Friday, July 19, 2024

 वृत्त क्र. 614

हलके मोटार वाहन संवर्गातील

वाहन नोंदणीसाठी एमएच 26-सीपी नविन मालिका  

 

नांदेड, दि. 19 जुलै :- परिवहन्नेतर संवर्गातील हलके मोटार वाहन (LMV-NT) वाहनांसाठी एमएच26-सीपी (MH26-CPG) ही नविन मालिका सोमवार 22 जुलै पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज सोमवार 22 जुलै रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजता Text message किंवा दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 613

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 

नांदेड, दि. 19 जुलै :- शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धांचा उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते पार पडला. सदर स्पर्धेतील विजेत्यांना अधिष्ठाता डॉ. देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी उपस्थितांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्याबाबत विद्यार्थ्यांना समाजात जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित केले.

 

वत्कृत्व स्पर्धेमध्ये या महाविद्यालयातील तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातल विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला. एकूण 100 विद्यार्थ्यांनी रांगोळी, पोस्टर, कविता, घोषवाक्य, निबंध आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अधिष्ठाता यांनी अवयवदानाच्या महत्वावर प्रकाश टाकला त्याचबरोबर अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित रॅलीमध्ये मोठया प्रमाणात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

 

या प्रसंगी डॉक्टर संजय मोरे, प्राध्यापक व विभागप्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय.एच. चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले व अवयवदान ही चळवळ विद्यार्थ्यांपर्यंत सिमीत न राहता सर्व लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचे सांगितले. सदरील कार्यक्रमामध्ये या महाविद्यालयातील डॉ. प्रल्हाद राठोड व डॉ. मुकुंद कुलकर्णी तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉ. प्रज्ञा देशपांडे, डॉ. डोळे व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

स्पर्धेतील गुणवंतांची निवड करण्याकरिता स्पर्धेचे निरिक्षक म्हणुन डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. चंडालिया, डॉ. वैशाली इनामदार, डॉ. किशोर राठोड, डॉ. सुधा करडखेडकर, डॉ. उमेश अत्राम, डॉ. अनुजा देशमुख यांनी काम पाहीले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख, डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. नाजीमा मेमन व ईतर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अनिकेत वानखेडे, डॉ. तेजस्वीनी बसले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सचिन तोटावार यांनी विभागाच्या वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

00000



 वृत्त क्र. 612 

दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव, सहायभूत साधन 

मोजमाप- नाव नोंदणी शिबिराचे आयोजन

 

नांदेड, दि. 19 जुलै :- जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन व एलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी सी.एस.आर च्या माध्यमांतून मोफत कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधनांचे मोजमाप- नावनोंदणी शिबीराचे मंगळवार 23 व बुधवार 24 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता शहराच्या मगनपुरा भागातील आर.आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

 

मोजमाप शिबिरासाठी दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड,  यु.डी.आय.डी कार्ड, ऑडिओग्राफ (श्रवणयंत्रासाठी), दिव्यांगत्व दिसेल असे 2 फोटो असणे आवश्यक आहे.  मोजमाप-नावनोंदणी शिबिरानंतर दिव्यांगाना कृत्रिम अवयव, सहायभूत साधनांचे वाटप  अंदाजित एक महिन्याच्या कालावधीत वाटप शिबिरात करण्यात येणार आहे. या शिबिरात सी.एस.आर अंतर्गत मोटराइज्ड ट्रायसिकल, ट्रायसिकल, व्हीलचेअर, सी.पीचेअर, सुगम्यकेन, कुबडी जोड, मोबाईल, श्रावणयंत्र, रोलेटर, वॉकिंग स्टिक आदी साहाय्यभूत साधनांचा समावेश आहे.

 

शासकीय योजनेअंतर्गत गत तीन वर्षात सहायभूत साधनांचा व मोटराइज्ड ट्रायसिकलसाठी गत पाच वर्षात लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहायभूत साधनांचे वितरण होणार आहे. जिल्ह्यातील अशा अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक नितिन निर्मल यांनी केले आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी आरआर मालपाणी मतिमंद विद्यालयात संपर्क (९०६७३७७५२० / ८२०८११४८३२) करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 611 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू


नांदेड, दि. 19 जुलै :- नांदेड जिल्ह्यात 21 जुलै 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 5 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 21 जुलै चे सकाळी 6 वाजेपासून ते 5 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

 वृत्त क्र. 610

 वृत्त क्र. 609

सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु


नांदेड, दि. 19 जुलै :- माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांच्या महाविद्यालयीन पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 व 8707608283 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते.  प्रवेश  सैनिक/ माजी सैनिकांच्या विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरिक पाल्यांना सुद्धा उपलब्ध आहेत.  प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपुरी, नांदेड येथे उपलब्ध आहेत. या वसतीगृहात उत्तम जेवणाची सोय (आठवड्यातून तीन वेळा नॉन-वेज/वेज व नाश्त्यामध्ये अंडी), स्वतंत्र अभ्यासिका, जिमखाना, भोजनालय कक्ष तसेच सकाळी पीटी आणि सायंकाळी रोल कॉल या सर्व सोयींनी सज्ज आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.

0000

 विशेष लेख

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण

महिलांच्या सक्षमीकरणाला मिळेल चालना


महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य. महाराष्ट्राने सुरू केलेल्या अनेक योजना,उपक्रम व अभियानाचे अनुकरण देशातील अनेक राज्यांनी केले आहे. स्त्री आणि पुरुष ही संसाररूपी जीवनाची दोन चाके आहे. कुटुंबाच्या अर्थार्जनात महिलाही आपला सहभाग देत आहे.महिलांच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे म्हणून महिला धोरण ठरविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. माझी कन्या भाग्यश्री,लेक लाडकी या मुलींसाठी योजना सुरू केल्या.एवढ्यावरच न थांबता आता महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे.या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य,त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासोबतच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत होण्यास मदत होणार आहे.

 

" मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करून त्याची व्याप्ती देखील वाढविली आहे.महानगरपालिका क्षेत्राकरिता वार्ड स्तरीय समित्या गठित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा,यासाठी अनेक अटी शिथिल करून प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित असलेल्या विधवा,घटस्फोटीत,परितक्त्या, निराधार महिला त्याचप्रमाणे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.वर्षाकाठी 18 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.हा पैसा महिलांच्या अडीअडचणीच्या कामी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक बाबीसाठी खर्च करण्यात कामी पडणार असून त्यांना आत्मनिर्भर,स्वावलंबी व त्यांच्या सशक्तिकरणाला हातभार लागणार आहे.


 योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ज्या पात्र महिला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी नारी शक्ती दूत हे मोबाईल ॲप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे.नवविवाहित महिलेचे नाव रेशनकार्डवर लवकर लावणे शक्य होत नाही,त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल व त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे.


आता योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे पोस्टातील बँक खातेसुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच ऑफलाइन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.जिल्ह्यात जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कक्ष सुरू करण्यात आले आहे.या कक्षातून महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याची माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहे.जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी आढावा बैठका देखील घेण्यात येत आहे.समित्या गठित करून समितीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांचे ग्रामीण व शहरी भागात अर्ज भरून घेण्यासाठी बालवाडी सेविका,अंगणवाडी सेविका, नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख,नागरी अभियानाचे व्यवस्थापक, आशा सेविका,सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ज्या महिला लाभार्थी " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील त्या लाभार्थी महिलांचे केवळ ऑफलाइन अर्ज भरून घेऊन त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल मात्र पात्र लाभार्थी महिलांकडून या योजनेचे अर्ज भरून घ्यावे लागणार आहे.


ग्रामस्तरीय समिती ही गाव पातळीवर स्थापन करण्यात येत आहे.या समितीमध्ये ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,तलाठी,अंगणवाडी सेविका, आशा सेविका,ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी असतील. या समितीचे संयोजक हे ग्रामसेवक तर सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असतील. ही समिती गाव पातळीवर जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करून ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने लाभार्थी महिलांची नोंदणी करणार आहे. ऑफलाइन अर्ज लगेच ॲप/ पोर्टलवर भरावे लागणार आहे. या समितीकडून गावातील अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवारी आणि आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे.ही यादी गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या यादीवर कोणी आक्षेप घेतले तर त्याचे निराकरण करण्यात येणार आहे तसेच द्विवृत्ती (डुप्लिकेशन) टाळण्यात येईल.लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि ऑनलाईन पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,शहर अभियानाचे व्यवस्थापक,आशा सेविका,सेतू सुविधा केंद्र,अंगणवाडी  पर्यवेक्षिका,ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्रति लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे,अर्ज भरून घेणे यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास,या प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. या योजनेतील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.

 

विवेक खडसे

जिल्हा माहिती अधिकारी,

धाराशिव

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...