Tuesday, December 3, 2024

वृत्त क्र. 1157

शेतकरी ओळख क्रमांकासाठी जिल्ह्यात 16 डिसेंबरपासून मोहीम शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सुलभरितीने मिळण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना

• मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा
नांदेड दि. 3 डिसेंबर : कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ देणे सुलभ व्हावे यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे #शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात यासाठी 16 डिसेंबरपासून मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
शेतकरी ओळख क्रमांकामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करुन लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येणार आहे. यामुळे सर्व पात्र लाभार्थी समाविष्ट करुन घेण्यास सहाय्य मिळेल. पिकासाठी कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता राहील. पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल.
शेतकऱ्यासाठी कृषि कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणाना कृषि सेवा सहजपणे उपलबध करुन देता येईल. विविध सरकारी योजनांचा लाभ , कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संचच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येणार आहे. तसेच लाभार्थ्याना वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांना वेळेवर कृषि विषयक सल्ले, विविध संस्थाकडून संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविण्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार व प्रचारात सफलता प्राप्त होणार आहे.
तरी शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचे लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी आपल्या गावात मोहिमेच्या दिवशी शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment

#दर्पणदिन #पत्रकारदिन #नांदेड