Thursday, February 1, 2018

कुष्ठरोग शोध मोहिमेतील काम
समाजापुढे आदर्श निर्माण करणारे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड दि. 1 :-  मनात इच्छा, आत्मविश्वास असेल तर ध्येयपूर्ण होतात. त्यादृष्टीने सेवा भावनेतून हाती घेतलेले कुष्ठरोग शोध मोहिमेतील काम समाजापुढे आदर्श निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम सन 2017-18 मध्ये पंतप्रधान प्रगती योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या कुष्ठरोग शोध मोहीम यामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने विशेष सत्कार व गौरव सोहळा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे काल (ता. 31) संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी श्री डोंगरे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त गणेश देशमुख होते. तर निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, आरोग्य सेवा कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. व्ही. एल. परतवाघ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शाम नागपूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम इंगळे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी एस. एस. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, साडेतीन पिठापैकी असलेल्या रेणुका देवीचा आशिर्वाद व श्री गुरु गुरुगोविंदसिंघजी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनित आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी दिनदुबळ्या गरजूची सेवा केली आहे. ही सेवावृत्ती नांदेड जिल्ह्यात मोठी आहे. कुष्ठरोग शोध मोहिमेत जिल्ह्यात 264 रुग्णांचा शोध घेण्यात आला. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या सेवेलाच ईश्वर सेवा मानली पाहिजे. कुष्ठरुग्णांच्या सेवेचा आदर्श  बाबा आमटे व त्यांच्या कुटुंबियांचा आहे. तो आदर्श समाजापुढे ठेवला पाहिजे. यासाठी प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्वाचे आहे. कर्करोगाचे प्रमाण वाढत असून यात महिलांचे प्रमाण मोठे आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात महिलांच्या आरोग्य सुविधेसाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात येत आहे. यात संशयीत महिला रुग्णांची तपासणी करुन रुग्ण बरा होईपर्यंत उपचार देण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले. कुष्ठरोग शोध मोहिमेत आरोग्य विभागाने नियोजनबद्ध ध्येय ठेवून काम केल्यामुळे नांदेड जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहिला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डोंगरे यांनी मोहिमेतील सर्वांचे अभिनंदन केले.
मनपा आयुक्त देशमुख यांनी रुग्ण सेवा मनापासून केली तर खूप मोठा आनंद देणारी सेवा आहे. कुष्ठरोग शोध मोहिमेत सर्वांनी सकारात्मक राहून उत्स्फुर्त सहभाग घेतल्यामुळे राज्यात नांदेड अग्रस्थानी राहिला आहे, असे सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. परतवाघ यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात 5 ते 20  सप्टेंबर 2017 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात 264 कुष्ठरोग रुग्ण आढळल्याची माहिती दिली. त्यांच्यावर पुर्ण उपचार करुन त्यांना निरोगी करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांनी सत्कारानंतर मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला शासकीय परिचारिका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुष्ठरोगाची माहिती देणारे पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. किशोर आतनुरकर यांनी केले तर या मोहिमेत सर्वांचे सहकार्य मिळाल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. आईटवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ती बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक संचालक कार्यालयाचे सुरेश गाजुलवार, संतोष टाकळकर, सुनील पाटील, सुनील बिडवई, अशोक हरनालीकार, श्रीमती अनुसया गिरी तसेच सुलू कार्यालयातील सर्वश्री भुरे, रौअत, शंकपाले, बांगे, श्रीमती सोळंके, श्री गजभारे तसेच श्री होळ्गे व मुंडे यांनी केले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...