Friday, September 14, 2018


सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी मुंबईसह नागपूरमध्ये
१८ सप्टेंबरला पेन्शन अदालत
नांदेड, दि. १४ : राज्य शासनाच्या सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी लेखा व कोषागारे संचालनालयामार्फत मुंबई आणि नागपूर येथे दि. १८ सप्टेंबर २०१८ रोजी “पेन्शन अदालत” आयोजित करण्यात आली असून सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वित्त विभागाने केले आहे.
केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या दि. १८ जुलै २०१८ रोजीच्या ज्ञापनान्वये देशभरात सर्व राज्ये, केंद्र शासित प्रदेशांमध्ये “पेन्शन अदालत”आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात अशा पेन्शन अदालतीचे दि. १८ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही पेन्शन अदालत मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी आयोजित करण्यात येईल.  
मुंबईत आयोजित होणाऱ्या पेन्शन अदालतीचे काम सकाळी १०.३० ते पूर्ण दिवस असे चालणार आहे. याचे स्थळ पु.ल. देशपांडे  महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई असे आहे.
दुसरी पेन्शन अदालत नागपूर येथे आयोजित होईल. तिचा वेळ सकाळी ९ ते पूर्ण दिवस असा आहे तर स्थळ साई सभागृह, गांधी नगर, नागपूर असे आहे.
महालेखाकार, मुंबई कार्यालयामार्फत प्राप्त झालेली प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांची यादी www.mahakosh.gov.in  या संकेतस्थळावर  Circulars and orders  या शीर्षकांतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालय प्रमुखांना या यादीतील त्यांच्याशी संबंधित प्रकरणाची पडताळणी करावी, कार्यालय प्रमुखांनी या प्रकरणांमधील त्रूटीची पुर्तता करून पेन्शन अदालतमध्ये उपस्थित राहावे तसेच संबंधित सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचारी यांनाही उपस्थित राहण्यासाठी कळवावे असे या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
ज्या सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा निवृत्ती वेतन प्रकरणाबाबत तक्रारी आहेत, त्यांनी त्यांच्या तक्रारी संबंधित प्रशासकीय विभागात लेखी किंवा ई-मेलद्वारे किंवा फॅक्सद्वारे १८ सप्टेंबर २०१८ पूर्वी नोंदवाव्यात तसेच पेन्शन अदालतीस उपस्थित राहावे असेही वित्त विभागाने कळवले आहे.
००००


अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी
 ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 14 :-  अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार   सन  2018-19  या शैक्षणिक वर्षामध्ये धार्मिक अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती सांगण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  ऑनलाईन फार्म भरण्यासाठी कार्यशाळा मुदखेड, अर्धापूर व उमरी तालुक्यातील  सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांची  विद्याविकास पब्लिक स्कूल किशोरनगर  नांदेड येथे शिक्षणाधिकारी (मा.) बी. आर. कुंडगीर व शिक्षणाधिकारी (मनपा) तथा उपशिक्षणाधिकारी (मा.) डी. आर. बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाली.  
केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे अर्ज अल्पसंख्याक 23 जुलै पासून भरण्यास सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यासाठी 34 हजार 813 विद्यार्थ्यांचे रीनिवल  उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट येत्या 20 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी  श्री कुंडगीर यांनी केले आहे.
शिष्यवृत्ती फार्म भरणे संदर्भात जिल्हा समन्वयक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती शेख रुस्तुम  यांनी सादरीकरणाद्वारे माहिती सांगितली. या कार्यशाळेस  शिक्षण विस्तार अधिकारी मांदळे प्रविणा, रोहिदास बस्वदे यांनी शैक्षणिक बाबीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरत असताना  अडचण आल्यास शेख रुस्तुम मो. 9689357212 यांना संपर्क करावा. या कार्यशाळेस तिन्ही  तालुक्यातील 250 मुख्याध्यापक उपस्थित होते. बैठक यशस्वितेसाठी मिनल देशमुख, मारोती ढगे यांनी परिश्रम घेतले आहे.
0000000


जिल्हा उद्योग केंद्राच्या
विविध सभांचे 28 सप्टेंबरला आयोजन
नांदेड दि. 14 :-  जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या विविध सभा जिल्हा उद्योग मित्र समिती सभा जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजार  उद्योग पुनर्जिवन जिल्हास्तरीय समिती सभा शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000


महाइस्कॉल संगणक प्रणालीशी
निगडीत कार्यवाही त्वरीत करावी
नांदेड दि. 14 :-  महाइस्कॉल ही जुनी संगणक प्रणाली बंद करण्यात येणार असल्याने या प्रणालीत महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर काही अर्ज त्रुटीअभावी प्रलंबित असतील त्या अर्जातील त्रुटीची पुर्तता करुन गुरुवार 20 सप्टेंबर पुर्वी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करावीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
महाइस्कॉल संगणक प्रणालीशी निगडीत कार्यवाही त्वरित करण्यात येणार आहे. जे प्रकरण कागदपत्राअभावी प्रलंबित आहेत त्यांना प्रलंबित न ठेवात मान्य करावे. जे प्रकरण महाविद्यालय पातळीवर प्रलंबित आहे असे सर्व प्रकरणे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्याकडे अद्याप पाठविले नसतील तर ते त्वरीत पाठवावे, असेही आवाहन केले आहे.  
000000


जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी  
28 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत
नांदेड दि. 14 :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत नेहरु युवा केंद्र नांदेड यांच्यावतीने दरवर्षी युवा विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संलग्नित युवा मंडळाला जिल्हा युवा मंडळ पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी युवा मंडळानी शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक विनायक धेंडे यांनी केले आहे.
1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या आर्थिक वर्षात युवा मंडळाने केलेल्या युवा विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. नेहरु युवा केंद्र नांदेड कार्यालयातर्फे आरोग्य शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा, विविध शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता, पर्यावरण, युवा आदान प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय एकता कार्यक्रम, महिला सबलीकरण, स्वयंरोजगार, राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय दिवस सामाजिक कार्यक्रम इत्यादी विविध क्षेत्रात कार्य केलेल्या संलग्नित युवा मंडळाना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या पुरस्कराचे स्वरुप 25 हजार रुपये धनादेश व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील संलग्नित ग्रामीण भागातील युवा मंडळ, महिला मंडळ, क्रीडा मंडळ, सेवाभावी संस्था, व्यायामशाळानी अर्जाबरोबर मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र घटना आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा पुरावा, लेखा परिक्षण अहवाल व ग्रामपंचायत कार्यालयाच्या शिफारशीसह सर्व मंडळांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करावे. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले अर्ज नेहरु युवा केंद्र राज निवास घर नंबर 21, मालेगाव रोड जैन मंदिरा समोर शिवराय नगर नांदेड (दूरध्वनी नंबर 02462-263403) येथे मिळतील. शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज जमा करावे. या योजनेचा लाभ जास्तीतजास्त युवा मंडळांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000


स्क्रब टायफसचे संशयीत रुग्ण आढळुन
आल्याने नागरीकांनी घ्यावयाची काळजी
नांदेड दि. 14 :- सध्या स्क्रब टायफस हा आजार विदर्भातील काही जिल्हयात आढळुन येत असल्याने नांदेड जिल्हा हा विदर्भाच्या सिमेलगत असल्याने नांदेड जिल्हयात या आजाराची लागण होऊ शकते. त्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्यादृष्टीने गावातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.  
जिल्हयातील सर्व वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना स्क्रब टायफस आजारावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी सुचना दिल्या आहे. त्यानुसार सर्व प्रा. आ. केंद्राना सतर्क करण्यात आले आहे. सद्यस्थितीत स्क्रब टायफसचे रुग्ण विदर्भासह मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश भागात आढळुन येत असुन नांदेड जिल्हा विदर्भ व आंध्र प्रदेशाच्या सिमेलगत असल्याने नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वायफना येथे दोन संशयीत रुग्ण आढळुन आले आहेत.
स्क्रब टायफस आजाराचा प्रसार
स्क्रब टायफस हा जिवानुजन्य आजार आहे. ओरिएन्शिया सुसुगामशी नामक बॅक्टेरीयामुळे होणारा अतिशय गंभिर पण उपचाराने बरा होणारा हा आजार आहे. ट्राम्बिक्युलीड माइटचे लारव्हे ज्याला चिगर म्हणतात ते चावल्यामुळे ओरिएन्टा सुसुगामुशी हे जंतु मानवाच्या शरिरात प्रवेश करतात. जिथे झाडेझुडपे, गवत असते त्यावर हे चिगर असतात. गवत कापतांना गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करतांना ते मानसाला चावतात मानव हे माईटचे आकस्मिक पाहुणे आहेत. चिगर माइट उंदरांना चावतात आणि तिथून आजार पसरतो. मोठी माईट चावत नाही आणी ती जमिनीवरच असते. चिंगर चावल्यामुळे 5 ते 20 दिवसांनी आजाराची लक्षणे दिसु लागतात चिंगर लारवे साधारण 0.17 ते 0.22 मिमी आकाराचे अतिशय सुक्ष्म असतात ते डोळांनी दिसत नाही ते चावणाऱ्या ठिकाणी दुखत नाही त्यामुळे काही चावल्याने भान राहत नाही.
प्राथमिक लक्षणे
ताप, डोकदुखी, हातपाय दुखी, किडा चावलेल्या ठिकाणी व्रण दिसतो मळमळ, ओकारी, शुध्द झारपणे चालताना तोल जाने, ज्या ठिकाणी चिगर चावतो त्याठिकाणी एक व्रण असतो ज्याला इशर म्हणतात हा दिसला तर रोग निदान नक्की होते असे समजण्यात येते की 40 टक्के रुग्णामध्ये हा इशर दिसत नाही. कपडयाने झाकलेल्या भागात तो असला तर दिसणे आनखीनच कठीनच असते. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान जनजागरण, उंदरावर नियंत्रण मिळवले तर स्क्रब टायफस आटोक्यात येवू शकतो.
निदान
            स्क्रब टायफस आजाराचे निदान करण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात
वेलफेलिक्स टेस्ट ज्यामध्ये 0XK Titre  हे वाढलेले आढळून येते. ही खात्रीशीर निदान चाचणी नसली तरी आपण या चाचणीच्या आधारावर स्क्रब टायपफसचे उपचार चालू करु शकतो. ही चाचणी स्क्रिनिंग टेस्ट म्हणून उपयुक्त आहे.
सिरॉलॉजिकल निदान ज्यामध्ये एलिझा व इतर पध्दतीचा उपयोग करुन शरीरामधील स्क्रब टायफसच्या अॅण्टी बॉडीज पाहिल्या जातात. ही चाचणी खात्रीशीर निदान म्हणून उपयोगिली जाते.
उपचार
            स्क्रब टायफस आणि एकूणच रिकेटशियल तापामध्ये टेट्रायक्लिन, क्लोरॅमफेनिकॉल आणि डॉक्सीसायक्लिन ही औषधे परिणामकारक ठरतात. या आजाराचा उपचार जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रफग्णालय व जिल्हा रफग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
·         घराभोवती असलेल्या शेणाची उकंडे / कचऱ्याचे ढिगारे त्वरीत नष्ट करणे.
·         घराभोवती असलेल्या झाडे झुडपी काढुन टाकावेत, गवताळ भागावर तणनाशक औषधाची फवारणी करावी.
·         अंगणवाडी परिसर स्वच्छ ठेवणे व बालकांना गवतावर खेळु देवु नये.
·         खुल्या जागेवर शौचास जाणे टाळावे.
·         गावात पाणी साचुन दलदल निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे.
·         शालेय परिसर स्वच्छ ठेवणे व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे.
·         गावातील मजुराना जंगलात कामावर जाताना पुर्ण अंग झाकेल असे कपडे, गमबुट वापरणे. जंगलातुन परत आल्यानंतर अंगावरील सर्व कपडे उकळत्या पाण्यात भिजविणे, जंगलात कामावर बालकांना नेऊ नये.
·         गुराच्या गोठयामध्ये दलदल राहणार नाही याची दक्षता घेणे, किटकनाशक औषधाची फवारणी करणे, एका गोठयामध्ये गुराची गर्दी करु नये तसेच गुरासाठी साठविलेल्या चारामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेणे.
·         गुराच्या गोठयामध्ये भिंतीला, खांबाना असलेल्या भेगाना शेण व ओल्या मातीच्या माध्यमातुन बुजविणे, शेणाचे ढिगारे गावापासुन दुर लांब अंतरावर राहतील याची दक्षता घेणे.
·         चिगर (माईट) आढळुन आलेल्या ठिकाणी जमिनीची नांगरणी व तसेच जमिनीवरील सर्व पालापाचोळा जाळुन टाकणे. चिगर माईट हे किटक उष्णरक्त असलेले प्राणी यांच्या सिरमवर अवलंबुन असतात त्यामुळे हे किटक शेतामधील उंदीर, घुशी व इतर प्राणी यांच्या शरीरावर आढळुन येतात. त्यामुळे उंदीर व घुशीचा नायनाट करावा.
·         स्क्रब टायपफस या आजाराची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
सद्यस्थितीत नांदेड जिल्हयामध्ये हदगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वायफना  येथे स्क्रब टायफसचे दोन संशयीत रुग्ण आढळुन आले आहे.  त्याअनुषंगाने आरोग्य विभागामार्फत जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. मुंडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. देशमुख, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. रुईकर व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री. सातपुते यांनी संबंधित गावात 8 सप्टेंबर 2018 रोजी भेट देवुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहेत. संशयीत रुग्ण आढळुन आले असले तरीही नागरीकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास संबंधित किटकाचा नायनाट होईल म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेले उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवेल. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावाला, असे आवाहन आरोग्य खात्याकडुन जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


सन 2019 मधील निवडणुकांसाठी
पात्र मतदारांनी नाव नोंदणी करावी
- उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयळे
नांदेड, दि. 14 :- येत्या सन 2019 मधील निवडणुका लक्षात घेऊन पात्र नागरिक, विद्यार्थी, मतदारांनी 31 ऑक्टोंबर पर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती व स्थलांतरणाबाबत मतदार केंद्रावर विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दिपाली मोतीयळे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती कार्यक्रम येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट हॉल येथे नुकताच घेण्यात आला. त्यावेळी श्रीमती मोतीयळे बोलत होत्या.   
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख राजेश्वर डूडूकनाळे, दुरशिक्षण विभागाचे डॉ. राम जाधव, राष्ट्रीय सेवा योजन कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. डी. पवार, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे डॉ. कल्पना कदम, पीपल्स महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक सिद्धेवाड, छायाचित्रकार विजय होकर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती मोतीयळे म्हणाले, जिल्ह्यातील पात्र मतदारांची यादी ही 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकवर आधारीत तयार करण्यात येत आहे. मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत संबंधीत मतदान केंद्रावर विहित नमुन्यात अर्ज बिलओ मार्फत भरुन देता येईल. सन 2019 मधील निवडणुकीसाठी या मतदार यादीचा उपयोग होणार आहे. यासाठी 18 वर्षे पुर्ण झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी सहभाग घ्यावा. नागरिक, विद्यार्थ्यांनी मतदार यादी नाव नोंदणी व दुरुस्तीबाबत जनजागृती करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
कुलसचिव डॉ. मुलानी म्हणाले, विद्यापिठातील निवडणुकांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा असतो त्याप्रमाणे इतर निवडणुकांमध्ये त्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणीमध्ये सहभाग घ्यावा, असे सांगितले.
श्रीमती कल्पना कदम म्हणाल्या, लोकशाहीमध्ये मतदानाला खूप मोठं महत्व आहे. यासाठी मतदार यादीत नाव असल्याची खात्री करुन नाव नोंदणी करावी. याबाबत राष्ट्रीय सेवा योजन मार्फत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये प्रबोधन करता येईल, असे सांगितले.
अशोक सिध्देवाड यांनी मतदार नाव नोंदणी अभियानाकडे व्यापक अर्थाने पाहिले पाहिजे. लोकशाहीत मतदाराचे वरचे स्थान आहे. निवडणूकीत लोकांचा सहभाग वाढला तर लोकशाहीचे संरक्षण होते. मतदारांनी निर्णय घेण्याबाबत स्वतंत्र असावे. निवडणूका पारदर्शी पार पाडण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु असतात. यात समाजातील शेवटच्या व्यक्तीची मोठी भुमिका असून जागरुक मतदार हा लोकशाहीचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले.
राम जाधव यांनी शाळा-महाविद्यालय स्तरावरुन मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम व्यापक प्रमाणात शासन राबवित आहे. यात तरुण मतदारांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. जास्तीजास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करुन मतदार होण्यासाठी सहभाग वाढवावा, असे सांगितले.  
प्रास्ताविक डॉ. पवार यांनी या अभियानात जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. शिवराज बोकडे यांनी केले तर शेवटी काशिनाथ चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, विविध महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.  
000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...