Wednesday, December 4, 2024

वृत्त क्र. 1161

 राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन

नांदेड दि. 4 डिसेंबर:- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशन व नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशन यांचे सहकार्याने राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन 3 ते 5 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे करण्यात आले आहे.  यास्पर्धेचे उदघाटन कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशचे उपाध्यक्ष प्रवीण कुपटीकर यांचे हस्ते  आज 4  डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला. 

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सेपकटाकरॉ असो. सदस्य डॉ. विनयमुन, निवड समिती सदस्य गणेश माळवे, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, क्रीडा अधिकारी विपुल दापके, निवड समिती सदस्य रवीकुमार बकवाड,  निवड समिती सदस्य श्रीदर्शन हस्ती, डॉ. रंगनाथ सुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शालेय क्रीडा स्पर्धेतून खेळाडूंचा शारीरिक, बौध्दीक व संघटनात्मक विकास होतो. शालेय जिवनातून विद्यार्थ्यानी एक तरी खेळ खेळावा व आपले करीअर घडवावे असे  आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले.

नाविन्यपुर्ण खेळण्यात येणारा सेपकटाकरॉ हा खेळ आज संपुर्ण जगात प्रसिध्द झालेला असून या खेळातून शारीरिक लवचिकता दिसून येते. शालेय क्रीडा स्पर्धेसोबत फेडरेशनच्या स्पर्धेत सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खेळाव्यात व यातून आपले करिअर घडवावे, असे आवाहन निवड समिती सदस्य गणेश माळवे यांनी केले.  

नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे यावर्षीतील ही 7 वी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबददल महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशनच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचा सत्कार करण्यात आला.

यास्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील 8 विभागातून खेळाडू मुले-मुली, निवड समिती सदस्य, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित झालेले आहेत. मुले व मुली खेळाडू, संघव्यवस्थापक व पंच यांची निवास व भोजन व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे. 

या स्पर्धेसाठी पंच म्हणुन मोहमद कमरान अन्सारी (नागपूर), इर्शाद सागर (नागपूर), रामदेव बालपांडे (वर्धा),  दर्शन हस्ती (वर्धा), लखांशु लडके (वर्धा), अनिकेत काळे (वर्धा), सौरभ कौसुलकर (वर्धा), ओम मुळे (वर्धा), सागर कवळे (मुंबई), वैभव शिंदे (मुंबई), विनीत ओव्हाळ (मुंबई), व्यापारे (मुंबई) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, राज्यक्रीडामार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, क्रीडा अधिकारी विपुल दापक, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक  दत्तकुमार धुतडे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व सेपकटाकरॉ असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदि सहकार्य करीत आहेत.

याकार्यक्रमाचे सुत्र संचलन राहुल श्रीरामवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी बकवाड यांनी केले. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड येथे आयोजीत करण्यात आले असून यास्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडा प्रेमी, रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

00000










वृत्त क्र. 1160

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकासाठी पीकस्पर्धा 

                                                                                                                                                                        नांदेड दि. 4 डिसेंबर :- राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास नक्कीच मदत होईल. तसेच शेतकऱ्यांकडून अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषिसहायक, कृषिपर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. रब्बी हंगाम 2024 साठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकस्पर्धेत सहभागी व्हावे,  असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.आर. कळसाईत यांनी केले आहे. 

शासन निर्णया अन्वये रब्बी हंगाम 2024 मध्येही पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकासाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

 पिक स्पर्धेतील पिके

                                                                                                                                                                        रब्बी पिके - ज्वारी, गहू, हरभरा करडई व जवस (एकूण 5 पिके)

पात्रता निकष  

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे, स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल, पीक स्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र -अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, 8-अ उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास),पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा.

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

रब्बी हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस ३१ डिसेंबर. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये राहील व आदीवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहील.

पिकस्पर्धा विजेत्यासाठी बक्षिस स्वरुप                                                                                                        स्पर्धापातळी व सर्वसाधारण आणि आदिवासीगटासाठी बक्षिस रुपये पुढील प्रमाणे आहे. तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस 5 हजार, दुसरे 3 हजार तर तिसरे 2 हजार आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे 7 हजार तर तिसरे 5 हजार आहे. राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे 40 हजार तर तिसरे 30 हजार आहे.  याप्रमाणे आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 1159

जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उदघाटन                                                                                       

नांदेड दि. 4 डिसेंबर : - जिल्हा रुग्णालयात बुधवार ४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन राबविण्यात आला. या मोहिमेचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एम पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस बुट्टे, डॉ. एच.के. साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पा गायकवाड यांची  उपस्थिती होती. या मोहिमेच्या माध्यमांतून जंताच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात याविषयी सर्व मान्यवर अधिकारी व श्रीमती डी.ए. गुंडाळे, आर.के.एस.समुपदेशक व समन्वयक यांनी माहिती दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड यांनी केले. 

1 ते 2 वर्षातील बालकांना अर्धी गोळी व 2 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्यात आली. आज गैरहजर असलेल्या बालकांना 10 डिसेंबर 2024 रोजी मॉप अप दिनी जंतनाशक गोळया देण्यात येणार आहे. तरी सर्व बालकांनी जंतनाशक गोळी खावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

०००००



Tuesday, December 3, 2024

वृत्त क्र. 1158

नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे फलित

#नांदेड दि. 3 डिसेंबर : #नीती आयोगाच्या #आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत समावेशित देशभरातील 500 तालुक्यांचा चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा डेल्टा रँक नुकताच प्रकाशित झाला आहे. यात किनवट तालुक्याने राज्यातून चौथा क्रमांक पटकावला आहे, तर संपूर्ण देशातून 51 वा क्रमांक पटकावला आहे.
मागास तालुक्यांना विकसित करण्यासाठी व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने नीती आयोगामार्फत आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर आकांक्षित तालुका कार्यक्रम या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. यात देशभरातील 500 तालुक्यांचा समावेश करण्यात आला. तर महाराष्ट्र राज्यातून 27 तालुक्यांचा यात समावेश असून त्यात नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचा समावेश आहे.
या कार्यक्रमात आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, मूलभूत पायाभूत सुविधा व सामाजिक विकास या 5 क्षेत्रातील 40 निर्देशकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या मानकांच्या प्रगतीची माहिती दर तिमाहीला नीती आयोगामार्फत डेल्टा रँकिंगच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कावली मेघना यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यात आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे आणि याचीच यशस्वीता म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या डेल्टा रँकिंग मध्ये किनवट तालुक्याने प्रगतीकडे वाटचाल असल्याचे दाखवून दिले आहे.
आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगाच्या निर्देशानुसार संकल्प सप्ताह, चिंतन शिबीर, संपूर्णता अभियान इ. महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. तालुका विकास आराखडयानुसार टीबीमुक्त गाव, सुदृढ माता-सुदृढ बाळ, लढा रक्तक्षयाविरुद्ध, सुंदर माझा दवाखाना, उच्च रक्तदाब व मधुमेह संदर्भात तपासणी व उपचार, यशस्वी स्तनपानाच्या पद्धती आणि शिशु संरक्षणाच्या संदर्भाने जनजागृती, पोषण अभियान, पौष्टिक आहार मेळावा, किशोरी हितगुज मेळावा, मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती, बालविवाह मुक्त भारत मोहिम, पोषण परसबाग निर्मिती, कुपोषणमुक्त गाव, विशेष गरजा असणाऱ्या बालकासाठी प्रत्येक शाळेवर प्रशिक्षित शिक्षक, शालेय परसबाग निर्मिती, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, लोकसहभागातून शाळांचे संवर्धन, शाळा व्यवस्थापन समिती कार्यान्वित, गाव बाल संरक्षण समितीची बांधणी, मुलींना मोफत सायकलीचे वाटप, मृदा आरोग्य पत्रिका वितरण, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, लाळ खुरकत रोगाविरुद्ध जनावरांचे लसीकरण, जलसंधारण आणि जलसंवर्धनासाठी विविध योजनांचे अभिसरण, हर घर जल अंतर्गत नळाची जोडणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, बँकिंग टच पॉईंट्सची निर्मिती, प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान, महिला स्वयंसहायता समुहाची बांधणी आणि फिरत्या निधीचे वितरण इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
संकल्प #सप्ताह
3 ते 9 ऑक्टोंबर या कालावधीत तालुक्यात प्रत्येक दिवस एका विशिष्ट विकास विषयक संकल्पनेला समर्पित करून तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याचा जणु संकल्पच करण्यात आला आणि पहिल्या 6 दिवसाच्या संकल्पनेमध्ये 'संपूर्ण आरोग्य', 'सुपोषित कुटुंब', 'स्वच्छता', `कृषी', 'शिक्षण' आणि 'समृद्धी दिवस' याबाबींचा समावेश होता तर शेवटच्या दिवशी संपूर्ण आठवडाभर लोकसहभागातून आयोजीत केलेल्या या कार्याचा संकल्प सप्ताह समारोह म्हणून साजरा करण्यात आला.
चिंतन शिबिर
आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि परिणामकरक तालुक्याच्या विकासाची योजना तयार करण्यासाठी गाव आणि तालुकास्तरावर चिंतन शिबीरांचे आयोजन करून तालुका विकास आराखडा तयार करण्यात आला.
संपूर्णता अभियान
संपूर्णता अभियानाच्या माध्यमातून आरोग्य, पोषण, कृषी आणि सामाजिक विकास या 4 क्षेत्रातील 6 निर्देशक 100 टक्के पूर्ण करण्यासाठी 3 जुलै ते 30 सप्टेंबर या 3 महिन्याच्या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्णता अभियानात 6 सुचकावर विशेष लक्ष केंद्रित करून सदर अभियान यशस्वीतेसाठी काम करण्यात आले.
यात प्रामुख्याने -
१. गरोदरपणात पहिल्या तिमाहीत प्रसूतीपूर्व काळजीसाठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी ही 94 टक्केवारी वरून 97 टक्केवारी पर्यंत वाढविण्यात यश आले.
२. तालुक्यातील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी ही 85 वरून 100 टक्केपर्यंत पोहोचण्यात यश आले.
४. तालुक्यातील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी ही 85 वरून 100 टक्केपर्यंत पोहोचण्यात यश आले.
३. बालविकास विभागाच्या पोषण आहार कार्यक्रमांतर्गत पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी ही 100 टक्के कायम ठेवण्यात यश आले आहे.
५. चालू आर्थिक वर्षातील मृदा नमुना संकलन उद्दिष्टाच्या तुलनेत तयार करण्यात आलेल्या मृदा आरोग्य पत्रिकेची टक्केवारी 00 टक्के वरून 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहे.
६. तालुक्यातील एकूण महिला स्वयंसहायता समूहाच्या तुलनेत फिरता निधी मिळालेल्या गटांची टक्केवारी ही 35 टक्के वरून 45 टक्के पर्यंत पोहोचन्यात यश आले.
नीती आयोगामार्फत सुरु करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल हे सातत्याने आढावा घेऊन मार्गदर्शन करत आहेत. ज्यामुळे तालुकास्तरावरील प्रगतीचा वेग वेगवान करण्यासाठी संबंधित शासनाचे सर्व विभाग आणि विविध विकास भागीदारासोबत काम करून तालुक्याच्या स्थितीत सुधारणा करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन अधिकारी तर तालुकास्तरावर गट विकास अधिकारी हे कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकास्तरावरील सर्व विभागप्रमुख आणि या कार्यक्रमासाठी कार्यक्रम समन्वयक म्हणून नियुक्त असलेले आकांक्षित तालुका फेलो हे तालुका विकास आराखडा राबविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
नीती आयोगाच्या मूल्यांकनातुन
हा डेल्टा रँकिंगमध्ये राज्यातून पहिल्या क्रमांकावर कारंजा वर्धा, दुसऱ्या क्रमांकावर चिखलदरा अमरावती, तिसऱ्या क्रमांकावर तळोदा नंदुरबार, चौथ्या क्रमांकावर किनवट नांदेड आणि पाचव्या क्रमांकावर नवापूर नंदुरबार ने स्थान पटकावंले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आनंद
आकांक्षित तालुका कार्यक्रम हा देशाच्या सर्वात दुर्लक्षित आणि मागासलेल्या तालुक्यांमध्ये सर्व समावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी नीती आयोगामार्फत सुरु केलेला हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व संबंधित सेवा, मूलभूत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या 5 क्षेत्रांतर्गत 40 निर्देशकांचा समावेश असून या निर्देशकांच्या संपुर्णतेसाठी किनवट तालुक्याची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने सुरु आहे याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आनंद व्यक्त केला.
०००००





वृत्त क्र. 1157

शेतकरी ओळख क्रमांकासाठी जिल्ह्यात 16 डिसेंबरपासून मोहीम शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सुलभरितीने मिळण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना

• मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा
नांदेड दि. 3 डिसेंबर : कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ देणे सुलभ व्हावे यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे #शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात यासाठी 16 डिसेंबरपासून मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
शेतकरी ओळख क्रमांकामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करुन लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येणार आहे. यामुळे सर्व पात्र लाभार्थी समाविष्ट करुन घेण्यास सहाय्य मिळेल. पिकासाठी कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता राहील. पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल.
शेतकऱ्यासाठी कृषि कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणाना कृषि सेवा सहजपणे उपलबध करुन देता येईल. विविध सरकारी योजनांचा लाभ , कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संचच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येणार आहे. तसेच लाभार्थ्याना वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांना वेळेवर कृषि विषयक सल्ले, विविध संस्थाकडून संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविण्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार व प्रचारात सफलता प्राप्त होणार आहे.
तरी शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचे लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी आपल्या गावात मोहिमेच्या दिवशी शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००००

Monday, December 2, 2024

वृत्त क्र. 1156

जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली संपन्न 

                                                                                                                                                               एड्स जनजागृतीसाठी 2 ते 9 डिसेंबरपर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन

                                                                                                                                                                      नांदेड, दि. २ डिसेंबर :-  जागतिक एड्स दिनानिमित 1 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड, श्री गरुगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, नांदेड अंतर्गत एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी 02 डिसेंबर ते 09 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात विविध कार्यक्रम प्रस्तावित केले आहेत.

 यामध्ये सोशल मिडीयावरती एचआयव्ही/एड्सची माहिती व जनजागृती करणारे पोस्ट तयार करून व्हायरल करण्याकरिता पोस्ट तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन 02 डिसेंबर ते 09 डिसेंबर पर्यंत करण्यात आले आहे. याकरिता जिल्हास्तरावर प्रथम पारिताषिक 1500/- रू रोख, व्दितीय पारितोषिक 1000/-रू आणि तृतीय पारितोषिक 500/-रू रोख देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रूग्णालयामार्फत विविध महाविद्यालयात प्रभातफेरी, रांगोळी स्पर्धा, पोस्टर तयार करणे इ. स्पर्धांचे आयोजन या सप्ताहात करण्यात येणार आहेत. यासप्ताहमध्ये सेवाभावी संस्था यांच्या मदतीने अतिजोखीम गटासाठी विशेष तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे. एआरटी केंद्र विष्णुपुरी येथे 4 डिसेंबर  रोजी एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हास्तरावर प्रथम पारिताषिक 1500/- रू रोख, व्दितीय पारितोषिक 1000/-रू आणि तृतीय पारितोषिक 500/-रू रोख देण्यात येणार आहे.

                                                                                                                                                                        जागतिक एड्स दिनानिमित मध्यवर्ती बसस्थानक, नांदेड येथे एचआयव्ही टेस्टींग शिबिर घेण्यात आले. आयसीटीसी केंद्र व सुरक्षा क्लिनिक यांच्या सहकार्याने जिल्ह्यात 250 गावांमध्ये एचआयव्ही/एड्स बद्दल जनजागृती व आयईसी वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात 15 रेडरिब्बन क्लबमार्फत एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी पथनाट्य, फ्लॅश मॉब आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

यावेळी जिल्ह्यात एचआयव्ही बाधीत (पिएलएचआव्ही) 7 हजार 13 अॅक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये पुरुष 3 हजार 197, महिला 3 हजार 310 एमएसएम/टीएस / टीजी 22, बालक 484 आदींचा समावेश आहे. सर्व बाधीत रुग्णांवरती एआरटी सेंटर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड यांच्यामार्फत नियमित उपचार केले जातात. याशिवाय बाधित रुग्णांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र, मोफत बस प्रवास, आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड आदी देणे, घरकुल, संजय गांधी निराधार योजना आदी सुविधांचा लाभ एनजीओ मार्फत देण्यात येतो. समाजामध्ये उपेक्षित समजल्या जाणाऱ्या किन्नर, एफएसडब्लु आदी घटकांना देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड व त्यांच्या अंर्तगत एनजीओ तर्फे विशेष प्रयत्न केले जातात.

                                                                                                                                                                        2 डिसेंबर 2024 रोजी जागतिक एड्स दिनानिमित  ‘योग्य अधिकाराचा मार्ग स्विकारा माझे आरोग्य माझा अधिकार’ या घोषवाक्या‌द्वारे आपण एचआयव्ही/एड्स विरूध्द जनजागृती करून एड्सचा धोका टाळु शकतो असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यावर्षी गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी पहिल्या तिमाहात करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना आदेशित केले आहे. जेणेकरून जिल्ह्यातील गरोदर मातापासुन बाळाला होणारा एचआयव्हीचे प्रमाण शुन्यावर आणता येईल.

                                                                                                                                                                        2 डिसेंबर 2024 रोजी जागतिक एड्स दिना निमित श्री गुरुगोविदसिंगजी स्मारक रूग्णालय, नांदेड येथुन महाविर चौक-मुथाचौक-शिवाजी पुतळा यामार्गे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. श्री गुरुगोविदसिंगजी स्मारक रूग्णालय नांदेड येथील प्रांगणात एचआयव्ही/एड्स रूग्णांसोबत समानतेची वागणुकीबाबत सर्वांनी शपथ ग्रहण केली. तसेच उपस्थीतांना अल्पोपहार देवुन कार्यकमाची सांगता करण्यात आली. यावेळी  जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, विभाग प्रमुख सुक्ष्मजिवशास्त्र डॉ. संजय मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, डॉ. विद्या झिने , वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवाजी जाधव, जिल्हा कार्यकम अधिकारी डॉ. कुलदिप अंकुशे, विविध सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, आयसिटीसीचे कर्मचारी, सुरक्षा क्लिनिक येथील कर्मचारी, विविध महाविद्यालयातील एनएसएस प्रमुख व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थीती होती.

०००००




वृत्त क्र. 1155

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

                                                                                                                                                                            नांदेड दि. 2 डिसेंबर :- नांदेड जिल्ह्यात 3 डिसेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 17 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 3 डिसेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 17 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...