Friday, November 12, 2021

 दुधाळ गायीचे / म्हैस गट वाटपासाठी

अर्ज करण्यास 15 डिसेंबर पर्यंत मुदत   

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना सन 2021-22 अंतर्गत 2 दुधाळ गायीचे / म्हैस गट वाटपासाठी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2021 पर्यंत मागविण्यात आली आहेत. हे अर्ज पंचायत समिती स्तरावर स्विकारण्यात येणार आहेत. अर्जाचा नमुना व अधिकच्या माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) संबंधित पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.

00000

टेबल टेनिस खेळाचे नियमीत प्रशिक्षणासाठी निवड चाचणी

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्हा क्रीडा प्रशीक्षण केंद्रांतर्गत टेबल टेनिस या खेळाचे नियमीत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 7 ते 10 वर्षाच्या आतील मुला-मुलींनी 16 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल नांदेड येथे सायं 5 ते 7 यावेळेत या निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार  यांनी केले आहे. 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांतर्गत टेबल टेनिस या खेळाचे नियमीत प्रशिक्षण सकाळी 6.30 ते 9.30 व सायं. 4 ते 8 या वेळेत चालू आहे. जिल्ह्यातील 7 ते 10 वर्षे मुला-मुलींची स्वतंत्र बॅच चालू करण्याचा मानस आहे. या निवड चाचणीतून खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन केंद्र शासनामार्फत चालणाऱ्या टेबल टेनिस खेलो इंडिया सेंटरसाठी निवड करण्यात येणार आहे. हे नियमीत प्रशिक्षण केंद्र राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल बंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे.

00000


 14 ते 19 नोव्हेंबर कालावधीत आयसीडीएस आठवडा

नांदेड (जिमाका) दि. 12 :- महिला व बालविकास विभागाकडील परिपत्रकानुसार 14 ते 19 नोव्हेंबर कालावधीत आयसीडीएस आठवडा पाळण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. 

जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन तसेच केंद्र व राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या सूचनांचे पालन करावे. केलेल्या या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश दिले आहेत.

000000

 जैव तंत्रज्ञान दिन साजरा करण्याच्या सूचना   

नांदेड (जिमाका) दि. 12 :- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनानिमित्त  “जैव तंत्रज्ञान दिन” 14 नोव्हेंबर रोजी विद्यापीठ, शाळा-महाविद्यालयामार्फत साजरा करण्याबाबत आवश्यक त्या सूचना विकास आयुक्त (उद्योग) यांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. 

जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्यामुळे सुरक्षेच्या उपाय योजनेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन तसेच केंद्र व राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या सूचनांचे पालन करावे. केलेल्या या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश दिले आहेत.

00000

 

 बालदिन, जागतिक शौचालय दिनाचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 12 :- बालदिन 14 नोव्हेंबर ते जागतिक शौचालय दिन 19 नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यक्रम राबविण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. 

जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्यामुळे सुरक्षेच्या उपाय योजनेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन तसेच केंद्र व राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या सूचनांचे पालन करावे. केलेल्या या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश दिले आहेत.

00000

 प्रशासनाप्रति नागरिकांचा विश्वास दृढ होण्यासाठी

शासकीय योजनांचा महामेळावा मोलाचा

- पालकमंत्री अशोक चव्हाण   

मांडवी येथे सकाळी 9 ते सायं 4 पर्यंत शासकीय योजनांचा महामेळावा 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मांडवी येथे दि. 13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शासकिय योजनांच्या महामेळाव्याद्वारे दुर्गम भागातील नागरिकांची प्रशासनाप्रती अधिक विश्वासर्हता वाढेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त करुन या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तळागाळातील लोकांच्या कल्याणाचा विचार करुन शासन विविध योजना साकारते. महाराष्ट्राने अगदी सुरुवातीपासून लोककल्याणकारी राज्याची भूमिका स्विकारली असून शासकीय योजनांच्या पाठीमागे घटनेचे मूल्य हे प्रमाण मानले आहे. असंख्य योजना या तसे पाहिले तर नागरिकांच्या हक्का समवेत कायदेविषयक कर्तव्याची पूर्तताही करणाऱ्या असतात. यादृष्टिने किनवट येथील या महामेळाव्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सहभागी होऊन कायदेविषयक साक्षरतेसाठी पुढे सरसावले आहे. अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करतांना नागरिकांमध्ये कायदेविषयक साक्षरतेची बीजे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचतील, असा विश्वासही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त करुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कौतुक केले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला आहे. या महामेळाव्याचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल. आणेकर,  जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर (घुगे), जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तीकुमार पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र एस. रोटे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर किनवट शंकर अंभोरे, सहदिवाणी न्यायाधीश विजय परवारे, तालुका दंडाधिकारी मृणाल जाधव व जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमूख उपस्थित राहणार आहेत. 

या महामेळाव्यात 75 स्टॉलमध्ये आरोग्य सेवेसह आरटीओ कार्यालय, पोलीस विभाग, महसूल विभाग आदि संबंधित विभागाशी कुणाचे निगडित प्रश्न असतील तर तेही मार्गी लावण्याचे नियोजन केले आहे. याचबरोबर वैद्यकीय तपासणी,  कोवीडचे लसीकरण, रक्तदान शिबीरही आयोजीत करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेतर्गत असणारे शिक्षण, आरोग्य, कृषि, पशुधन विकास, बाल विकास प्रकल्प, पाणी पुरवठा व बांधकाम विभाग, आदिवासी विकास, भूमि अभिलेख,  बचतगट ग्राहक सल्ला आदी विविध प्रकारचे स्टॉल्स यात असतील. मांडवी परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र एस. रोटे यांनी केले आहे.

00000

Thursday, November 11, 2021

नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 751 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 431 एवढी झाली असून यातील 87 हजार 775 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे मुखेड तालुक्यातर्गत 1 असे एकुण 1 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात कंधार तालुक्यातर्गत 2, खाजगी रुग्णालय 2 अशा एकूण 4 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 23 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 10, खाजगी रुग्णालय 5 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 60 हजार 992

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 57 हजार 183

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 431

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 755

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

  वृत्त   नांदेड जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे-पालकमंत्री अतुल सावे यांचे निर्देश  मुंबई, दि. १३, नांदेड जिल्हा प...