Friday, February 17, 2017

वनौषधींसाठी जगाचे भारताकडे लक्ष - डॅा. कदम
उच्चनितीमत्तेतूनच उद्योगात यश - पोलावार
उद्योगांसाठीच्या जिल्हा पुरस्कारांचे वितरण संपन्न

नांदेड दि. 17 :-  वनौषधींसाठी साऱ्या जगाचे भारताकडे लक्ष लागून राहीले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अमर्याद संधी आणि उद्योग उभारणीसाठी शेतकरी आणि त्यांच्या सुशिक्षीत मुलांनी पुढाकार घेणे योग्य ठरेल , असे मत डॅा. के. आर. कदम यांनी व्यक्त केले. तर उद्योग व्यवसायातील उच्च नितीमत्ताच तुम्हाला यश मिळवून देते , असे मत विठ्ठल पोलावार यांनी व्यक्त केले. उद्योग संचालनालयाच्या जिल्हा पुरस्कार योजनेंतर्गत सन 2016 च्या पुरस्कारांचे आज येथे वितरण झाले.

डॅा. के. आर. कदम यांच्या के. के. हर्बल इंडस्ट्रीजला प्रथम , तर पोलावार यांच्या अनंत ॲग्रो इंडस्ट्रीजला द्वितीय पुरस्कार आज येथे प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी हे यशस्वी उद्योजक आपले मनोगत व्यक्त करत होते. जिल्हा उद्योग भवन येथे नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. याप्रसंगी व्यासपीठावर नांदेड उपविभागाचे प्रभारी अधीक्षकीय उद्योग अधिकारी संदीप रोकडे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी महाव्यवस्थापक गौतम लाडे, लघू उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री. बंगाली, उद्योजक हर्षद शहा, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता बनसोड, उद्योजक श्री. गोयंका आदींची उपस्थिती होती.
प्रथम पुरस्कार विजेते डॅा. कदम म्हणाले की, भारतात विभिन्न प्रकारचे हवामान उपलब्ध आहे. त्यामुळे त्या-त्या परिस्थितीत विविध वनौषधींचीही उपलब्धता होते. नांदेडमध्येही औषधी गुणधर्माच्या अनेक वनस्पती उपलब्ध होतात. या वनस्पती उपलब्ध होण्यासाठी शेती हाच मुळ स्त्रोत आहे. त्यामुळे अनुभवी शेतकरी आणि त्यांच्या सुशिक्षीत मुलांनी पुढाकार घेतल्यास, अनेक दुर्धर रोगांवरील उपचारांसाठीची औषधे तयार करण्याचे शेकडो उद्योग इथेच सुरु करता येऊ शकतात. यातून आयुर्वेद, कृषी पर्यटनाची संधीही निर्माण करता येऊ शकते.
द्वितीय पुरस्कार प्राप्त अनंत अग्रो इंड्रस्ट्रीजचे श्री. पोलावर म्हणाले की, कौटुंबिक पाठबळ हे आमच्या यशाचे गमक आहे, असे मानतो. उच्च नितीमत्तेतूनच उद्योग-व्यवसायात यशस्वी होता येते, आमचा अनुभव आहे. उद्योगाशी संलग्न विविध घटकांनीही आम्ही कुटुंबाचाच एक भाग मानतो. त्यामुळे कोणताही उद्योग-व्यवसाय सुरु करताना, त्यामध्ये उच्च नितीमत्ता, प्रामाणिकपणा जपणे हे महत्त्वाचे आहे.
उपविभागीय अधिकारी श्री. कुलकर्णी म्हणाले की, उद्योगक्षेत्रात अमर्याद संधी आहेत. विशेषतः कृषी क्षेत्र हे नांदेडच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामध्येच उद्योजक घडताहेत ही सकारात्मक बाब आहे. उद्योगक्षेत्राच्या विकासासाठी शासन नेहमीच कटीबद्ध आहे. नवउद्योजक, नव्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी, सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा होतकरूंनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सुरवातीला दिपप्रज्वलन झाले, तसेच विश्र्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभारी महाव्यवस्थापक श्री. लाडे यांनी प्रास्ताविक केले. के. के. हर्बल इंडस्ट्रीजचे डॅा. के. आर. कदम यांना प्रथम क्रमांकाचे, अनंत ॲग्रो इंडस्ट्रीजचे श्री. विठ्ठल पोलावर व त्यांच्या बंधुना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रभारी अधीक्षकीय उद्योग अधिकारी श्री. रोकडे, शहा, बंगाली यांची समयोचित भाषणे झाली. एमसीईडीचे शंकर पोवार यांनी आभार मानले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...