Tuesday, December 3, 2024

वृत्त क्र. 1158

नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे फलित

#नांदेड दि. 3 डिसेंबर : #नीती आयोगाच्या #आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत समावेशित देशभरातील 500 तालुक्यांचा चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा डेल्टा रँक नुकताच प्रकाशित झाला आहे. यात किनवट तालुक्याने राज्यातून चौथा क्रमांक पटकावला आहे, तर संपूर्ण देशातून 51 वा क्रमांक पटकावला आहे.
मागास तालुक्यांना विकसित करण्यासाठी व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने नीती आयोगामार्फत आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर आकांक्षित तालुका कार्यक्रम या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. यात देशभरातील 500 तालुक्यांचा समावेश करण्यात आला. तर महाराष्ट्र राज्यातून 27 तालुक्यांचा यात समावेश असून त्यात नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचा समावेश आहे.
या कार्यक्रमात आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, मूलभूत पायाभूत सुविधा व सामाजिक विकास या 5 क्षेत्रातील 40 निर्देशकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या मानकांच्या प्रगतीची माहिती दर तिमाहीला नीती आयोगामार्फत डेल्टा रँकिंगच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कावली मेघना यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यात आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे आणि याचीच यशस्वीता म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या डेल्टा रँकिंग मध्ये किनवट तालुक्याने प्रगतीकडे वाटचाल असल्याचे दाखवून दिले आहे.
आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगाच्या निर्देशानुसार संकल्प सप्ताह, चिंतन शिबीर, संपूर्णता अभियान इ. महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. तालुका विकास आराखडयानुसार टीबीमुक्त गाव, सुदृढ माता-सुदृढ बाळ, लढा रक्तक्षयाविरुद्ध, सुंदर माझा दवाखाना, उच्च रक्तदाब व मधुमेह संदर्भात तपासणी व उपचार, यशस्वी स्तनपानाच्या पद्धती आणि शिशु संरक्षणाच्या संदर्भाने जनजागृती, पोषण अभियान, पौष्टिक आहार मेळावा, किशोरी हितगुज मेळावा, मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती, बालविवाह मुक्त भारत मोहिम, पोषण परसबाग निर्मिती, कुपोषणमुक्त गाव, विशेष गरजा असणाऱ्या बालकासाठी प्रत्येक शाळेवर प्रशिक्षित शिक्षक, शालेय परसबाग निर्मिती, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, लोकसहभागातून शाळांचे संवर्धन, शाळा व्यवस्थापन समिती कार्यान्वित, गाव बाल संरक्षण समितीची बांधणी, मुलींना मोफत सायकलीचे वाटप, मृदा आरोग्य पत्रिका वितरण, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, लाळ खुरकत रोगाविरुद्ध जनावरांचे लसीकरण, जलसंधारण आणि जलसंवर्धनासाठी विविध योजनांचे अभिसरण, हर घर जल अंतर्गत नळाची जोडणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, बँकिंग टच पॉईंट्सची निर्मिती, प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान, महिला स्वयंसहायता समुहाची बांधणी आणि फिरत्या निधीचे वितरण इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
संकल्प #सप्ताह
3 ते 9 ऑक्टोंबर या कालावधीत तालुक्यात प्रत्येक दिवस एका विशिष्ट विकास विषयक संकल्पनेला समर्पित करून तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याचा जणु संकल्पच करण्यात आला आणि पहिल्या 6 दिवसाच्या संकल्पनेमध्ये 'संपूर्ण आरोग्य', 'सुपोषित कुटुंब', 'स्वच्छता', `कृषी', 'शिक्षण' आणि 'समृद्धी दिवस' याबाबींचा समावेश होता तर शेवटच्या दिवशी संपूर्ण आठवडाभर लोकसहभागातून आयोजीत केलेल्या या कार्याचा संकल्प सप्ताह समारोह म्हणून साजरा करण्यात आला.
चिंतन शिबिर
आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि परिणामकरक तालुक्याच्या विकासाची योजना तयार करण्यासाठी गाव आणि तालुकास्तरावर चिंतन शिबीरांचे आयोजन करून तालुका विकास आराखडा तयार करण्यात आला.
संपूर्णता अभियान
संपूर्णता अभियानाच्या माध्यमातून आरोग्य, पोषण, कृषी आणि सामाजिक विकास या 4 क्षेत्रातील 6 निर्देशक 100 टक्के पूर्ण करण्यासाठी 3 जुलै ते 30 सप्टेंबर या 3 महिन्याच्या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्णता अभियानात 6 सुचकावर विशेष लक्ष केंद्रित करून सदर अभियान यशस्वीतेसाठी काम करण्यात आले.
यात प्रामुख्याने -
१. गरोदरपणात पहिल्या तिमाहीत प्रसूतीपूर्व काळजीसाठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी ही 94 टक्केवारी वरून 97 टक्केवारी पर्यंत वाढविण्यात यश आले.
२. तालुक्यातील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी ही 85 वरून 100 टक्केपर्यंत पोहोचण्यात यश आले.
४. तालुक्यातील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी ही 85 वरून 100 टक्केपर्यंत पोहोचण्यात यश आले.
३. बालविकास विभागाच्या पोषण आहार कार्यक्रमांतर्गत पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी ही 100 टक्के कायम ठेवण्यात यश आले आहे.
५. चालू आर्थिक वर्षातील मृदा नमुना संकलन उद्दिष्टाच्या तुलनेत तयार करण्यात आलेल्या मृदा आरोग्य पत्रिकेची टक्केवारी 00 टक्के वरून 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहे.
६. तालुक्यातील एकूण महिला स्वयंसहायता समूहाच्या तुलनेत फिरता निधी मिळालेल्या गटांची टक्केवारी ही 35 टक्के वरून 45 टक्के पर्यंत पोहोचन्यात यश आले.
नीती आयोगामार्फत सुरु करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल हे सातत्याने आढावा घेऊन मार्गदर्शन करत आहेत. ज्यामुळे तालुकास्तरावरील प्रगतीचा वेग वेगवान करण्यासाठी संबंधित शासनाचे सर्व विभाग आणि विविध विकास भागीदारासोबत काम करून तालुक्याच्या स्थितीत सुधारणा करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन अधिकारी तर तालुकास्तरावर गट विकास अधिकारी हे कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकास्तरावरील सर्व विभागप्रमुख आणि या कार्यक्रमासाठी कार्यक्रम समन्वयक म्हणून नियुक्त असलेले आकांक्षित तालुका फेलो हे तालुका विकास आराखडा राबविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
नीती आयोगाच्या मूल्यांकनातुन
हा डेल्टा रँकिंगमध्ये राज्यातून पहिल्या क्रमांकावर कारंजा वर्धा, दुसऱ्या क्रमांकावर चिखलदरा अमरावती, तिसऱ्या क्रमांकावर तळोदा नंदुरबार, चौथ्या क्रमांकावर किनवट नांदेड आणि पाचव्या क्रमांकावर नवापूर नंदुरबार ने स्थान पटकावंले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आनंद
आकांक्षित तालुका कार्यक्रम हा देशाच्या सर्वात दुर्लक्षित आणि मागासलेल्या तालुक्यांमध्ये सर्व समावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी नीती आयोगामार्फत सुरु केलेला हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व संबंधित सेवा, मूलभूत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या 5 क्षेत्रांतर्गत 40 निर्देशकांचा समावेश असून या निर्देशकांच्या संपुर्णतेसाठी किनवट तालुक्याची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने सुरु आहे याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आनंद व्यक्त केला.
०००००





No comments:

Post a Comment

#दर्पणदिन #पत्रकारदिन #नांदेड