Monday, October 8, 2018


नवरात्र उत्सवात पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 8 :- जिल्ह्यात 10 ते 20 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत नवरात्र उत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर दुर्गादेवी, शारदादेवीची स्थापना व विसर्जन करण्यात येते. त्याकरीता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणुन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 10 ते 20 ऑक्टोंबर 2018 च्या मध्यरात्रीपर्यंत वरील कलमान्वये पुढील अधिकार प्रदान केला आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी वर्तवणूक किंवा वागणुक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी, उपासनेच्यावेळी, कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33, 35, 37 ते 40, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिर सभा, मोर्चे, मिरवणुक, निर्दशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्वपरवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावेत. सदर जाहीर सभा, मिरवणुक, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये.
हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जारी केले आहेत.
00000


डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत
अर्ज सादर करण्यास 30 ऑक्टोंबर मुदतवाढ
नांदेड दि. 8 :- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2018-19 अंतर्गत जिल्‍हयातील अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या नोंदणीकृत मदरसांकडून प्रस्‍ताव मागविण्यास मंगळवार 30 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
इच्‍छुक मदरशांनी शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 मध्‍ये नमूद केलेल्‍या विहित नमुन्‍यातील परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रे जोडून जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मंगळवार 30 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा उच्चस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी केले आहे.
ज्‍या मदरशांमध्‍ये फक्‍त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्‍यात येत आहे आणि ज्‍यांना आधुनिक शिक्षणाकरिता शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहे अशा  नोंदणीकृत मदरशांकडून राज्य अल्‍पसंख्‍यांक विकास विभाग अर्ज मागवित आहे.
सदर मदरसे धर्मदाय आयुक्‍त अथवा महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावेत. अशा मदरशानी शासन निर्णय, क्रमांक अविवि- 2010/प्र.क्र.152/10/का-6, दि.11 ऑक्‍टोबर, 2013 च्‍या तरतुदीनुसार पुढील बाबींकरिता विहित नमुन्‍यात अर्ज करावेत.  विज्ञान, गणित, समाजशास्‍त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्‍याकरिता शिक्षकांना मानधन देणे.  पायाभूत सुविधासाठी व ग्रंथालयासाठी अनुदान राहील. शासन निर्णय दि. 11 ऑक्टोंबर 2013 च्‍या तरतूदीनुसार जास्‍तीतजास्‍त 3 डी.एड / बी.एड शिक्षकांना मानधन देण्‍यात येईल. विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाण 40:1 असे राहील. शिक्षणासाठी हिंदी/ इंग्रजी / मराठी / उर्दू यापैकी एका माध्‍यमाची निवड करून त्‍यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे.
ग्रंथालयासाठी तसेच विद्यार्थ्‍यांकरिता शैक्षणिक साहित्‍यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी 2 लाख रुपये अनुदान देय आहे. यामध्‍ये मदरशांच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व्‍यवस्‍था करणे, प्रसाधन गृह उभारणे व त्‍याची डागडुजी करणे, विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर, मदरसाच्‍या निवासस्‍थानात इन्‍वहर्टरची सुविधा उपलब्‍ध करणे, मदारसांच्‍या निवासी इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफटवेअर, प्रिंटर्स इ. तसेच प्रयोगशाळा साहित्‍य, सायन्‍स कीट, मॅथेमॅटीक्‍स कीट व इतर अध्‍ययन साहित्‍य. यासाठी किमान 3 वर्षापूर्वी नोंदणी केलेल्‍या व अल्‍पसंख्‍याक बहुल मदरशांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. ज्‍या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्‍कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ह्या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
मंगळवार 30 ऑक्‍टोबर 2018 नंतर जिल्‍हाधिकारी कार्यालयास प्राप्‍त होणारे प्रस्‍ताव विचारात घेतले जाणार नाहीत. शासन निर्णय क्र-अविवि. 2010/प्र.क्र.152/10/का-6, दि. 11 ऑक्‍टोबर 2013 व अर्जाचा नमुना, आवश्‍यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 8 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 9 ऑक्टोंबर 2018 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.  
0000


विधानसभा विरोधी पक्षनेता
राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
नांदेड, दि. 8 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 10 ऑक्टोंबर 2018 रोजी यवतमाळ येथून मोटारीने सकाळी 9.30  वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. माहूर येथून मोटारीने यवतमाळकडे प्रयाण करतील.  
00000

Saturday, October 6, 2018


महात्‍मा गांधी जयंतीदिनी विशेष मोहिमेत
मतदार नोंदणीसाठी 4 हजार 171 अर्ज प्राप्‍त
नांदेड, दि. 6 :- नागरीकांना मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्‍ती, वगळणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर महात्‍मा गांधी जयंतीदिनी 2 ऑक्‍टोबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले होते. या मोहिमेत नागरीकाकडून नाव नोंदणीचे 4 हजार 171 अर्ज व नाव वगळणीचे  478 अर्ज प्राप्‍त झाले आहेत. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी 31 ऑक्‍टोबर पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक विभाग जिल्‍हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्‍याअंतर्गत दिनांक 1 सप्‍टेंबर 2018 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. नांदेड जिल्‍हयात दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम दि. 1 सप्‍टेबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्‍यात येत आहे.
या मोहिमेत बीएलओ यांनी मतदारांची नाव नोंदणी, दुरुस्‍ती व वगळणीचे विविध नमुना अर्ज भरुन घेण्‍यात आले. महिला मतदार, दिव्‍यांग व्‍यक्‍ती, नवमतदारांचे नोंदणी प्रमाण वाढविण्‍याकरीता विशेष प्रयत्‍न करण्‍यात आले. नाव नोंदणी करीता प्राप्‍त झालेल्‍या अर्जापैकी दिव्‍यांग मतदारांचे - 49 अर्ज व नवमतदार (वय वर्ष १८-२१)  यांचे 2 हजार 891 अर्ज प्राप्त झाले आहेत. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्‍या अनुषंगाने मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍याकरीता अंतीम मुदत 31 ऑक्‍टोबर 2018 आहे.
मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी / दुरुस्‍ती / वगळणी याबाबतचे अर्ज भरुन सादर करण्‍यासाठी संबंधीत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात 31 ऑक्‍टोबर पर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन नांदेड जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
000000


ज्येष्ठ नागरिकांनी मोफत आरोग्य
 सुविधांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 6 :- ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हा रुग्णालयांतर्गत उपलब्ध असलेल्या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा. उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकांनी दररोज किमान एक तास तरी व्यायामासाठी द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय व तेलंग हॉस्पिटल नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिन व सप्ताहच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आज घेण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी 275 ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिक तथा नांदेडचे जेष्ठ फिजीसियन डॉ. रामरतन सिंह, एमपीएस स्कूलचे प्राचार्य वेंकटेस्वलू, उत्तर मराठवाडा ज्येष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष अशोक तेरकर, डॉ. दीपक हजारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव बंग, नामदेवराव पदमने यांचा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम पाटील तेलंग, डॉ. शारदा तेलंग, वैद्यकीय अधिकारी अनुप्रिया गहेरवार, प्रमोद गटटानी, अमृत तेलंग, अशोक कुबडे, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, संतोष बेटकर यांची उपस्थिती होती.
000000



लाभार्थ्यांना आधार ओळखपत्रासाठी
विशेष शिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 6 :- मुदखेड तालुक्‍यातील विशेष सहाय योजनेच्‍या लाभार्थ्‍यांचे आधार ओळखपत्र काढण्‍यासाठी व आधार ओळखपत्र असलेल्‍या लाभार्थ्‍यांचे आधार ओळखपत्र अपडेट करण्‍यासाठी सोमवार 8 ते शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत महसूल मंडळ निहाय विशेष आधार  शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. संबंधीत लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार मुदखेड यांनी केले आहे.
या शिबिरास आधार ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका, रहिवाशी प्रमाणपत्र  या कागदपत्रांसह त्‍या-त्‍या गावातील लाभार्थ्‍यांनी आपल्‍याशी संबंधीत महसूल मंडळातील मुख्‍यालय असलेल्या ठिकाणी जसे मुदखेड महसूल मंडळ अंतर्गत- तहसिल कार्यालय मुदखेड, महसूल मंडळ बारड अंतर्गत- ग्रामपंचायत कार्यालय बारड आणि महसूल मंडळ मुगट अंतर्गत- ग्राम पंचायत कार्यालय मुगट  येथे दिनांक 8 ते 12 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत सकाळी 10 ते सायं 5 यावेळेत उपस्थित रहावे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा योजना या विशेष सहाय योजनेच्‍या लाभार्थ्यांचे अनुदान वाटप करताना आधार विषयक तांत्रीक अडचणी येत आहेत. यात निराधार योजनेचे लाभार्थी वयोवृध्‍द असल्‍याने त्‍यांचे Finger Print Iris आधार किटवर येत नसल्‍याने काही लाभार्थ्यांचे आधार केवायसी होत नाही. तसेच काही लाभार्थी डोळयांनी हातांनी दिव्यांग आहेत अशा लाभार्थ्यांचे व काही कुष्‍ठरोगी लाभार्थी असल्‍यामुळे त्‍यांचे आधार केवायसी होत नाही. काही लाभार्थ्यांनी आधार काढण्‍यासाठी अनेक वेळा नोंदी केलेल्‍या आहेत व त्यांचेकडे आधार नोंदणी पावती नाही. ज्या लाभार्थ्यांचे आधार प्राप्‍त करुन घेण्‍यास तांत्रिक अडचणी येत आहेत व आधार कार्यान्‍वीत नाहीत. अशा लाभार्थ्‍यांसाठी सोमवार 8 ते शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत महसूल मंडळ निहाय विशेष आधार शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...