Saturday, September 22, 2018

लेख - महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासीक उपक्रम जनता व शासनातला संवाद म्हणजे "लोकराज्य"


महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासीक उपक्रम
जनता व शासनातला संवाद म्हणजे "लोकराज्य"
         
कोणतेही शासन हे लोकाभिमुख असावे, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. महाराष्ट्र शासनाने गेल्या 70 वर्षांपासून सातत्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि काळाची पावले ओळखत छपाई तंत्रज्ञानाची सांगड घालत "लोकराज्य"चा आकर्षक, दर्जेदार, वेगवेगळ्या विषयांना समर्पित असा अंक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नांना एक नियमित वाचक म्हणून सलाम करावा वाटतो. खरे तर महाराष्ट्र शासनाचा हा एक ऐतिहासीक उपक्रमच असून जनता-जनार्दन व शासनातला संवादरुपी दुवा म्हणजे "लोकराज्य" होय.
       मासिक सातत्याने चालवणे तसे एक महान कार्य. माझा प्रिंट मीडियातील दैनिकात काम करण्याचा 20 वर्षांचा अनुभव. अंकातील सातत्य, गुणात्मकता, विविध विषयांची त्या-त्या प्रसंगी मिळविलेली अधिकृत आकडेवारी, जोडीला रंगसंगती, आकर्षक व दर्जेदार छायाचित्रे, अंकाची वेगळ्या व डोळ्यांची पारणे फेडणारी मांडणी, टाईपफाँड आदी वाखण्याजोगेच आहे. एखादे मासिक शासनामार्फत प्रसिद्ध होते म्हणजे केवळ शासनाची वाहवा करणारे असेल, अशी काहींची समजूत होते; परंतु "लोकराज्य" हे याबाबी पासून बऱ्याच अंशी दूर राहिलेले आहे हे प्रकर्षाने जाणवते. जनतेच्या कल्याणासाठी, विकासासाठी घेतलेले शासनाचे निर्णय जनतेकरिता सुरु केलेल्या "लोकराज्य" मधून मांडणे हे क्रमप्राप्त नव्हे तर ते प्रथम कर्तव्यच होय. यात कुणाचा बडेजाव वैगैरे काही नव्हे !
      
गत वर्षभरातील अंकाचा धुडोंळा घेतला तर त्यामध्ये फेब्रुवारीतील साहित्य संमेलन, मराठी भाषेला समर्पित अंक प्रसिद्ध करणे एखाद्या दैनिकाला, साप्ताहिकाला किंवा अन्य मासिकाला सध्याच्या कार्पोरेट जगतात, जाहिरातींच्या युगात शक्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. मार्च महिन्याचा "अस्मिता" माझा गौरव, माझा हक्क हा महिलांविषयी योजना व कायदे, सुरक्षा ॲप्स, यशकथा अंक वाचनीय आहे. वाचकांची एखाद्या विषयाची सर्व विषयव्यापी भूख भागवण्याचे काम "लोकराज्य" मासिक करते आहे. त्याबद्दल गौरवौद्-गारास संपूर्ण टीम पात्र आहे. "लोकराज्य" चे काम टीमरुपी आहे. त्याला शासनाची भरभक्कम साथ व पाठिंबा आहे. त्यामुळे वाचकांना काय हवे आहे ते देण्याचा प्रयत्न अनेक प्रसिद्ध झालेल्या अंकामधून प्रकर्षाने जाणवतो.
       एप्रिल 2018 च्या अंकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत तब्बल 92 पाणी दर्जेदार अंक वाचकांच्या हाती देणे हे खरेच मोठे कौतुकास्पद काम "लोकराज्य" ने केले आहे. "लोकराज्य" मासिकातून केवळ शासनाची स्तुतीच झालेली नाही तर समाजाच्या भल्यासाठीच्या बाबीही वाचकांच्या हाती देण्याचा यशस्वी प्रयोग झाल्याचे समोर आले आहे. 13 कोटी वृक्ष लागवड मोहिम असो की, पंढरीची वारी असो अंक हाथी घेतला की वाचक म्हणून "लोकराज्य" ची सुबक छपाई, आकर्षक मांडणी पाहून माझ्या परिचयातील किमान शंभरावर नियमित वाचकांची आपआपल्या परिचितांना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला अंक भेट देण्याचा एक वेगळा पायंडा पाडला आहे. यात काही शासनाची वाहक करण्याचा प्रयत्न नाही. परंतु शासन उपक्रमही आजच्या कार्पोरेट युगात परफेक्ट बसू शकतो याचेच उदाहरण म्हणजे "लोकराज्य" आहे.
      
स्पर्धा परीक्षा असो की, इयत्ता 5 ते 12 वी पर्यंतच्या विविध परीक्षा असोत. त्यासाठी विद्यार्थी- विद्यार्थींनीनी "लोकराज्य"चा संदर्भग्रंथ म्हणून वापर करायला हवा. यातील संदर्भ हे अधिकृत असतात. दैनिके वाचण्याबरोबरच "लोकराज्य" मासिकही नियमितपणे वाचल्यास त्याचा परीक्षार्थ्यांना निश्चितच लाभ होवू शकेल. "लोकराज्य" चे हे कार्य खरेच खूप मोठे आहे. ज्ञानरुपी, संदर्भरुपी हा मासिकाचा भांडार आगामी काळातही असेच कार्य करत राहो, राहील अशी माझी खात्री आहे.
       "लोकराज्य"च्या यशासाठी अहोरात्र प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे परिश्रम घेणाऱ्या हातांना एक वाचक म्हणून मानाचा मुजरा. समाजात जे-जे चांगले, ते-ते मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे व सुरुही आहे. पुढेही वर्षांनुवर्षे रहावा व "लोकराज्य" शंभर वर्षांचा यशाची परंपरा अशाच यशदायी वाटेने पूर्ण करावी, ही तमाम महाराष्ट्राच्यावतीने सदिच्छा…!                
                                                        
    डॉ. भास्कर प्र. भोसले ,  
                                                                        कैलासनगर, नांदेड 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...