Saturday, January 5, 2019


शासनस्तरावरुन जयंती साजरी करण्याचा निर्णय 2013 चा
पुण्यतिथीचा उल्लेख न करण्याची प्रथा यावर्षी देखील कायम
मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या यावर्षीच्या दिनदर्शिकेत महापुरुषांच्या पुण्यतिथीचा उल्लेख करण्यात आलेला नाही यावरून विविध माध्यमांमधून शासनाच्या या दिनदर्शिकेबद्दल वस्तुस्थिती जाणून न घेता विनाकारण टीका केली जात आहे. मात्र, 2013 मध्ये शासकीय स्तरावरुन फक्त जयंतीच साजरी करावी असा निर्णय झाल्याने आणि तसा जयंती कार्यक्रमांचा शासन निर्णय निर्गमित होत असल्याने त्यांचाच उल्लेख यावर्षीच्या दिनदर्शिकेत केला आहे. दरवर्षीच्या शासकीय दिनदर्शिकेमध्ये ज्याप्रमाणे पुण्यतिथींचा उल्लेख करण्यात येत नाही, तीच पद्धत यावर्षी देखील अनुसरण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.
यापूर्वी ज्या जयंतींना शासकीय सुट्टी आहे, त्याचाच उल्लेख दिनदर्शिकेत करण्यात येत असे, मात्र यंदा शासनस्तरावरुन साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्व जयंतींचा उल्लेख (छपाईला जाण्याच्या दिवसापर्यंत) दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रतापसिंह, महर्षी वाल्मिकी या जयंती तिथीनुसार साजऱ्या केल्या जात असल्याने इंग्रजी तारखेनुसार दरवर्षी हे दिवस वेगळ्या तारखांना जयंती म्हणून साजरे केले जातात.
महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या दिनदर्शिकेत नमूद केली आहे, फार पूर्वीपासून पुण्यतिथीचे उल्लेख दिनदर्शिकेत केले जात नाहीत. 2013 मध्ये शासकीयस्तरावरुन फक्त जयंतीच साजरी करावी, असा निर्णय झाल्याने आणि तसा जयंती कार्यक्रमांचा शासन निर्णय निर्गमित होत असल्याने त्याचाच उल्लेख यावर्षीच्या दिनदर्शिकेत केला आहे. महासंचालनालयाच्या दिनदर्शिकेमध्ये तारखांचे सर्व उल्लेख शासन निर्णयानुसार करण्यात आलेले आहेत. मात्र, केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन राष्ट्रीय संकल्प दिवसम्हणून साजरा करण्याचे निर्देश असल्याने दिनदर्शिकेत तसा उल्लेख करण्यात आला आहे.
केवळ माहितीच्या अभावातून बातम्या दिल्या जाणे उचित नाही, किंवा बातमी देण्यापूर्वी एकदा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे विचारणा केली असती, तर गैरसमजुतीतून बातम्या देण्याची वेळ आली नसती, असेही महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे.
००००

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...