Friday, November 12, 2021

 प्रशासनाप्रति नागरिकांचा विश्वास दृढ होण्यासाठी

शासकीय योजनांचा महामेळावा मोलाचा

- पालकमंत्री अशोक चव्हाण   

मांडवी येथे सकाळी 9 ते सायं 4 पर्यंत शासकीय योजनांचा महामेळावा 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मांडवी येथे दि. 13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शासकिय योजनांच्या महामेळाव्याद्वारे दुर्गम भागातील नागरिकांची प्रशासनाप्रती अधिक विश्वासर्हता वाढेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त करुन या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तळागाळातील लोकांच्या कल्याणाचा विचार करुन शासन विविध योजना साकारते. महाराष्ट्राने अगदी सुरुवातीपासून लोककल्याणकारी राज्याची भूमिका स्विकारली असून शासकीय योजनांच्या पाठीमागे घटनेचे मूल्य हे प्रमाण मानले आहे. असंख्य योजना या तसे पाहिले तर नागरिकांच्या हक्का समवेत कायदेविषयक कर्तव्याची पूर्तताही करणाऱ्या असतात. यादृष्टिने किनवट येथील या महामेळाव्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सहभागी होऊन कायदेविषयक साक्षरतेसाठी पुढे सरसावले आहे. अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करतांना नागरिकांमध्ये कायदेविषयक साक्षरतेची बीजे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचतील, असा विश्वासही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त करुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कौतुक केले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला आहे. या महामेळाव्याचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल. आणेकर,  जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर (घुगे), जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तीकुमार पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र एस. रोटे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर किनवट शंकर अंभोरे, सहदिवाणी न्यायाधीश विजय परवारे, तालुका दंडाधिकारी मृणाल जाधव व जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमूख उपस्थित राहणार आहेत. 

या महामेळाव्यात 75 स्टॉलमध्ये आरोग्य सेवेसह आरटीओ कार्यालय, पोलीस विभाग, महसूल विभाग आदि संबंधित विभागाशी कुणाचे निगडित प्रश्न असतील तर तेही मार्गी लावण्याचे नियोजन केले आहे. याचबरोबर वैद्यकीय तपासणी,  कोवीडचे लसीकरण, रक्तदान शिबीरही आयोजीत करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेतर्गत असणारे शिक्षण, आरोग्य, कृषि, पशुधन विकास, बाल विकास प्रकल्प, पाणी पुरवठा व बांधकाम विभाग, आदिवासी विकास, भूमि अभिलेख,  बचतगट ग्राहक सल्ला आदी विविध प्रकारचे स्टॉल्स यात असतील. मांडवी परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र एस. रोटे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...