Thursday, February 1, 2018

अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्तीचे  
ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 :- स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील महाविद्यालयात इयत्ता बारावी नंतर सर्व अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. संबंधीत विद्यार्थ्यांचे नवीन मंजुरी व नुतनीकरणाचे अर्ज ऑफलाईन मागविण्यात येत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थाप्रमुख यांनी महाविद्यालयातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ऑॅफलाईन अर्ज भरण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.
शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यवसायिक महाविद्यालयातील इयत्ता 12 वी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमात (कला, वाणिज्य, विज्ञान, पदवी व पदव्युत्तर) शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. शिष्यवृत्तीसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केलेल्या MahaDBT पोर्टलव्दारे सन 2017-18 या वर्षासाठी ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. या विद्यार्थ्यांचे  शिष्यवृत्ती अर्ज ऑफलाईन पध्दतीने विहित नमुन्यात सादर करावीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  

000000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ 
नांदेड दि. 1 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2018-18 साठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुदत बुधवार 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
यापुर्वी दिलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या रहिवासी जिल्ह्यात या योजनेसाठी अर्ज करावयाचा होता. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावीत. हा बदल 31 डिसेंबर 2017 पुर्वी प्राप्त झालेल्या अर्जांसाठी लागू राहणार नाही. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षांसाठी यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नयेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड यांनी केले आहे.

00000
सैनिक अंशदायी आरोग्य योजनेत
 विविध पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 :-  सैनिक अंशदायी आरोग्य योजना पॉलीक्लिनिक इसीएचएस नांदेड आणि औरंगाबाद येथे  कंत्राटी पद्वतीने एका वर्षासाठी विविध पदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज स्टेशन हेडक्वॉर्टर औरंगाबाद छावणी औरंगाबाद येथे मंगळवार 6 मार्च 2018 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या पुढील प्रमाणे आहे. OIC ECHS -1,    मेडीकल ऑफीसर-2,   दंतचिकीत्सक-1,  लॅब टेक्निशियन-1,  नर्सींग असिस्टंट-1,  फर्मासिस्ट-1, लॅब टेक्निशियन-1, फिजीथेरीपीस्ट-1, डेन्टल टेक्नीशियन-1, ड्राइव्हर-1, महिला सहायक-1,  चौकीदार-1, शिपाई-1 व सफाईकामगार-1  या पदांचा समावेश आहे.
वयोमर्यादा, मानधन पुढील प्रमाणे राहील. दंतचिकीत्सक, OIC ECHS वय- 65  वर्षे, मेडीकल ऑफीसर वय-68, मानधन 75 हजार रुपये. लॅब टेक्निशियन, फिजीओथेरीपीस, नर्सींग असिस्टंट, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, डेन्टल टेक्नीशियन या पदांसाठी वय 58 वर्षे व मानधन 28 हजार 100 रुपये. ड्रायव्हर वय-55 मानधन 19 हजार रुपये. चौकीदार, शिपाई, सफाईकामगार, महिला सहायक वय 55 मानधन 16 हजार रुपये.  
माजी सैनिक अधिकारी यांचेसाठी OIC ECHS हे पद आहेत. इतर पदे माजी सैनिक तसेच सिव्हीलीयन वर्गातून भरली जातील. अधिक माहितीसाठी अधिक माहिती  www.echs.gov.in    या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे. तसेच ECHS Cell, औरंगाबाद दुरध्वनी क्रमांक 0240-2372229 व मोबाईल- 7887757481 वर संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.   

000000
शिष्यवृत्तीबाबत प्राचार्य ,
कर्मचाऱ्यांची शनिवारी बैठक
नांदेड दि. 1 :- जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगरव्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानीत महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम पाहणारे कर्मचाऱ्यांची शनिवार 3 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 1 वा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण परीक्षा फी, प्रतिपुर्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्याबाबत विभागाकडून अवलंबवायची अद्यावत व सुधारीत कार्यपद्धती, नियम अटी व शर्तीबाबत माहिती देण्यात येणार आहे. संबंधितांनी बैठकीस उपस्थित न राहिल्यास या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मंजुरी संदर्भात अडचणी आल्यास संबंधीत महाविद्यालयाची जबाबदारी राहील, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

000000
बेपत्ता मुलीचा शोध
नांदेड दि. 1 :- लोहा तालुक्यातील धनज खु. येथील वैष्णवी रोहीदास कदम (वय 17) ही मुलगी  24 एप्रिल 2017 रोजी कहाळा खु. येथुन परत घरी आली नाही. या मुलीचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग गोरा, पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात बुट, भाषा मराठी-हिंदी बोलते, नाक सरळ, अंगाने मध्यम, चेहरा गोल, उंची 150  सेंमी, डोळे काळे आहेत. या वर्णनाच्या मुलीची माहिती मिळताच तपासिक अंमलदार मो. 9403515403, 9637064194 व पोलीस स्टेशन कुंटूर नंबर 02465-258533 यांच्याशी संपर्क  साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कुंटूर यांनी केले आहे.

00000

समाजमाध्यमांच्या विधायक उपयोगाचा उपक्रम
‘सोशल मीडिया महामित्र’
सहभागी होण्याचे आवाहन
नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई दि. 1 : आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
देशातील बहुतांश तरुण फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत असतात. ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ही बाब समोर ठेऊन सोशल मीडियाचा सदुपयोग समाजात अधिक विवेकवादी आणि सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा म्हणून करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘सोशल मीडिया महामित्र’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात ‘सोशल मीडिया महामित्र’ पुरस्कारप्राप्त व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद  साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील  मिळणार आहे.
या उप्रकमासाठी आज 1 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु झाली असून ती 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’ अथवा ॲपलच्या ‘’ॲप स्टोअर वरुन महामित्र (Maha Mitra) हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) प्रत्येकी 10 ‘सोशल मिडिया महामित्र’ निवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी 1 महामित्राची राज्यस्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात निवडलेल्यांना ‘सोशल मिडिया महामित्र’ पुरस्कार देण्यात येईल तसेच त्यांना मान्यवरांशी संवाददेखील साधता येणार आहे.
विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप पाच ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्या, फोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्या, किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म/मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेत, सहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मते, सोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेत, आलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. या आधारे महामित्र निवडण्यात येतील. या निकषांना मिळणाऱ्या गुणांकन आधारे आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल.  निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी  निवड करण्यात येईल. गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
सकारात्मक व सौहार्दपूर्ण महाराष्ट्र बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी ‘सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000
कुष्ठरोग शोध मोहिमेतील काम
समाजापुढे आदर्श निर्माण करणारे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड दि. 1 :-  मनात इच्छा, आत्मविश्वास असेल तर ध्येयपूर्ण होतात. त्यादृष्टीने सेवा भावनेतून हाती घेतलेले कुष्ठरोग शोध मोहिमेतील काम समाजापुढे आदर्श निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम सन 2017-18 मध्ये पंतप्रधान प्रगती योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या कुष्ठरोग शोध मोहीम यामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने विशेष सत्कार व गौरव सोहळा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे काल (ता. 31) संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी श्री डोंगरे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त गणेश देशमुख होते. तर निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, आरोग्य सेवा कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. व्ही. एल. परतवाघ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शाम नागपूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम इंगळे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी एस. एस. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, साडेतीन पिठापैकी असलेल्या रेणुका देवीचा आशिर्वाद व श्री गुरु गुरुगोविंदसिंघजी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनित आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी दिनदुबळ्या गरजूची सेवा केली आहे. ही सेवावृत्ती नांदेड जिल्ह्यात मोठी आहे. कुष्ठरोग शोध मोहिमेत जिल्ह्यात 264 रुग्णांचा शोध घेण्यात आला. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या सेवेलाच ईश्वर सेवा मानली पाहिजे. कुष्ठरुग्णांच्या सेवेचा आदर्श  बाबा आमटे व त्यांच्या कुटुंबियांचा आहे. तो आदर्श समाजापुढे ठेवला पाहिजे. यासाठी प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्वाचे आहे. कर्करोगाचे प्रमाण वाढत असून यात महिलांचे प्रमाण मोठे आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात महिलांच्या आरोग्य सुविधेसाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात येत आहे. यात संशयीत महिला रुग्णांची तपासणी करुन रुग्ण बरा होईपर्यंत उपचार देण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले. कुष्ठरोग शोध मोहिमेत आरोग्य विभागाने नियोजनबद्ध ध्येय ठेवून काम केल्यामुळे नांदेड जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहिला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डोंगरे यांनी मोहिमेतील सर्वांचे अभिनंदन केले.
मनपा आयुक्त देशमुख यांनी रुग्ण सेवा मनापासून केली तर खूप मोठा आनंद देणारी सेवा आहे. कुष्ठरोग शोध मोहिमेत सर्वांनी सकारात्मक राहून उत्स्फुर्त सहभाग घेतल्यामुळे राज्यात नांदेड अग्रस्थानी राहिला आहे, असे सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. परतवाघ यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात 5 ते 20  सप्टेंबर 2017 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात 264 कुष्ठरोग रुग्ण आढळल्याची माहिती दिली. त्यांच्यावर पुर्ण उपचार करुन त्यांना निरोगी करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांनी सत्कारानंतर मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला शासकीय परिचारिका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुष्ठरोगाची माहिती देणारे पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. किशोर आतनुरकर यांनी केले तर या मोहिमेत सर्वांचे सहकार्य मिळाल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. आईटवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ती बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक संचालक कार्यालयाचे सुरेश गाजुलवार, संतोष टाकळकर, सुनील पाटील, सुनील बिडवई, अशोक हरनालीकार, श्रीमती अनुसया गिरी तसेच सुलू कार्यालयातील सर्वश्री भुरे, रौअत, शंकपाले, बांगे, श्रीमती सोळंके, श्री गजभारे तसेच श्री होळ्गे व मुंडे यांनी केले.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...