वृत्त क्रमांक
लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १३ ऑगस्टपासून होणार सुरुवात
आयव्हीबीपी संस्थेकडून १ कोटी लसींचे वितरण
नांदेड, दि. 21 जुलै : लाळखुरकूत या घातक विषाणूजन्य रोगापासून राज्यातील पशूधनाचे रक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे 'लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९' चे आयोजन करण्यात आले आहे. ही लसीकरण मोहीम येत्या १३ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभरात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्राप्त झालेल्या १ कोटी लसमात्रा पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेच्या कोल्ड रूममध्ये शीत साखळी ठेवून सुरक्षितपणे वितरण करण्यात येत आहेत.
लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्यभरात वेळेत व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांपर्यंत लस साठा पोहोचणे आवश्यक आहे. उपलब्ध झालेला १ कोटी लसींचा पुरवठा राज्यातील सर्व जिल्ह्यांना शीत साखळीची खबरदारी घेऊन वितरित (वाटप) करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या लस वाटप प्रक्रियेचा सविस्तर जिल्हावार अहवाल मुख्य कार्यालयास तातडीने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मोहिमेमुळे राज्यातील कोट्यवधी पशूधनाला लाळखुरकत रोगापासून संरक्षण मिळणार असून, पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
परिणामकारक लसीकरण् होण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाचे जंतनिर्मुलन करण्यात येत असून, आवश्यक औषधींचा पुरवठा सर्व संस्थांना करण्यात आला आहे. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना राष्ट्रीय गोकुळ अभियान अंतर्गत पशुधनाला एफएमडी लसीकरण करून त्याची नोंद NDLM वर घेतल्यास प्रती पशुधन रु. ५/- प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
"राज्यातील पशुधन रोगांपासून सुरक्षित ठेवणे व पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळणे यासाठी 'लाळखुरकत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९' अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये १३ ऑगस्टपासून ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जाईल. सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे १००% लसीकरण करून घेऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा."- डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य
पशुवैद्यकीय सेवांसाठी कॉल करा १९६२,
व्हॉट्स अप चॅटबॉट सेवेसाठी ९०६३१४२२९९
000000

No comments:
Post a Comment