Wednesday, August 2, 2023

कृषि विभागाच्यावतीने अनुदानावर गोदाम बांधकाम

 वृत्त क्र. 468

कृषि विभागाच्यावतीने अनुदानावर गोदाम बांधकाम 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कृषि विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2023-24 अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये गोदाम बांधकामासाठी लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकंडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझायीन / स्पेसिफीकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावेत. 

या योजनेंतर्गत ज्या ठिकाणी गोदामांची व्यवस्था नाही व ज्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येतो अशा परिसरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो. या योजनेअंतर्गत कमाल 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. 

अटी व शर्तीच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँक कर्जाशी निगडीत असून इच्छूक शेतकरी उत्पादक संघ / कंपनी, केंद्र शासनाची ग्रामीण भांडार योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे असावा. लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करावी व त्याची खात्री जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी हे करतील. 

या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम चालु आर्थिक वर्षात पुर्ण करणे बंधनकारक आहे. अपुर्ण बांधकाम, मंजूर डिझाईन, स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषि माल साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दरात करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 

जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी सैनिक दरबारचे आयोजन

 जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी सैनिक दरबारचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 2 :- महसूल व वन विभागातर्फे 1 ऑगस्ट 2023 पासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत शनिवार 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमातर्गत सैनिक दरबारचे आयोजन करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील कार्यरत सैनिक तथा माजी सैनिकांच्या महसूल व इतर विभागाशी संबंधित असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व कार्यरत सैनिक, माजी सैनिक व त्यांचे नातेवाईक यांनी त्यांच्या समस्या/अडचणी अधिकृत कागदपत्रांसोबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे एक दिवस अगोदर जमा करावेत. तसेच शनिवार 5 ऑगस्ट  रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वा. उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000


 वृत्त क्र. 466

राष्ट्रीय मुख आरोग्य दिनानिमित्त

विद्यार्थ्याची मौखिक आरोग्य तपासणी


नांदेड (जिमाका) दि.
 2 :-  राष्ट्रीय मुख आरोग्य दिनानिमित्त 1 ऑगस्ट रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत विभाग यांच्याकडून इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, विष्णुपुरी नांदेड येथील विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्याना मौखिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 


या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी विद्यार्थ्यासोबत मुख आरोग्याबद्दल संवाद साधला. दंत विभाग प्रमुख डॉ. भावना भगत  यांनी दंत रोग व  त्यावरील उपचार याची माहिती दिली. या कार्यक्रमास  डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. वाय.एच. चव्हाण, डॉ. विशाल टेकाळे, दहिभाते , नियोजन अधिकारी बालाजी डोळे,  इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे प्राचार्य वानखेडे , शासकीय परिचारिका महाविद्यालयाचे प्राचार्य नांगराले  यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तथा आभार प्रदर्शन डॉ. अरुण नागरिक यांनी केले . या कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. सुशील येमले, डॉ. सतीश राठोड, कल्याण कुंडिकर, शेख करीम यांनी प्रयत्न केले.

0000

Tuesday, August 1, 2023

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 9.80 मि.मी. पाऊस

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  9.80  मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 1 :- जिल्ह्यात मंगळवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी  9.80  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 576.90  मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

जिल्ह्यात मंगळवार 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 7 (523.40), बिलोली-27 (718.20), मुखेड- 11.40 (553.70), कंधार-17.70 (299.30), लोहा-15.90 (423.70), हदगाव-6.70 (511.40), भोकर-6.60 (637.10), देगलूर-12(566.70), किनवट-2.80(772.60), मुदखेड- 2.60 (596.70), हिमायतनगर-1.70 (487.30), माहूर- 5.80 (784.50), धर्माबाद- 1.50 (664.90), उमरी- 2 (638.40), अर्धापूर- 8.10 (662.80) नायगाव-15.10 (523.60) मिलीमीटर आहे.

0000

मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 वृत्त क्र. 464

मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. यासाठी पात्र व्यक्ती / संस्थाकडुन अर्ज मागविण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, उद्योग भवन, एमआयडीसी परिसर शिवाजीनगर, नांदेड या कार्यालयाशी भ्रमणध्वनी क्रमांक 8390290213 किंवा दुरध्वनी क्रमांकावर 02462-240674 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

योजनेची वैशिष्टे- मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणुक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी/ विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करणे आहे.

या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तीक माधपाळ पात्रतेसाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य. वय 18 वर्षापेक्षा जास्त व 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. केंद्र चालक प्रगतशील मधपाळ व्यक्ती पात्रतेसाठी किमान 10 वी उत्तीर्ण, वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिच्या नावे एक एकर शेती जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था पात्रतेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. एक एकर शेत जमीन स्वमालकीची / भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. अटी व शर्तीमध्ये लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चीत केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

00000

 

पिक विमा भरण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 वृत्त क्र. 463

पिक विमा भरण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 31 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यत मुदत होती. परंतु शेतकऱ्यांना पिक विमा भरताना पोर्टलवर येत असलेल्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाने 3 ऑगस्ट 2023 पर्यत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही त्यांनी 3 ऑगस्टपर्यत पिक विमा भरुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

0000

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

 वृत्त क्र. 463

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी

शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती साठी माहे ऑगस्ट ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीत तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरुवात होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. तरी अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी यांची नोंद घेवून शिबिर कार्यालयास उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

तालुकानिहाय कॅम्पचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 2 ऑगस्ट, 4 सप्टेंबर, 3 ऑक्टोंबर या दिवशी आहे. धर्माबाद येथे 4 ऑगस्ट, 6 सप्टेंबर, 5 ऑक्टोंबर या दिवशी आहे. किनवट येथे 8 ऑगस्ट, 8 सप्टेंबर, 10 ऑक्टोंबर यादिवशी आहे. मुदखेड येथे 10 ऑगस्ट,  12 सप्टेंबर, 12 ऑक्टोंबर यादिवशी आहे. माहूर येथे 17 ऑगस्ट, 14 सप्टेंबर, 17 ऑक्टोंबर या दिवशी आयोजन करण्यात येणार आहे. हदगांव येथे 22 ऑगस्ट, 20 सप्टेंबर, 19 ऑक्टोंबर यादिवशी आहे. धर्माबाद येथे 24 ऑगस्ट, 25 सप्टेंबर, 25 ऑक्टोंबर या दिवशी आहे. हिमायतनगर येथे 28 ऑगस्ट, 27 सप्टेंबर, 27 ऑक्टोंबर यादिवशी आहे. किनवट येथे 30 ऑगस्ट, 29 सप्टेंबर, 30 ऑक्टोंबर या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. यानुसार शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्ती साठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...