोजी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी व शिकाऊ / पक्के अनुज्ञप्ती ई कामे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी पूढील एक आठवडयापर्यंत स्विकारण्यात येणार असल्याचे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड हे कळवितात.
0000  


5 व 6 जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
शिबिराचे आयोजन

नांदेड, दि. 3 :- उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय,सेतू समिती,नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने  दि.5 व 6 जानेवारी रोजी डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड या ठिकाणी दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ?शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीर दि. 5 व 6 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 ते 5या वेळात प्रा.अभिजीत राठोड, पुणे हे  अर्थशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिबीरास प्रमुख अतिथी म्हणून किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन,श्रीमती महानगरपालिकेचे सहा.आयुक्त माधवी मारकड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदर दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
           
0000


केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...