वृत्त क्रमांक
हॉटेल, उपहारगृह व अन्न आस्थापनांवर एफडीएची धडक कारवाई
गंभीर त्रुटींमुळे तीन आस्थापनांचे परवाने निलंबित; खाद्यतेल व अन्नसाठे जप्त
नांदेड, दि. 24 जुलै :- अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात हॉटेल, उपहारगृह, खाद्यगृह तसेच विविध अन्न आस्थापनांची व्यापक तपासणी करण्यात येत आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 आणि त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी या मोहिमेत केली जात आहे.
या तपासणीत नांदेड शहरातील हॉटेल सवेरा (देगलूर नाका) येथे गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. तसेच हॉटेल कविता, नांदेड या आस्थापनेचाही अन्न परवाना गंभीर अनियमिततेमुळे निलंबित करण्यात आला.
याशिवाय ताडी दुकान क्रमांक 12, नवा मोंढा, नांदेड येथून 158 लिटर साठा (किंमत 7 हजार 110 रुपये) जप्त करून नष्ट करण्यात आला. संबंधित व्यावसायिकाकडे खरेदी बिल अथवा वाहतूक परवाना (ट्रान्सपोर्ट पास) उपलब्ध नसल्याने आणि गंभीर त्रुटी आढळल्यामुळे या आस्थापनेचाही अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
मोहिमेदरम्यान विविध औद्योगिक आस्थापनांमधून मोठ्या प्रमाणात रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठाही जप्त करण्यात आला. त्यामध्ये श्री स्वामी समर्थ ऑईल ट्रेडिंग, एमआयडीसी, नांदेड येथून 3 हजार 148 लिटर (किंमत 5 लाख 19 हजार 420 रुपये), श्रीनिवास ऑईल अँड फूड्स, हदगाव येथून 1 हजार 363 लिटर (किंमत 2 लाख 45 हजार 340 रुपये), ज्ञानाई स्पाईसेस, कृष्णूर एमआयडीसी, नायगाव येथून 1 हजार 61 लिटर (किंमत 3 लाख 53 हजार 800 रुपये) तसेच आयुष ओमकार इंडस्ट्रीज, एमआयडीसी, नांदेड येथून 1 हजार 78 किलोग्रॅम रिफाइंड सोयाबीन तेल (किंमत 1 लाख 86 हजार 494 रुपये) जप्त करण्यात आले.
नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व हॉटेल, उपहारगृह, खाद्यगृह आणि अन्न सेवा आस्थापनांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 तसेच संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
ही विशेष तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त (छत्रपती संभाजीनगर) श्रीकांत करकाळे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत आहे. परिमंडळ 1 चे सु. दा. जिंतुरकर, परिमंडळ 2 चे सहायक आयुक्त रा. मा. भरकड तसेच अन्न सुरक्षा अधिकारी सं. वि. कनकावाड, वि. स. लोंढे, अ. मा. तम्मडवार, अ. न. गिरी, श्रीमती शि. व. श्रीरामे आणि श्रीमती अ. के. दुधाटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
000000
No comments:
Post a Comment