Friday, February 17, 2017

वनौषधींसाठी जगाचे भारताकडे लक्ष - डॅा. कदम
उच्चनितीमत्तेतूनच उद्योगात यश - पोलावार
उद्योगांसाठीच्या जिल्हा पुरस्कारांचे वितरण संपन्न

नांदेड दि. 17 :-  वनौषधींसाठी साऱ्या जगाचे भारताकडे लक्ष लागून राहीले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अमर्याद संधी आणि उद्योग उभारणीसाठी शेतकरी आणि त्यांच्या सुशिक्षीत मुलांनी पुढाकार घेणे योग्य ठरेल , असे मत डॅा. के. आर. कदम यांनी व्यक्त केले. तर उद्योग व्यवसायातील उच्च नितीमत्ताच तुम्हाला यश मिळवून देते , असे मत विठ्ठल पोलावार यांनी व्यक्त केले. उद्योग संचालनालयाच्या जिल्हा पुरस्कार योजनेंतर्गत सन 2016 च्या पुरस्कारांचे आज येथे वितरण झाले.

डॅा. के. आर. कदम यांच्या के. के. हर्बल इंडस्ट्रीजला प्रथम , तर पोलावार यांच्या अनंत ॲग्रो इंडस्ट्रीजला द्वितीय पुरस्कार आज येथे प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी हे यशस्वी उद्योजक आपले मनोगत व्यक्त करत होते. जिल्हा उद्योग भवन येथे नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. याप्रसंगी व्यासपीठावर नांदेड उपविभागाचे प्रभारी अधीक्षकीय उद्योग अधिकारी संदीप रोकडे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी महाव्यवस्थापक गौतम लाडे, लघू उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री. बंगाली, उद्योजक हर्षद शहा, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता बनसोड, उद्योजक श्री. गोयंका आदींची उपस्थिती होती.
प्रथम पुरस्कार विजेते डॅा. कदम म्हणाले की, भारतात विभिन्न प्रकारचे हवामान उपलब्ध आहे. त्यामुळे त्या-त्या परिस्थितीत विविध वनौषधींचीही उपलब्धता होते. नांदेडमध्येही औषधी गुणधर्माच्या अनेक वनस्पती उपलब्ध होतात. या वनस्पती उपलब्ध होण्यासाठी शेती हाच मुळ स्त्रोत आहे. त्यामुळे अनुभवी शेतकरी आणि त्यांच्या सुशिक्षीत मुलांनी पुढाकार घेतल्यास, अनेक दुर्धर रोगांवरील उपचारांसाठीची औषधे तयार करण्याचे शेकडो उद्योग इथेच सुरु करता येऊ शकतात. यातून आयुर्वेद, कृषी पर्यटनाची संधीही निर्माण करता येऊ शकते.
द्वितीय पुरस्कार प्राप्त अनंत अग्रो इंड्रस्ट्रीजचे श्री. पोलावर म्हणाले की, कौटुंबिक पाठबळ हे आमच्या यशाचे गमक आहे, असे मानतो. उच्च नितीमत्तेतूनच उद्योग-व्यवसायात यशस्वी होता येते, आमचा अनुभव आहे. उद्योगाशी संलग्न विविध घटकांनीही आम्ही कुटुंबाचाच एक भाग मानतो. त्यामुळे कोणताही उद्योग-व्यवसाय सुरु करताना, त्यामध्ये उच्च नितीमत्ता, प्रामाणिकपणा जपणे हे महत्त्वाचे आहे.
उपविभागीय अधिकारी श्री. कुलकर्णी म्हणाले की, उद्योगक्षेत्रात अमर्याद संधी आहेत. विशेषतः कृषी क्षेत्र हे नांदेडच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामध्येच उद्योजक घडताहेत ही सकारात्मक बाब आहे. उद्योगक्षेत्राच्या विकासासाठी शासन नेहमीच कटीबद्ध आहे. नवउद्योजक, नव्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी, सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा होतकरूंनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सुरवातीला दिपप्रज्वलन झाले, तसेच विश्र्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभारी महाव्यवस्थापक श्री. लाडे यांनी प्रास्ताविक केले. के. के. हर्बल इंडस्ट्रीजचे डॅा. के. आर. कदम यांना प्रथम क्रमांकाचे, अनंत ॲग्रो इंडस्ट्रीजचे श्री. विठ्ठल पोलावर व त्यांच्या बंधुना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रभारी अधीक्षकीय उद्योग अधिकारी श्री. रोकडे, शहा, बंगाली यांची समयोचित भाषणे झाली. एमसीईडीचे शंकर पोवार यांनी आभार मानले.

000000

Thursday, February 16, 2017

जि.प., पं.स. निवडणुकीसाठी
जिल्ह्यात 69.61 टक्के मतदान
मतमोजणी गुरुवारी तालुक्याच्या ठिकाणी होणार  
नांदेड दि. 17 :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 69.61 टक्के मतदान झाले. निवडणुकीसाठी बुधवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक विभागाने दिली आहे. जिल्ह्यात पुरुष मतदारांचे 70.10 टक्के मतदान झाले तर महिलांचे 69.08 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी माहूर तालुक्याची 77.10 टक्के इतकी आहे. तर सर्वात कमी मुखेड तालुक्यात 62.88 टक्के मतदान झाले.
जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी 374 तर पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या 16 लाख 94 हजार 705 इतकी आहे. त्यामध्ये 8 लाख 90 हजार 323 पुरूष मतदार आणि 8 लाख 4 हजार 372 महिला मतदार आहेत, तर दहा मतदार इतर म्हणून नोंदणी केलेले आहेत.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे. (कंसात एकूण मतदार) कंसाबाहेर झालेल्या मतदानाची टक्केवारी (दुसऱ्या कंसात पुरुष व महिला मतदानाची टक्केवारी ) : माहूर- ( एकूण मतदार 62 हजार 206 )- 77.10 टक्के (पुरुष 77.62 टक्के, महिला- 76.51 टक्के ), किनवट- (एकूण मतदार 1 लाख 48 हजार 927 )- 73.52 टक्के (पुरुष 74.17 टक्के, महिला- 72.82 टक्के), हिमायतनगर- (एकूण मतदार 60 हजार 24)- 70.40 टक्के ( पुरुष- 70.61 टक्के, महिला- 70.16 टक्के), हदगाव- (एकूण मतदार 1 लाख 67 हजार 205)- 66.33 टक्के ( पुरुष- 67.09 टक्के, महिला- 65.74 टक्के), अर्धापूर- (एकूण मतदार 59 हजार 533 )- 72.10 टक्के ( पुरुष- 74.05 टक्के, महिला- 69.91 टक्के), नांदेड- (एकूण मतदार 1 लाख 17 हजार 763)-70.11 टक्के ( पुरुष- 71.46 टक्के, महिला-68.60 टक्के ), मुदखेड- (एकूण मतदार 65 हजार 525)- 68.87 टक्के ( पुरुष- 71.39 टक्के, महिला- 66.05 टक्के ), भोकर- (एकूण मतदार 76 हजार 226 )- 70.15 टक्के ( पुरुष- 70.71 टक्के, महिला-69.56 टक्के), उमरी- (एकूण मतदार 60 हजार 07 )- 65.58 टक्के ( पुरुष- 66.82 टक्के, महिला- 64.24 टक्के ), धर्माबाद- (एकूण मतदार 45 हजार 252)- 72.85 टक्के ( पुरुष- 74.54 टक्के, महिला- 71.07 टक्के), बिलोली- (एकूण मतदार 95 हजार 372)- 71.38 टक्के ( पुरुष- 71.78 टक्के, महिला-70.95 टक्के), नायगाव खै.- (एकूण मतदार 1 लाख 16 हजार 487)- 74.25 टक्के ( पुरुष- 74.57 टक्के, महिला 73.91 टक्के ), लोहा- (एकूण मतदार 1 लाख 58 हजार 177)- 71.23 टक्के ( पुरुष- 71.13 टक्के, महिला 71.35 टक्के ), कंधार- (एकूण मतदार 1 लाख 60 हजार 274)- 69.92 टक्के ( पुरुष- 69.29 टक्के, महिला- 70.63 टक्के ), मुखेड- (एकूण मतदार 1 लाख 84 हजार 792)- 62.88 टक्के ( पुरुष- 62.69 टक्के, महिला- 63.09 टक्के), देगलूर- (एकूण मतदार 1 लाख 16 हजार 935)- 66.02 टक्के ( पुरुष- 65.99 टक्के, महिला- 66.05 टक्के ).
नांदेड जिल्ह्यात एकूण 16 लाख 94 हजार 705 मतदारांपैकी 11 लाख 79 हजार 733 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्याची टक्केवारी 69.61 इतकी आहे. यातील 8 लाख 90 हजार 323 पुरुष मतदारांपैकी 6 लाख 24 हजार 96 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष मतदानांची टक्केवारी 70.10 टक्के इतकी आहे. तर 8 लाख 4 हजार 372 महिला मतदारांपैकी 5 लाख 55 हजार 667 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महिला मतदानाची टक्केवारी 69.08 इतकी आहे. अन्य म्हणून नोंदणी केलेल्या 10 मतदारांपैकी एकाचेही मतदान झाले नाही.
मतमोजणी गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी संबंधीत तालुक्यांच्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे.

000000
जि.प., पं.स. निवडणुकीसाठी जिल्ह्यात
उत्साहात मतदान, महिलांचा उत्स्फुर्त सहभाग
मतदान शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न  
नांदेड दि. 16 :- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मतदान झाले. यात महिला मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात सरासरी 68 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत व सुव्यवस्थेत पार पडली. यासाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
 मतदानाला आज सकाळी जिल्ह्यात सुनियोजिरित्या प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी जिल्ह्यातील 2 हजार 93 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह राहीला. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी वाडी बु., नवीवाडी, विष्णुपूरी येथील मतदान केंद्रांना भेट देऊन, तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
सायंकाळी उशीरा पर्यंत मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या. यामुळे मतदान संपताना हाती आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात सरासरी 68 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक यंत्रणेने वर्तविला. जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी 374 तर पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या 16 लाख 94 हजार 705 इतकी आहे. त्यामध्ये 8 लाख 90 हजार 332 मतदार पुरूष आणि 8 लाख 4 हजार 363 मतदार स्त्रिया आहेत, तर दहा मतदार इतर म्हणून नोंदणी केलेले आहेत.  
मतदानासाठी सकाळच्या पहिल्या प्रहरापासूनच मतदानासाठी मतदारांत उत्साह दिसून आला. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र होते. यात नवमतदार तसेच ज्येष्ठ मतदारांचीही संख्याही लक्षवेधी होती. महिला मतदारांनी मतदानाचा हक्क उत्स्फुर्तपणे बजाविला.
मतमोजणी गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी संबंधीत तालुक्यांच्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
जिल्ह्यात शांततेत व सुव्यवस्थेत मतदान पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी जिल्ह्यातील मतदारांसह निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रसार माध्यमांचे, आणि मतदार जागृतीसाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था संघटनांचे आभार मानले आहेत.
000000



जि.प., पं.स. निवडणुकीसाठी
मतदानास उत्साहात प्रांरभ
जिल्हाधिकारी काकाणी यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी
नांदेड दि. 16 :- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी जिल्ह्यात सुनियोजिरित्या प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी जिल्ह्यातील 2 हजार 93 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह राहीला. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन, तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी सुमारे 37.66 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागाने दिली.  
जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी 374 तर पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या 16 लाख 94 हजार 705 इतकी आहे. त्यामध्ये 8 लाख 90 हजार 332 मतदार पुरूष आणि 8 लाख 4 हजार 363 मतदार स्त्रिया आहेत, तर दहा मतदार इतर म्हणून नोंदणी केलेले आहेत. जिल्ह्यात 57 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रांसह जिल्ह्यात सर्वत्र पोलिस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक तसेच गृहरक्षक यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात आज सकाळी मतदानास प्रारंभ झाला. सकाळच्या पहिल्या प्रहरापासूनच मतदानासाठी मतदारांत उत्साह दिसून आला. त्यामुळे मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र होते. यात नवमतदार तसेच ज्येष्ठ मतदारांचीही संख्याही लक्षवेधी होती.
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी नांदेड तालुक्यातील वाडी बु. आणि विष्णुपूरी अंतर्गत येणाऱ्या मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मतदारांसाठीच्या आवश्यक सुविधा, तसेच अनुषंगीक बाबींबाबत त्यांनी मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्देश दिले. वाडी बु.मधील टायनी एंजेल्स हायस्कुलमधील मतदान केंद्र, तसेच नांदेड-पुर्णा मार्गावरील नवीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र, विष्णपुरीतील जिल्हा परीषद प्रशालेतील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी काकाणी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मतदारांशीही संवाद साधला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी हेही उपस्थित होते.
सकाळच्या प्रहरानंतरही मतदानासाठी रांगा लागल्याने, मतदान केंद्रावर उत्साहाचे चित्र होते.

000000

Wednesday, February 15, 2017

यशासाठी संकल्पना समजून घेऊन
परीक्षेची तयारी करावी - चोपडे
नांदेड दि. 15 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना फक्त पाठांतर न करता त्या विषयातील संकल्पना समजून घेऊन परीक्षेची तयारी केल्यास यश निश्चित मिळते त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या नोटस काढाव्यात, असे प्रतिपादन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वी. वी. चोपडे यांनी केले. उज्ज्वल नांदेड मोहिमेअतंर्गत जिल्हा प्रशासन व पिपल्स कॉलेज आणि यशवंत महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            श्री. चोपडे पुढे म्हणाले की , विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न प्रामाणिक ठेऊन स्वत:चे अस्तित्व जपणे आवश्यक असून अभ्यास करताना एका विषयाचे दहा पुस्तके वाचण्यापेक्षा त्या विषयाचे एक पुस्तक दहा वेळा वाचल्यास ते खूप उपयोगी सिध्द होईल. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना पीसएसआय परीक्षेविषयी माहिती देऊन मैदानी परीक्षा व मुलाखत याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी दोन्ही महाविद्यालयातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पी‍पल्स कॉलेजमध्ये समन्वयक प्रा. श्रीकांत देशमुख यांनी तर यशवंत महाविद्यालयामध्ये समन्वयक प्रा. बोरकर यांनी आभार मानले.

000000
जि.प., पं.स. निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात
2 हजार 93 केंद्रावर मतदान, चोख पोलीस बंदोबस्त
शांतता, सुव्यवस्थेचे जिल्हाधिकारी काकाणी यांचे आवाहन

नांदेड दि. 15 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणेने पुर्ण सज्जता ठेवली असून, मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य सुनियोजितपणे पोहचविण्यात आले आहे. मतदान निर्भय, शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडावे यासाठी पोलीस दलानेही पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात सुमारे 9 हजार 440 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी होणाऱ्या मतदानासाठी जिल्ह्यात 2 हजार 93 मतदान केंद्र सुनिश्चित करण्यात आली आहेत. यापैकी 57 मतदान केंद्र संवेदनशील असल्याने, निवडणूक यंत्रणा व पोलिस यंत्रणेने त्यासाठी काटेकोर उपाय योजना केल्या आहेत. जिल्ह्यात मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या 16 लाख 94 हजार 705 इतकी आहे. त्यामध्ये 8 लाख 90 हजार 332 मतदार पुरूष आणि 8 लाख 4 हजार 363 मतदार स्त्रिया आहेत, तर दहा मतदार इतर म्हणून नोंदणी केलेले आहेत.
जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांचा आढावा घेतला. मतदानासाठीचे साहित्य, वाहतूक सुविधा याबाबत समन्वय राखण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. मतदारांनी निर्भय आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता, गैरप्रकारांच्या प्रभावाखाली न येता मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मतदानासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रासाठी 5 हजार 38 ईलेक्ट्रॅानिक मतदान यंत्र पुरविण्यात आली आहेत. तालुका निहाय जिल्हा परिषद गटासाठीचे उमेदवार पुढील प्रमाणे (कंसात गटांची संख्या) माहूर- 10 (2)  , किनवट-  48 (6) , हिमायतनगर –  13 (2). हदगाव- 45 (6) , अर्धापूर- 12 (2) , नांदेड- 34 (4) , मुदखेड- 7 (2) , भोकर- 16 (3) , उमरी- 9 (2), धर्माबाद- 12 (2) , बिलोली- 26 (4)  , नायगाव- 21 (4) , लोहा- 28 (6) , कंधार-  29 (6), मुखेड- 33 (7) , देगलूर- 31 (5). अशारितीने जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी 374 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तालुका निहाय पंचायत समिती गणांसाठीचे उमेदवार पुढील प्रमाणे (कंसात गणांची संख्या) माहूर- 24 (4)  , किनवट-  73 (12) , हिमायतनगर –  16 (4). हदगाव- 54  (12) , अर्धापूर- 20 (4) , नांदेड- 43 (8) , मुदखेड- 17 (4) , भोकर- 31 (6) , उमरी- 22 (4), धर्माबाद- 20 (4) , बिलोली- 36 (8)  , नायगाव- 39 (8) , लोहा- 57 (12) , कंधार-  56 (12), मुखेड- 56 (14) , देगलूर- 39 (10). अशा रितीने पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तालुकानिहाय मतदान केंद्राची संख्या (कंसात संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या) पुढीलप्रमाणे - माहूर- 83 (4)  , किनवट-  191 (8) , हिमायतनगर –  67 (2). हदगाव- 209   (7) , अर्धापूर- 62 (निरंक) , नांदेड- 138 (4) , मुदखेड- 74 (3) , भोकर- 97 (2) , उमरी- 76 (3), धर्माबाद- 59 (3) , बिलोली- 125 (3)  , नायगाव- 156 (1) , लोहा- 191 (9) , कंधार- 182 (4), मुखेड- 236 (निरंक) , देगलूर- 147 (4). अशारितीने एकूण 2 हजार 93 मतदान केंद्रामध्ये 57 मतदान केंद्र संवेदनशील आहेत.
मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 9 हजार 440 अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये 2 हजार 303 मतदान केंद्राध्यक्ष, 6 हजार 909 मतदान केंद्राधिकारी आणि 228 क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये राखीव दहा टक्के अधिकच्या मनुष्यबळाचाही समावेश आहे. या सर्व यंत्रणेला वाहतूकीसाठी आणि संपर्कासाठी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
निवडणुकीसाठीची मतमोजणी संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी  गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरु होणार आहे.
मतदानासाठी जिल्ह्यात चोख बंदोबस्त
जिल्ह्यात मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशील मतदान केंद्र परिसरासह, सर्वत्र पुरेसा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. या बंदोबस्तासाठी 14 उपविभागीय पोलीस अधिकारी, 21 पोलीस निरीक्षक, 165 सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, 2 हजार 637 पोलीस कर्मचारी, 1 हजार 179 गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह राज्य राखीव दलाच्या 16 तुकड्या व दंगल नियंत्रण पथकाच्या 11 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  

000000

Tuesday, February 14, 2017

उद्योग विभागाच्या जिल्हा पुरस्काराचे शुक्रवारी वितरण  
नांदेड दि. 14 :- लघु उद्योजकांसाठीच्या जिल्हा पुरस्काराचे वितरण शुक्रवार 17 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 2 वा. उद्योग भवन सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे होणार आहे. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.  या कार्यक्रमास उद्योग क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी महाव्यवस्थापक गौतम लाडे यांनी केले आहे.
उद्योग संचालनालयाच्या जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत सन 2016 या वर्षाचा जिल्हा पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार लिंबगाव येथील मे. के. के. हर्बल इंडस्ट्रीजचे डॉ. के. आर. कदम यांना तर द्वितीय पुरस्कार देगलूर येथील मे. अनंत ॲग्रो इंडस्ट्रीजचे भागीदार विठ्ठल नरहरी पोलावर यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील या लघु उद्योग घटकांना जिल्हा पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमास उपविभागीय कार्यालय नांदेडचे प्रभारी अधिक्षकीय उद्योग अधिकारी संदीप रोकडे यांची  उपस्थिती राहणार आहे.   

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...