Sunday, September 23, 2018


महाराष्ट्र विधान परिषद
विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड दि. 23 :- महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 24 सप्टेंबर 2018 रोजी परळी वैजनाथ येथून सकाळी 10 वा. श्री गुरु गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.50 वा. श्री गुरु गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथून Trujet 2T-413  या विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000


"आयुष्यमान भारत" योजना वंचित गरिबांसाठी
लाभदायक ; आरोग्य सुविधेचा मोफत लाभ घ्यावा 
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 23 :- आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना वंचित गरिबांसाठी लाभदायक असून यात मोफत आरोग्य उपचार मिळणार आहेत. या आरोग्य सुविधेचा गरीब पात्र कुटुंबांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.    
सर्वांना आरोग्य चांगले मिळावे यासाठी आज देशभरात आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे करण्यात आला. या योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, श्री. धनगे, संतोष बोडलेवार, पंचायत समिती सभापती मायाताई राठोड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, केंद्र शासनाने आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 1 हजार 349 आजारांचे उपचार निश्चित केले आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 971 आजारांचा या उपचारात समावेश केला आहे. या दोन्ही योजनेतील उपचारांचा आढावा घेऊन यादी तयार करण्यात आली आहे. ई-कार्डद्वारे लाभार्थी कुटुंबाना या योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. एका कुटुंबाला प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी 5 लाख रुपये विमा संरक्षण राहणार आहे. योजनेंतर्गत त्या कुटुंबाला ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात मोफत उपचार घेता येतील. आरोग्य व शिक्षण चांगले राहिले तर गावाचा विकास होतो, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसात तालुका, गाव व वार्डनिहाय सर्व लाभार्थ्यांना ई-कार्ड देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.  
जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांनी आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आरोग्य उपचाराचा मोफत लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.    
 झारखंड रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष्यमान भारत’ योजनेचा राष्ट्रव्यापी शुभारंभ केला. त्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील 10 लाभार्थ्यांना ई-कार्डचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.    
प्रास्ताविकात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास सर्जे यांनी या योजनेसाठी जिल्ह्यातील 2 लाख 77 हजार 999 कुटुंब पात्र आहेत अशी माहिती दिली. तर सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी व उपजिल्हा रुग्णालय मुखेड या दोन रुग्णालयात या योजनेत उपचार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्गादास रोडे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आशा कार्यकर्ती, आरोग्य मित्र, नागरिक उपस्थित होते. 
00000

Saturday, September 22, 2018

लेख - महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासीक उपक्रम जनता व शासनातला संवाद म्हणजे "लोकराज्य"


महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासीक उपक्रम
जनता व शासनातला संवाद म्हणजे "लोकराज्य"
         
कोणतेही शासन हे लोकाभिमुख असावे, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. महाराष्ट्र शासनाने गेल्या 70 वर्षांपासून सातत्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि काळाची पावले ओळखत छपाई तंत्रज्ञानाची सांगड घालत "लोकराज्य"चा आकर्षक, दर्जेदार, वेगवेगळ्या विषयांना समर्पित असा अंक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नांना एक नियमित वाचक म्हणून सलाम करावा वाटतो. खरे तर महाराष्ट्र शासनाचा हा एक ऐतिहासीक उपक्रमच असून जनता-जनार्दन व शासनातला संवादरुपी दुवा म्हणजे "लोकराज्य" होय.
       मासिक सातत्याने चालवणे तसे एक महान कार्य. माझा प्रिंट मीडियातील दैनिकात काम करण्याचा 20 वर्षांचा अनुभव. अंकातील सातत्य, गुणात्मकता, विविध विषयांची त्या-त्या प्रसंगी मिळविलेली अधिकृत आकडेवारी, जोडीला रंगसंगती, आकर्षक व दर्जेदार छायाचित्रे, अंकाची वेगळ्या व डोळ्यांची पारणे फेडणारी मांडणी, टाईपफाँड आदी वाखण्याजोगेच आहे. एखादे मासिक शासनामार्फत प्रसिद्ध होते म्हणजे केवळ शासनाची वाहवा करणारे असेल, अशी काहींची समजूत होते; परंतु "लोकराज्य" हे याबाबी पासून बऱ्याच अंशी दूर राहिलेले आहे हे प्रकर्षाने जाणवते. जनतेच्या कल्याणासाठी, विकासासाठी घेतलेले शासनाचे निर्णय जनतेकरिता सुरु केलेल्या "लोकराज्य" मधून मांडणे हे क्रमप्राप्त नव्हे तर ते प्रथम कर्तव्यच होय. यात कुणाचा बडेजाव वैगैरे काही नव्हे !
      
गत वर्षभरातील अंकाचा धुडोंळा घेतला तर त्यामध्ये फेब्रुवारीतील साहित्य संमेलन, मराठी भाषेला समर्पित अंक प्रसिद्ध करणे एखाद्या दैनिकाला, साप्ताहिकाला किंवा अन्य मासिकाला सध्याच्या कार्पोरेट जगतात, जाहिरातींच्या युगात शक्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. मार्च महिन्याचा "अस्मिता" माझा गौरव, माझा हक्क हा महिलांविषयी योजना व कायदे, सुरक्षा ॲप्स, यशकथा अंक वाचनीय आहे. वाचकांची एखाद्या विषयाची सर्व विषयव्यापी भूख भागवण्याचे काम "लोकराज्य" मासिक करते आहे. त्याबद्दल गौरवौद्-गारास संपूर्ण टीम पात्र आहे. "लोकराज्य" चे काम टीमरुपी आहे. त्याला शासनाची भरभक्कम साथ व पाठिंबा आहे. त्यामुळे वाचकांना काय हवे आहे ते देण्याचा प्रयत्न अनेक प्रसिद्ध झालेल्या अंकामधून प्रकर्षाने जाणवतो.
       एप्रिल 2018 च्या अंकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत तब्बल 92 पाणी दर्जेदार अंक वाचकांच्या हाती देणे हे खरेच मोठे कौतुकास्पद काम "लोकराज्य" ने केले आहे. "लोकराज्य" मासिकातून केवळ शासनाची स्तुतीच झालेली नाही तर समाजाच्या भल्यासाठीच्या बाबीही वाचकांच्या हाती देण्याचा यशस्वी प्रयोग झाल्याचे समोर आले आहे. 13 कोटी वृक्ष लागवड मोहिम असो की, पंढरीची वारी असो अंक हाथी घेतला की वाचक म्हणून "लोकराज्य" ची सुबक छपाई, आकर्षक मांडणी पाहून माझ्या परिचयातील किमान शंभरावर नियमित वाचकांची आपआपल्या परिचितांना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला अंक भेट देण्याचा एक वेगळा पायंडा पाडला आहे. यात काही शासनाची वाहक करण्याचा प्रयत्न नाही. परंतु शासन उपक्रमही आजच्या कार्पोरेट युगात परफेक्ट बसू शकतो याचेच उदाहरण म्हणजे "लोकराज्य" आहे.
      
स्पर्धा परीक्षा असो की, इयत्ता 5 ते 12 वी पर्यंतच्या विविध परीक्षा असोत. त्यासाठी विद्यार्थी- विद्यार्थींनीनी "लोकराज्य"चा संदर्भग्रंथ म्हणून वापर करायला हवा. यातील संदर्भ हे अधिकृत असतात. दैनिके वाचण्याबरोबरच "लोकराज्य" मासिकही नियमितपणे वाचल्यास त्याचा परीक्षार्थ्यांना निश्चितच लाभ होवू शकेल. "लोकराज्य" चे हे कार्य खरेच खूप मोठे आहे. ज्ञानरुपी, संदर्भरुपी हा मासिकाचा भांडार आगामी काळातही असेच कार्य करत राहो, राहील अशी माझी खात्री आहे.
       "लोकराज्य"च्या यशासाठी अहोरात्र प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे परिश्रम घेणाऱ्या हातांना एक वाचक म्हणून मानाचा मुजरा. समाजात जे-जे चांगले, ते-ते मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे व सुरुही आहे. पुढेही वर्षांनुवर्षे रहावा व "लोकराज्य" शंभर वर्षांचा यशाची परंपरा अशाच यशदायी वाटेने पूर्ण करावी, ही तमाम महाराष्ट्राच्यावतीने सदिच्छा…!                
                                                        
    डॉ. भास्कर प्र. भोसले ,  
                                                                        कैलासनगर, नांदेड 


दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या
परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 23 :- दिपावली उत्सव 6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2018 या कालावधीत साजरा होणार आहे. या कालावधीतील तात्पुरती फटाका विक्रीची दुकाने सुरु करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना जि‍ल्‍हादंडाधिकारी तर जिल्‍हयातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्‍यांच्या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरता फटाका विक्री परवाने देतील. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्‍यात आले आहेत. इच्छुकांचे विहित नमुन्यातील अर्ज 4 ऑक्टोंबर ते 19 ऑक्टोंबर 2018 पर्यंत विक्री व स्विकारले जातील, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  
नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍या मार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार 4 ऑक्टोंबर ते 19 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.
तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात पुढील कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या  कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत.   नमुना AE-5 मधील अर्ज, परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 86(3) अन्‍वये सदर व इतर दुकान यात किमान 15 मीटरचे अंतर असणे आवश्‍यक  आहे. नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा. नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र. परवाना शुल्कासाठी 500 रुपये चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिकरित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड किंवा संबंधीत नगरपरिषद, नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी किंवा ग्रामपंचायत कार्यालय यांचे  नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र. जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा. नोंदणीकृत, मान्यता प्राप्त असोसिएशन मार्फत तात्पुरता फटाका परवानासाठी अर्ज केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यातील नमूद ज्या अटी व शर्तीनुसार संबंधीत दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहील. तसेच कोणत्याही विस्फोटक नियमांचे व परवान्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होऊन कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत असोसिएशनची असले याबाबत संबंधीत असोसिएशनकडील शपथपत्र. दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक इ.. इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.
अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनाद्वारे शुल्क शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने 22 ऑक्टोंबर व 23 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍यामार्फत तसेच उ‍पविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍यामार्फत दिले जातील.
       या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल. याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करुन ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरुपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.
000000


गणेशोत्सव विसर्जन दिवशी 
आठवडी बाजार बंद राहणार
नांदेड, दि. 22 :- गणेशोत्सव विसर्जन मार्गात भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ नाही तसेच मिरवणूक मार्गात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी रविवार 23 सप्टेंबर 2018 रोजी नांदेड शहरात भगतसिंग चौक ते लोहार गल्ली, गणेश टॉकीज रोड, आंबेडकर वाचनालय ते बर्फी चौक, मोहमद अली रोड, जुना मोंढा ते बालाजी मंदिर या भागात भरत असलेला आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केला आहे.
या भागात भरत असलेला आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार 24 सप्टेंबर 2018 रोजी भरविण्यात यावा. मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी हा आदेश निर्गमीत केला आहे.  
00000


Friday, September 21, 2018


धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी
अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार 
नांदेड, दि. 21 :- धर्माबाद तालुक्‍यातील पाटोदा थडी, शेळगाव थडी व मौ. माष्‍टी ही गावे धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या गणामध्‍ये समावेश करुन तेथील शेतकऱ्यांची नावे मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट करुन वरील गावांचा समावेश केलेल्‍या गणांची सुधारीत शेतकरी मतदार यादी शनिवार 22 सप्टेंबर 2018 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड व सचिव, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद यांच्‍या कार्यालयातील दर्शनीय भागातील सुचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.
मा. राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्‍या आदेशाने व उच्‍च न्‍यायालय औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र. 6942 / 2018 मध्‍ये दिलेल्‍या निर्णयाप्रमाणे धर्माबाद तालुक्‍यातील पाटोदा थडी, शेळगाव थडी व मौ. माष्‍टी ही गावे धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या गणामध्‍ये समावेश करुन तेथील शेतकऱ्यांची नावे मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट करुन वरील गावांचा समावेश केलेल्‍या गणांची सुधारीत शेतकरी मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍याबाबत आदेशीत केले होते.
त्‍यानुसार वरील तीन्‍ही गावांचा नजीकच्‍या गणामध्‍ये म्‍हणजेच पाटोदा थडी हे गाव गण क्र.10 पाटोदा (बु) मध्‍ये मौ. माष्‍टी गण क्र.11 अतकुर मध्‍ये व शेळगाव थडी हे गाव गण क्र. 15 आलुर समावेश करुन सुधारीत प्रारुप मतदार यादी 29 ऑगस्ट 2018 रोजी प्रकाशीत करुन वरील तीन गणांच्‍या प्रारुप मतदार यादीवर हरकती मागविल्‍या होत्‍या. त्‍याअनुषंगाने आलेल्‍या हरकतीवर जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास)  तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी सुनावणी घेऊन दि. 17 सप्टेंबर 2018 रोजी निर्णय दिला आहे.
महाराष्‍ट्र कृषि उत्‍पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 60 व त्‍या खालील महाराष्‍ट्र कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम सुधारणा 2017 चे नियम 6 ते 10 मधील तरतुदीनुसार तसेच मा. उच्‍च न्‍यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे वरील तिन्‍ही गावांचा समावेश केलेल्‍या गणांची अंतीम शेतकरी मतदार यादी  धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती निवडणूक- 2018 करिता शनिवार 22 सप्टेंबर 2018 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड व सचिव, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद यांच्‍या कार्यालयातील दर्शनीय भागातील सुचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे, असे जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
0000000



आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या
          23 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात शुभारंभ
नांदेड, दि. 21 :- देशभरात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवार 23 सप्टेंबर 2018 रोजी मा. प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे होणार आहे. तद्वतच देशात प्रत्येक जिल्ह्यामध्येही या योजेनेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री किंवा पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते होत आहे. नांदेड जिल्ह्यात 23 सप्टेंबर रोजी नियोजनभवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दु. 12 ते 2.30 या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
            या आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे दारिद्र रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एकाखोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख असलेले, 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नाही, असे कुटुंब याचा या योजनेत सहभाग आहे. तर शहरीभागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, झाडू मारणारे / सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडट, हॉटेल वेटर, मेकॅनिक / वीजतंत्री, असेम्ब्ली , दुरुस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार या वर्गीकरणातील कुटुंब या योजनेत पात्र आहेत.
            या कुटुंबाना प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी रु. 5 लक्ष विमा संरक्षण राहणार आहे. या योजनेंतर्गत त्या कुटुंबाना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत.
यासाठी जी रुग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रुग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील. सन 2011 एस.ई.सी.सी. च्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात या योजनेखाली 2 लाख 77 हजार 999 कुटुंब हे पात्र आहेत. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी व उपजिल्हा रूग्णालय मुखेड हे दोन रुग्णालय संलग्नित करण्यात येणार आहेत.
या योजनेंतर्गत 1 हजार 122 आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच तूर्त राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजना ही कार्यान्वित आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच ही योजना चालू राहणार आहे. आयुष्यमान भारत योजनेत किरकोळ व मोठे आजार यांच्या उपचारांचा समावेश आहे. हे या योजनेचे वैशिष्ट्य होय. तेंव्हा या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  अरुण डोंगरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने व या कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास सर्जे यांनी केले आहे.
0000000

वृत्त   निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...